एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे; तर दुसरीकडे उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात तणाव उफाळत असल्याचे चित्र आहे. उत्तर कोरियाने बुधवारी जाहीर केले की, १.४ दशलक्षाहून अधिक नागरिकांनी सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आहे. दक्षिण कोरियाने गेल्या आठवड्यात सीमेपलीकडे प्योंगयांगविरोधी प्रचार पत्रके असलेले ड्रोन पाठविल्यानंतर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबरच्या सर्व सीमा पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनो दक्षिण सीमेवरील रस्ते आणि रेल्वेमार्गांचा एक भाग उद्ध्वस्त केला आहे. तांत्रिकदृष्ट्या दोन देशांमध्ये ७० वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. अधूनमधून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात वाद भडकला असल्याचेही अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र, अलीकडील तणाव चिंतेचे कारण ठरत आहे. दोन देशांतील वादाचे कारण काय? आणखी एक युद्ध भडकण्याची शक्यता आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

वादाचा इतिहास

कोरियन द्वीपकल्प १९१० पासून जपानच्या ताब्यात होता. १९४५ मध्ये जपानच्या शरणागतीनंतर कोरियन द्वीपकल्प दोन भागांत विभागला गेला. सोविएत आणि चिनी कम्युनिस्टांनी उत्तरेकडे डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाचे समर्थन केले; तर अमेरिकन लोकांनी दक्षिणेत कोरिया प्रजासत्ताकच्या निर्मितीला पाठिंबा दिला. १९५० मध्ये संस्थापक किल इल सुंग यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिणेवर आक्रमण केले. हे युद्ध तीन वर्षे चालले. अमेरिकी सैन्याने दक्षिणेला लढण्यास मदत केली. अखेरीस कोणत्याही बाजूने निर्णायक विजय मिळू शकला नाही आणि १९५३ मध्ये युद्धविरामावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनो दक्षिण सीमेवरील रस्ते आणि रेल्वेमार्गांचा एक भाग उद्ध्वस्त केला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ‘रोमान्स स्कॅम’ नक्की आहे तरी काय? भारत, चीन व सिंगापूरमधील पुरुषांची ४६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक कशी झाली?

त्यानंतरच कोरियन डिमिलिटराइज्ड झोन (डीएमझेड)ची निर्मिती झाली; ज्याने द्वीपकल्प अर्ध्या भागात विभागला गेला. परंतु, कायमस्वरूपी शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत. तेव्हापासून दोन्ही कोरियन राष्ट्रांमध्ये सतत वाद सुरू असल्याचे चित्र आहे. १९७० पासून दोन्ही बाजूंनी शांततापूर्ण करार साध्य करण्यासाठी वाटाघाटी करण्यात आल्या. २०००, २००७ व २०१८ मध्ये या संदर्भात महत्त्वपूर्ण करार झाले. परंतु, याचा फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, उत्तर कोरियानेही अण्वस्त्रांच्या विकासाचा पाठपुरावा केला असून, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांकडून याचा विरोध झाला आहे.

सध्या वाढत्या तणावाचे कारण काय?

२०१९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची व्हिएतनाममधील हनोई येथे भेट झाली होती. २०१८ मध्येही ट्रम्प यांनी किम जोंग उन यांची भेट घेतली होती. उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची भेट घेणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. अनेकांना अशी आशा होती की, या शिखर परिषदेत अमेरिका आणि उत्तर कोरिया अण्वस्त्र निःशस्त्रीकरण आणि परिणामी निर्बंध सुलभ करण्याच्या बाबतीत काही निर्णय घेतील. परंतु, संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या न करताच शिखर परिषद अचानक संपली. रॉबर्ट कार्लिन आणि सिगफ्रीड हेकर यांनी उत्तर कोरियाच्या धोरण व तांत्रिक विश्लेषणामध्ये तज्ज्ञ असलेल्या यूएस-आधारित प्रकाशन ‘३८ नॉर्थ’मधील एका लेखात लिहिले आहे, हे किमसाठी मोठे नुकसान आहे. तेव्हापासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव वाढत चालला आहे.

२०१९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची व्हिएतनाममधील हनोई येथे भेट झाली होती. (छायाचित्र-रॉयटर्स)

जानेवारी २०२४ मध्ये किमने ‘डीपीआरके’चा दक्षिण कोरियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची घोषणा केली. पुन्हा एकत्रीकरणाच्या पुढील प्रयत्नांचा त्याग करताना, किम म्हणाले की, दक्षिणेकडे आता प्रथम शत्रू म्हणून पाहिले जाईल. जुलैमध्ये उत्तर कोरियाने जाहीर केले की, त्यांनी दक्षिणेकडील सीमा आणखी मजबूत केली आहे. दक्षिण कोरियाच्या कार्यकर्त्यांनी उत्तरेकडे प्रचाराने भरलेल्या पत्रकांचे फुगे पाठविल्यानंतर वर्षभरापासून उत्तर कोरिया दक्षिणेकडील सीमेवर कचरा वाहून नेणारे फुगे पाठवीत आहे. उत्तर आणि दक्षिण कोरियाला जोडणारे ग्योंगुई व डोन्घाई रस्ते उडवून ‘डीपीआरके’ने औपचारिकपणे दक्षिणेबरोबरचे सर्व संबंध संपवले आहेत.

हेही वाचा : भारत-कॅनडा बिघडलेल्या संबंधांमुळे तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांचे काय होणार?

युद्ध पेटू शकते का?

कार्लिन आणि हेकर यांनी म्हटलें की, सध्याच्या परिस्थितीचे वर्णन जून १९५० मधील परिस्थितीपेक्षा जास्त धोकादायक आहे. उत्तर कोरियाची रशिया आणि चीनशीदेखील जवळीक वाढताना दिसत आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी एकमेकांना युद्धाची धमकी दिली आहे आणि त्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची परिस्थिती आहे. “आम्हाला शंका आहे की, परिस्थिती युद्धाच्या पातळीवर जाईल. उत्तर कोरिया अंतर्गत सामंजस्य मजबूत करण्यासाठी लष्करी संघर्षाचा फायदा घेत आहे,” असे बुसान येथील डोंग-ए विद्यापीठात राज्यशास्त्र व मुत्सद्देगिरी शिकवणारे प्राध्यापक कांग डोंग-वान यांनी ‘बीबीसी’ला सांगितले. “जेव्हाही तणाव वाढतो तेव्हा उत्तर कोरिया शासनाप्रति निष्ठा वाढविण्यासाठी धमक्यांवर भर देतो,” असेही त्यांनी नमूद केले. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाकडे जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वेमार्ग बंद केल्यानंतर दोन्ही देशांतील वाढत्या तणावाचा नक्की काय परिणाम होईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.