-संदीप कदम
भारताने रविवारी झालेल्या ट्वेन्टी-२० तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत भारताकडून काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, तर काहींकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होत आहे. त्यासाठी भारताची संघबांधणी कशी असेल याचा घेतलेला हा आढावा…
आघाडीच्या तीन फलंदाजांची लय…
भारताची फलंदाजी ही नेहमीच भक्कम बाजू म्हणून पाहिली जाते. या मालिकेत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली, असे म्हणायला हरकत नाही. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत लय मिळवणाऱ्या विराट कोहलीने या मालिकेत चमक दाखवली. तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराटने ६३ धावांची अर्धशतकी खेळी केली. या मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वात लक्षवेधी कामगिरी केली. त्याने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अनुक्रमे ४६ आणि ६९ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने आठ षटकांच्या झालेल्या दुसऱ्या लढतीत नाबाद ४६ धावांची निर्णायक कामगिरी केली. के. एल. राहुलनेही पहिल्या सामन्यात ५५ धावांचे योगदान दिले. आघाडीचे फलंदाज लयीत येणे ही चांगली गोष्ट असली तरी त्यांनी कामगिरीत सातत्य राखणे तितकेच गरजेचे आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्या, अक्षर पटेलची चमक…
या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक लक्ष वेधले ते अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी. हार्दिकने नाबाद ७१, ९, नाबाद २५ धावांची खेळी केली. त्याला बळी मिळाले नसले, तरीही ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर हार्दिक चुणूक दाखवू शकतो. अक्षरने या मालिकेत अनपेक्षित कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने तीन सामन्यांत मिळून आठ गडी बाद केले. भारताच्या मालिका विजयामध्ये अक्षरचे योगदान महत्त्वाचे आहे. रवींद्र जडेजा जायबंदी झाल्यानंतर अक्षरला संधी मिळाली. त्याने संधीचे सोने करत आपली छाप पाडली.
ऋषभ पंतवर दिनेश कार्तिक वरचढ?
या मालिकेत युवा पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला संघ व्यवस्थापनाने पंसती दिली. कार्तिकने जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा चुणूक दाखवली. आठ षटकांच्या झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने एक षटकार आणि चौकारासह २ चेंडूंत नाबाद १० धावा करत भारताचा विजय निश्चित केला. पंतला या मालिकेत फार संधी मिळाली नाही. दोघांच्या तुलनेने कार्तिकचे यष्टीरक्षणकौशल्यही सरस आहे. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिका आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात कार्तिकला पसंती मिळण्याची शक्यता अधिक आहे.
भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहलची कामगिरी चिंतेचा विषय…
भारताने मालिका विजय मिळवला असला, तरीही भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि यजुवेंद्र चहल यांना चमक दाखवता आली नाही. सामन्यातील शेवटच्या षटकांमध्ये भुवनेश्वर आणि हर्षल यांनी अधिक धावा खर्ची घातल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा मिळाला. या दोघांनीही ही चूक सुधारणे गरजेचे आहे. मधल्या षटकांमध्ये चहलला फलंदाजांवर दबाव निर्माण करता येत नाही, त्याचा फटकाही भारताला बसत आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी या तिघांनीही आपल्या चुका सुधारत लय मिळवणे गरजेचे आहे.