‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क आणि ट्विटरमधील संघर्षाला आता एक वेगळे वळण लागले आहे. ट्विटर खरेदी करण्यास इलॉन मस्क पुन्हा उत्सुक असल्याचे समोर आले आहे. ट्विटर खरेदीसाठी एप्रिलमध्ये मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरचा (जवळपास तीन लाख ५० हजार कोटी रुपये) प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा व्यवहार नंतर बाळगळला. या किमतीवर हा करार करण्यासाठी ट्विटरचीही तयारी असल्याचे बोलले जात आहे. करारातून मस्क यांनी अचानक माघार घेतल्यानंतर ट्विटरने डेलावेअर चांसरी न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची पुढील सुनावणी १७ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर मस्क आणि ट्विटरमध्ये रखडलेला व्यवहार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
Elon Musk : इलॉन मस्क यांच्याकडून ट्विटर खरेदीचा करार रद्द; फेक अकाऊंट ठरले कारण
ट्विटरवर इलॉन मस्क यांचा मालकी हक्क?
ट्विटरवर इलॉन मस्क यांची मालकी नाही. ते ट्विटर कधी खरेदी करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मस्क यांच्या वकिलांनी ट्विटरला एक पत्र पाठवले आहे. “ट्विटरने डेलावेअर चांसरी न्यायालयात मस्क यांच्या विरोधात दाखल खटला मागे घेतल्यास आणि आश्वासनानुसार वित्त पुरवठ्याची तजवीज झाल्यास इलॉन हा व्यवहार करतील”, असे या पत्रात म्हटले आहे. मस्क यांच्यासोबतचा हा करार वास्तविकरित्या शक्य आहे, याची खात्री पटल्यावर ट्विटरकडून हा खटला मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.
आता इलॉन मस्कला विकत घ्यायचीय कोका-कोला कंपनी?; McDonald’s बद्दलही ट्विट करत म्हणाला, “मी चमत्कार…”
मस्क यांच्या विरोधात दाखल खटल्यात पुढे काय घडणार?
मस्क यांच्या या नव्या प्रस्तावाबाबत डेलावेअर चांसरी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अद्याप सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाही. या प्रकरणात न्यायालयाच्या भूमिकेनंतरच पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. या प्रकरणात ट्विटरकडून गुरुवारी कोर्टात भूमिका मांडण्यात येणार आहे. मस्क यांच्या नव्या प्रस्तावाबाबत खात्री न पटल्यास १७ ऑक्टोबरला होणारी सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते, असे तुलाने विद्यापीठाच्या सहयोगी विधी प्राध्यापक अॅन लीप्टन यांनी म्हटले आहे. ट्विटरला १०० टक्के खात्री झाल्याशिवाय कोर्टातील हे प्रकरण ट्विटर मागे घेणार नाही, असे लीप्टन यांनी म्हटले आहे.
मस्क यांनी ट्विटर खरेदीचा व्यवहार का रद्द केला होता?
एप्रिल महिन्यात तब्बल ४४ अब्ज डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटर खरेदी करत असल्याचे मस्क यांनी जाहीर केले होते. ट्विटरच्या संचालक मंडळानेसुद्धा या व्यवहाराला मंजुरी दिली होती. मात्र, ट्विटरवरील बनावट खात्यांची पुरेशी माहिती कंपनी देत नाही, हे कारण देत त्यांनी हा व्यवहार रद्द केला होता.