यंदा संपूर्ण देशभरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसागणिक उन्हाचा पारा वाढत चालला आहे. राजधानी दिल्लीत तर तापमानाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. प्रथमच नवी दिल्लीत तापमान ५२.९ अंशांवर पोहोचले आहे. हे देशातील सर्वोच्च तापमान आहे; जे राजस्थानच्या मागील वर्षाच्या विक्रमी तापमानापेक्षा एक अंश अधिक आहे. परंतु गेल्या काही वर्षांत जगभरात अनेक ठिकाणी विक्रम तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जगातच सूर्य आग ओकत आहे, हे म्हणणे वावगे ठरणार नाही. जगभरात उष्णतेची परिस्थिती काय? या विक्रमी तापमानवाढीचे कारण काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
जगभरात विक्रमी तापमान
युनायटेड किंग्डमने जुलै २०२२ मध्ये पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला. चीनच्या वायव्येकडील एका छोट्याशा शहरात गेल्या वर्षी ५२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले; जे त्या देशासाठी आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान होते. २०२१ मध्ये इटलीमधील सिसिलीमध्ये ४८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले; जे युरोपमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. ही तापमानवाढीची काही उदाहरणे आहेत. ब्रिटनमधील हवामान बदलावर लक्ष केंद्रित केलेल्या ‘कार्बन ब्रीफ’ या प्रकाशनाने गेल्या वर्षी केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, २०१३ ते २०२३ दरम्यान पृथ्वीच्या जवळपास ४० टक्के भागांत दैनंदिन विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये अंटार्क्टिकामधील ठिकाणांचाही समावेश आहे. याच काळात राजस्थानच्या फलोदी येथे भारतातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती.
हेही वाचा : विष्ठा आणि कचर्याने भरलेले फुगे उत्तर कोरिया कुठे पाठवतोय? हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घ्या…
परंतु, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया वाळवंटातील डेथ व्हॅली नावाच्या ठिकाणी म्हणजेच १९१३ मध्ये पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी डेथ व्हॅली येथील तापमान ५६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.
दिल्लीतील तापमान खरेच ५२.९ अंशापर्यंत पोहोचले?
बुधवारी दिल्लीतील एका ठिकाणी ५२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने सांगितले की, ते हरियाणाच्या सीमेला लागून असलेल्या दिल्लीच्या उत्तरेकडील मुंगेशपूर येथील स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे याची सत्यता तपासण्यात येत आहे.
मुंगेशपूर येथील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीवर शंका वर्तविली जात आहे. कारण- या हवामान केंद्रांतर्गत येणार्या दिल्लीतील इतर कोणत्याही ठिकाणी ५२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेलेले नाही. बुधवारी दिल्लीच्या नजफगढ येथे ४९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तसेच सफदरजंग ४६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. १९४४ नंतर दिल्लीत पहिल्यांदाच तापमानात इतकी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंगेशपूरमधून येणारी आकडेवारी जरी संशयास्पद नसली तरी भारतीय हवामान विभागाचे अधिकारी हे कबूल करतात की, अशा विक्रमी तापमानाची पडताळणी करणे आवश्यक असते. जगभरातील हवामान कार्यालये अशा कोणत्याही तीव्र हवामानाच्या घटनेची दुहेरी तपासणी करतात. जगातील हवामान केंद्रेदेखील अतिउच्च तापमानाची दुहेरी तपासणी करतात.
सूर्य ओकतोय आग
पण, रेकॉर्डब्रेक तापमान असो वा नसो, दिल्ली आणि बहुतेक उत्तर भारत उष्णतेच्या लाटेने बेहाल झाला आहे यात शंका नाही. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सामान्यतेपेक्षा ५ ते १० अंश सेल्सिअस जास्त आहे. बुधवारी सलग चौथा दिवस होता जेव्हा सफदरजंग स्थानकावर ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदविले गेले. वाढत्या प्रदीर्घ आणि तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त असलेल्या लोकसंख्येसाठी हे तापमान रेकॉर्डब्रेकच आहे.
हवामान ट्रेंड्सच्या संचालक आरती खोसला म्हणाल्या, “उष्णतेच्या लाटांमध्ये आता सामान्य उन्हाळ्याच्या हवामानापेक्षा पाच ते नऊ अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदविले जात आहे, ही स्थिती चिंताजनक आहे. उष्णतेच्या लाटा आज भारतीयांच्या आरोग्यासाठी सर्वांत मोठा धोका ठरत आहेत.” त्या पुढे म्हणाल्या, “गेल्या दोन दिवसांतील दिल्ली आणि शेजारच्या एनसीआर राज्यांमधील तापमानातून हे स्पष्ट होते की, ही समस्या किती गंभीर आहे.”
जागतिक तापमानवाढ
२०२४ हे वर्ष आजपर्यंतचे अत्यंत उष्ण वर्ष असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या वर्षी जागतिक पातळीवर सर्वांत विक्रमी उष्ण वर्ष म्हणून नोंद करण्यात आली होती. पण, या वर्षीही तीच स्थिती आहे, यात शंका नाही. एप्रिल २०२४ हा सलग ११ वा महिना होता जेव्हा त्या महिन्यातील जागतिक सरासरी मासिक तापमानाने नवीन विक्रम नोंदवला, असे युरोपियन कमिशनच्या एजन्सी ‘कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ने सांगितले. मे २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यानचा हा एक वर्षाचा कालावधी मागील कोणत्याही १२ महिन्यांच्या कालावधीपेक्षा जास्त उष्ण होता.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी विवेकानंद स्मारकामध्ये ४८ तास ध्यानात बसणार; या वास्तूचे काय आहे वेगळेपण?
भारतातील वार्षिक सरासरी तापमान १९०० सालच्या तुलनेत सुमारे ०.७ अंश सेल्सिअसने वाढले आहे. मात्र, संपूर्ण जगाचा विचार केल्यास जगभरातील सरासरी जमिनीच्या तापमानात १.५९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. जर महासागरांचाही समावेश केला, तर सध्याचे जागतिक तापमान १९०० सालच्या सरासरी तापमानापेक्षा किमान १.१ अंश सेल्सिअस जास्त आहे. परंतु, भारतातील उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आहेत. २०२३ मधील फेब्रुवारी महिन्यातही भारतात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती होती. तांत्रिकदृष्ट्या फेब्रुवारी महिन्यात थंडी असते.
दिल्ली आणि बहुतेक उत्तर भारतात तापमान वाढत आहे. पुढे जाऊन सामान्य तापमान ४५ अंश सेल्सिअस इतके होण्याची शक्यता आहे आणि ५० अंश सेल्सिअसच्या पुढील तापमानही कायम नोंदविण्यात येईल. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या संकटासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.