इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या कार विका, टेस्लाच्या शेअर्समधील गुंतवणूक काढून घ्या आणि इलॉन मस्क यांच्या विरोधातील जागतिक आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन करणारी ‘टेक डाऊन’ अर्थात असहकाराची चळवळ मोठ्या वेगाने उभी राहत आहे. इलॉन मस्क यांची बेजबाबदारी राजकीय विधाने आणि राजकीय कृतींना प्रत्युत्तर म्हणून या चळवळीने गेल्या काही महिन्यांत जोर धरला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवरील मस्क यांचा वाढता प्रभाव हे एक आव्हानच आहे. त्याला प्रतिआव्हान म्हणून हा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे गटाने स्पष्ट केले आहे. अर्थात हे आंदोलन हे अहिंसक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

टेक डाऊन चळवळ आहे काय?

टेस्लाविरोधातील असहकार चळवळीशी (टेक डाऊन मूव्हमेंट) निगडित संकेतस्थळावरील माहितीनुसार, २९ मार्च हा टेस्लाविरोधातील जागतिक कृती दिन म्हणून पाळला जाईल. या दिवशी अमेरिकेतील ३०हून अधिक राज्यांत आंदोलन करण्यात येईल. मस्क यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचा निषेध म्हणून निदर्शने करण्यात येतील. याशिवाय, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांसह इतर ठिकाणी निषेध मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. आजवरचे हे सर्वात मोठे आंदोलन असेल. शिवाय इतर देशांमध्ये या आंदोलनाचा प्रभाव वाढता ठेवला जाईल.

टेस्लाविरोधात असहकार आंदोलन का?

शेअर बाजारातील टेस्लाच्या शेअर्सचा भाव वेगाने घसरू लागल्यानंतर टेस्लाविरोधातील टेक डाऊन चळवळ अधिक वेगवान झाल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरपासून टेस्लाच्या शेअर्सची किंमत जवळपास ५० टक्क्यांपर्यंत घसरली होती. या आंदोलनामागचे हे एक प्रमुख कारण आहे. टेस्लाची काही दालनांची संतप्त जमावाकडून नासधूस करण्यात आली. मस्क यांच्या राजकीय हस्तक्षेपाविरोधातील ती कृती होती. त्यातही डॉजकॉइन या कूटचलनातील मस्क यांच्या सहभागाविरोधात तीव्र प्रतिक्रिया म्हणून आंदोलकांनी रान पेटवण्यास सुरुवात केली आहे.

टेस्लाच्या समर्थनार्थ ट्रम्प प्रशासन?

देशभरातील टेस्लाच्या दालनांच्या मोडतोडीची चौकशी सरकारी यंत्रणांनी सुरू केली आहे. टेस्ला टेक डाऊन ही चळवळ अहिंसक असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले असले तरी अमेरिकेतील काही भागांत झालेल्या हिंसाचारामुळे हे आंदोलन वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मस्क यांच्या बचावार्थ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील पाम बोंडी आणि हॉवर्ड लुटनिक यांनी पुढे होऊन देशातील हिंसाचाराचा निषेध केला असून टेस्ला यांच्या शेअर बाजारातील घसरणीच्या काळात त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. टेस्ला यांच्या धोरणांविरोधात चौफेर टीका, निषेध मोर्चे काढले जात असतानाही ट्रम्प प्रशासनाने टेस्लाचे शेअर खरेदीचा विचार करावा, असे आवाहन केले आहे. प्रदूषणरहित इंधन म्हणून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या जगभरात वाढली पाहिजे. त्यासाठी अशा वाहनांची निर्मितीही तितकीच गरजेची आहे. त्यासाठी टेस्लाच्या शेअर बाजारातील घसरणीला लोकांनी हात दिला पाहिजे, असे ट्रम्प प्रशासनाने विनवणीत म्हटले आहे . टेस्ला टेक डाऊन चळवळीचा मस्क यांच्या साम्राज्यावर नेमका काय, परिणाम होईल हे अद्याप अस्पष्ट आहे.

आंदोलनामागील कार्यकर्त्यांची धारणा काय?

इलॉन मस्क आमच्या देशातील लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहेत. टेस्लाच्या बळावर मस्क यांनी जे कमावले आहे, त्याचा वापर करून ते लोकशाही स्वतःच्या दावणीला बांधू पाहत आहेत. याविरोधात आम्ही उभे आहोत. आम्हाला मस्क यांच्या बेकायदा उठावाला हाणूुन पाडायचे आहे. यासाठी आम्हाला हिंसाचाराची गरज नाही. आमचे आंदोलन हे शांतीच्या मार्गावरील असेल. देशभरात टेस्लाच्या दालनांवरील हल्ले, हिंसाचार आणि दंगलींचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत, असे टेस्ला टेक डाऊन आंदोलनाच्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे.

टेस्ला टेक डाऊन चळवळीची रूपरेषा…

ज्यांनी कुणी याघडीला टेस्लाचे वाहन खरेदी केले असेल ते त्यांनी तात्काळ विकून टाकावे. खरेदी केलेल्या टेस्लाच्या समभागांचा त्याग करावा. अर्थात त्याची विक्री करावी आणि आंदोलनात सहभागी व्हावे. २९ मार्च रोजी निघणाऱ्या शांती मोर्च्यात जगभरातील कार्यकर्त्यांनी एकाच वेळी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात म्हणून अमेरिकेतील टेस्लाच्या ५०० हून अधिक दालनांबाहेर कार्यकर्ते निदर्शने करतील. २९ मार्च रोजी होणाऱ्या आंदोलनात सर्वाधिक अमेरिकन असतील, असा दावा संकेतस्थळावर करण्यात आला आहे.

टेस्लाविरोधातील आग कुठवर?

ज्या उपकरणांमुळे आग पसरू शकेल अशी तप्त वस्तू टेस्लाच्या दालनाबाहेर सोमवारी पोलिसांना मिळाली होती. अर्थात तिचा वापर होण्याआधीच पोलिसांनी ते ताब्यात घेतल्याची माहिती ऑस्टिन पोलीस विभागाने सांगितले. लास वेगास येथील टेस्लाच्या दालनाबाहेरील कारची तोडफोड करण्यासाठी जमावाने बंदुकीचाही वापर केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कारला आग लावण्यात आली. त्यासाठी संशयिताने कारवर तीनदा अगदी जवळून गोळीबार केला. याशिवाय कारचे नुकसान होईल, असे विनाशी उपकरण त्याच्याजवळ होते, असेही पोलिसांनी तपासाअंती म्हटले आहे. टेस्लाच्या लव्हलँड आणि कोलोरॅडो येथील दालनांबाहेरील कारच्या नुकसानीप्रकरणी पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे.