२०२५ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीमंत परदेशी लोकांसाठी गोल्ड कार्ड व्हिसा जाहीर केला. तब्बल ४४ कोटी भरून अमेरिकेचं नागरिकत्व मिळविता येणार आहे, अशी तरतूद त्यामध्ये आहे. अशाच प्रकारे थायलंडनेही दोन प्रकारचे निवासी पर्याय लोकांसमोर ठेवले आहेत. थायलंड प्रीव्हिलेज रेसिडेन्स आणि दीर्घकालीन निवास कार्यक्रम या दोन योजनांद्वारे श्रीमंत लोकांना थायलंड फिरणे, गुंतवणूक किंवा राहणे यांसाठी उत्तम पर्याय म्हणून निवडता येऊ शकतो. त्यासाठी नक्की पात्रता काय, त्यासाठी खर्च किती येईल ते जाणून घेऊ…
कसा मिळेल थायलंडचा गोल्डन व्हिसा?
थायलंडमध्ये पारंपरिक गोल्डन व्हिसा नाही. त्याऐवजी थायलंड प्रीव्हिलेज रेसिडेन्स आणि दीर्घकालीन निवास कार्यक्रम यांद्वारे राहण्याचा पर्याय देण्यात येतो. थायलंड प्रीव्हिलेज कार्ड योजना २००३ मध्ये सुरू झाली. त्यामुळे परदेशी नागरिकांना देशात दीर्घकालीन वास्तव्य करण्याचा पर्याय आहे. यामध्ये पाच वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत.
कास्य कार्ड : यामध्ये व्हीआयपी विमानतळ सेवांसह थायलंडमध्ये पाच वर्षांचा प्रवेश मिळतो. हे खरेदी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला १६ लाख ३८ हजार रुपये खर्च करावे लागतात.
गोल्ड कार्ड : हे परदेशी आणि व्यावसायिकांना थायलंडमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पाच वर्षांचा विशेष प्रवेश देण्यात येतो. या गोल्ड कार्डसाठी २२ लाख ६८ हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामध्ये अवलंबितांना सोबत जोडता येत नाही.
प्लॅटिनम कार्ड : यामध्ये व्यक्तीला १० वर्षांचा प्रवेश व्हिसा मिळतो. त्यामध्ये मुख्य अर्जदाराला ३७.८५ लाख रुपये भरावे लागतात आणि अवलंबितांसाठी प्रत्येकी २५.२ लाख रुपये भरावे लागतात.
डायमंड कार्ड : यामध्ये १५ वर्षांसाठी वास्तव्य करण्याची परवानगी मिळते. त्यासाठी ६३ लाख रुपये भरावे लागतात आणि अवलंबितांसाठी प्रत्येकी ३७ लाख रुपये भरावे लागतात.
राखीव कार्ड : हे कार्ड सर्वांनाच दिले जात नाही. ते फक्त आमंत्रणाद्वारे जारी केले जाते. त्याद्वारे खरेदीदाराला २० वर्षांचा विशेषाधिकार प्रवेश व्हिसा देण्यात येतो. त्याची किंमत एक कोटी २६ लाख रुपये आहे. प्रत्येक अवलंबितासाठी २० ते २५ लाख अतिरिक्त शुल्क आकारले जाते. थायलंड प्रीव्हिलेज कार्ड कार्यक्रमाव्यतिरिक्त दीर्घकालीन निवास कार्यक्रमदेखील आहे. २००२ मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम परदेशी नागरिकांना थायलंडमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची आणि काम करण्याची संधी देतो. त्यामध्ये आकर्षक कर लाभ असतात.
दीर्घकालीन निवास कार्यक्रमासाठी पात्रता काय?
श्रीमंत नागरिक- या अर्जदाराकडे किमान ८.६५ कोटी इतकी मालमत्ता असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे गेल्या दोन वर्षांपासूनचे किमान वार्षिक वैयक्तिक उत्पन्न ६८.८३ लाख असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांनी थाय सरकारी बाँड, थेट परकीय गुंतवणूक किंवा थाय मालमत्तेत किमान ४.३ कोटी इतकी गुंतवणूक केलेली असणे आवश्यक आहे.
श्रीमंत पेन्शनधारक- या श्रेणीसाठी अर्जदार ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे निवृत्त असणे आवश्यक आहे. त्यांचे वार्षिक पेन्शन किंवा स्थिर उत्पन्न असावे. अर्ज सादर करताना त्यांचे वैयक्तिक उत्पन्न दरवर्षी किमान ६८ लाख असले पाहिजे. त्यांचे वैयक्तिक उत्पन्न दरवर्षी ३४.४ लाखांपेक्षा कमी नसावे. तसेच अर्जदारांनी थाय गुंतवणुकीत किमान २.१५ कोटी इतकी गुंतवणूक केलेली असणे आवश्यक आहे.
थायलंडमधील व्यावसायिक काम- हे अर्जदार दूरस्थ कामगार असायला हवेत, जे डिजिटल भटकणाऱ्यांसाठी आदर्श ठरते. त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक उत्पन्न किमान ६८ लाख असले पाहिजे. तसेच जर त्यांचे उत्पन्न यापेक्षा कमी असेल, तर त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. बौद्धिक संपदा असणे आवश्यक आहे.
उच्च कुशल व्यावसायिक- हे अर्जदार किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ असावेत आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे वैयक्तिक वार्षिक उत्पन्न किमान ६८ लाख असणे आवश्यक आहे. जर ते त्यापेक्षा कमी असेल, तर अर्जदाराकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. थायलंडमधील त्यांच्या नोकरीच्या नियुक्तीशी संबंधित विशेष कौशल्य असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे थायलंड विशेषाधिकार निवास किंवा दीर्घकालीन निवास कार्यक्रम कायमस्वरूपी निवास किंवा नागरिकत्व मिळवून देत नाहीत.
हेन्ले अँड पार्टनर्सच्या थायलंड प्रोग्राम मॅनेजर कॅथरीन पेटिट यांनी फर्स्टपोस्टला सांगितले, “गोल्डन व्हिसा योजनांसारखीच ही योजना असली तरी ते आर्थिक योगदान किंवा पात्रतेच्या बदल्यात निवासस्थान देतात. मात्र, याची रचना वेगळी आहे.”
दोन्ही निवास कार्यक्रमांमध्ये फरक काय?
हे दोन्ही कार्यक्रम थायलंडमध्ये दीर्घकालीन निवास प्रदान करती असले तरीही दोन्हीमध्ये फरक आहे. सर्वांत आधी थायलंड विशेषाधिकार निवास कार्यक्रम हा पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत थायलंड विशेषाधिकार कार्ड कंपनी लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलेला एक उपक्रम आहे. तर, दीर्घकालीन निवासी व्हिसा हा गुंतवणूक मंडळाद्वारे व्यवस्थापित केलेला एक सरकारी उपक्रम आहे. थायलंड विशेषाधिकार निवास कार्ड थायलंडमध्ये दीर्घकालीन प्रवेश प्रदान करीत असले तरी थायलंडमध्ये काम करण्याचा अधिकार देत नाही. हे निवृत्त, वारंवार प्रवास करणारे, नोकरीच्या वचनबद्धतेपासून मुक्त, आरामदायी व दीर्घकाळ राहण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरते.
थायलंडच्या कार्यक्रमाचे फायदे काय?
ज्यांना समुद्रकिनाऱ्यावर आयुष्य जगायचे आहे त्या व्यक्तींसाठी थायलंड विशेषाधिकार निवास आणि दीर्घकालीन निवास कार्यक्रम हे उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही योजना दीर्घकाळासाठी निवास प्रदान करतात. थायलंड प्रीव्हिलेज रेसिडेन्समध्ये फास्ट ट्रॅक इमिग्रेशन आणि व्हीआयपी लाउंज प्रवेशासह विशेष विमानतळ सेवांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात. तसेच थायलंडचे प्रीव्हिलेज रेसिडेन्सी कार्ड खरेदी करणाऱ्यांना आरोग्य तपासणी, स्पा, हॉटेलमध्ये राहण्याची मोफत सोय आणि बऱ्याच काही सुविधा दिल्या जातात. थायलंडमधील निवासी कार्यक्रमदेखील खूप सहज परिवर्तनशील आहेत. त्यामध्ये किमान राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रवासात राहण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. दीर्घकालीन निवास कर विशेषाधिकारदेखील देतो. उच्च-कुशल व्यावसायिक श्रेणीतील लोकांना १७ टक्के वैयक्तिक उत्पन्न कर दर मिळतो. एक कोटी १९ लाख यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांसाठी हा दर सध्या ३५ टक्के आहे.
या योजनेत जोडीदार आणि अवलंबितांना समाविष्ट करण्याचा पर्यायदेखील आहे. दुसरे घर शोधणाऱ्या कुटुंबासाठी हा योग्य पर्याय आहे. गोल्डन व्हिसाचे व्यवस्थापकीय भागीदार मुरात कोस्कुन यांनी फायद्यांबद्दल बोलताना स्पष्ट केले, “दोन्ही कार्यक्रम स्थिर , दीर्घकालीन वास्तव्याची परवानगी देतात, जे कुटुंबातील सदस्यांनादेखील समाविष्ट करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशिष्ट श्रेणींसाठी परदेशी उत्पन्नावर थाय करातून सूट मिळते आणि अत्यंत कुशल व्यावसायिकांसाठी १७ टक्के वैयक्तिक उत्पन्न कर देतो.” थायलंड विशेषाधिकार निवास आणि दीर्घकालीन निवास कार्यक्रम जलद स्थलांतर आणि विमानतळ सेवादेखील पुरवतात.
हे दोन्ही कार्यक्रम किती लोकप्रिय
२०२४ च्या अखेरीस थायलंड विशेषाधिकार निवासात सुमारे ४० हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. त्याआधी २०२३ मध्ये ११ हजार ८४६ जणांना नवीन सदस्यत्व देण्यात आले. सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेल्या राष्ट्रीयत्वांमध्ये चीन, जपान, अमेरिका, यूके व फ्रान्स यांचा समावेश आहे. दुसरीकडे,थायलंडच्या दीर्घकालीन निवास योजनेसाठी पाच हजार ५८९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी श्रीमंत पेन्शनधारकांचा वाटा सर्वांत मोठा म्हणजे ३६.५ टक्के आहे. त्यानंतर अत्यंत कुशल व्यावसायिकांचा वाटा १४.८ टक्के आहे. थायलंडमधील काम करणाऱ्या व्यावसायिकांचा वाटा १२.६ टक्के आहे आणि श्रीमंत नागरिकांचा वाटा ४.७ टक्के आहे. अलीकडच्या काळात भारतीयांनी थायलंड प्रीव्हिलेज प्रोग्राममध्ये मोठा उत्साह दाखवला आहे आणि अर्जांची संख्याही वाढली आहे.
थायलंडच्या दीर्घकालीन निवास योजनांचे भविष्य काय?
“सरकारने नवीन एलटीआर व्हिसाधारकांना आकर्षित करण्याचे ध्येय ठेवले आहे. तसेच त्यामध्ये प्रवेशयोग्यता सुधारण्यासाठी धोरणात्मक सुधारणाही अपेक्षित आहेत”, असे पेटिट यांनी सांगितले आहे. “थायलंड विशेषाधिकार निवास कार्यक्रम आणि दीर्घकालीन निवासी व्हिसा कार्यक्रम थायलंडच्या भविष्यातील आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे. श्रीमंत व्यक्ती, व्यावसायिक आणि निवृत्त व्यक्तींना आकर्षित करून या योजना परदेशी गुंतवणुकीला चालना देण्याचे, तसेच रिअल इस्टेट आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांना चालना देण्याचे ध्येय ठेवतात. तसेच थायलंडची जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्याचे उद्दिष्टही ठेवतात”, असे कोस्कुन यांनी म्हटले आहे.