अॅपल कंपनी पुढच्या वर्षापासून आयफोन्सचे उत्पादन भारतात हलवण्याची योजना आखत असल्याचे वृत्त फायनान्शियल टाइम्सने दिले आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोन्सचं उत्पादन भारतातून केलं जाण्याची शक्यता आहे. जागतिक तंत्रज्ञान संशोधन व सल्लागार कंपनी काउंटरपॉइंट रिसर्चच्या मते, टेक जायंट दरवर्षी जगभरात २२ कोटींहून अधिक आयफोन्स विकते. अमेरिका ही त्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. सध्या अमेरिकेत आयफोनच्या एकूण आयातीपैकी एक-पंचमांश आयात भारतातून होते आणि उर्वरित आयफोन चीनमधून येतात. अॅपलने म्हटले आहे की, त्यांची पुरवठा साखळी ५०हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये पसरलेली आहे.
आयफोनचे उत्पादन चीनमध्ये कसे आले?
आयफोनचे असेंब्लिंग (जुळवणी) ही एका मोठ्या उत्पादन प्रक्रियेचा एक भाग आहे. अॅपल खनिजे आणि पुनर्वापर केलेले भाग यांसारख्या साहित्याचा स्रोत म्हणून वापर करते. यावर प्रक्रिया करून धातूचे आवरण किंवा मुद्रित सर्किट बोर्ड (पीसीबी) असे घटक तयार केले जातात. उत्पादनातील हे भाग असेंब्ली सुविधांमध्ये पाठवले जातात आणि फोन तयार करण्यासाठी ते एकत्र आणले जातात. मार्च २०२४ मध्ये चीनमध्ये अॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, “जगात अशी कोणतीही पुरवठा साखळी नाही, जी आपल्यासाठी चीनपेक्षा महत्त्वाची आहे. चीन अनेक घटकांचा पुरवठा करतो. त्याशिवाय मोठ्या किमतीचे स्मार्टफोन तयार करण्यासाठी आवश्यक कामगारदेखील पुरवतो. अॅपलने २००० सालाच्या सुरुवातीला चीनमध्ये प्रवेश केला. त्यावेळी चीन इतर देशांशी त्यांचे आर्थिक संबंध सुधारण्यास आणि त्यांना चालना देण्यास उत्सुक होता. अॅपलनेही तैवानच्या फॉक्सकॉनसोबत भागीदारी करीत उत्पादनखर्च कमी करण्याचा विचार केला. अॅपलने आयपॉडसारख्या उपकरणांच्या निर्मितीपासून सुरुवात केली. ती एक पोर्टेबल मीडिया प्लेयर्सची शृंखला होती. त्यानंतर २००७ मध्ये आयफोन लॉंच झाला.
चीनकडे सुरुवातीला आयफोन तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणाली आणि संसाधनांचा अभाव होता. मात्र, अॅपलने स्वत:च्या पुरवठादारांची निवड करून, त्यांना यामध्ये सुपरस्टार बनवण्यास मदत केली, असे वृत्त बीबीसीने दिले होते.
पुरवठादारांच्या साखळीत बीजिंग जिंगडियाओ नावाच्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी हाय-स्पीड प्रीसिजन मशिनरीची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. काच कापण्यासाठी यंत्रसामग्री विकसित करणारी ही कंपनी काही काळाने आयफोनचा पृष्ठभाग तयार करू लागली. चीन सरकारने अॅपलला निर्यातीत प्रोत्साहन देत विविध सवलती आणि करांत सूट देत मदत केली. त्यामुळे विशेष आर्थिक क्षेत्र तयार होऊन मध्य-पूर्व प्रांत हेनानमधील झेंगझोऊ हे आयफोन शहर ठरले. हे शहर जगातील सर्वांत मोठे आयफोन उत्पादक केंद्र आहे. आयफोन असेंब्ली करण्यासाठी सुमारे ४०० वेळा प्रयोग केले गेले. त्यामध्ये पॉलिशिंग, ड्रिलिंग व स्क्रू बसवणे यांचा समावेश होता. झेंगझोऊ दिवसाला पाच लाख किंवा दर मिनिटाला ३५० आयफोन तयार करू शकते, अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सने २०१६ मध्ये दिली होती. २०२२ मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले की, अॅपलने पुरवठादारांना आशियातील इतर ठिकाणी विशेषत: भारत आणि व्हिएतनाममध्ये अॅपल उत्पादने एकत्र करण्यासाठी अधिक सक्रियपणे योजना तयार करण्यास सांगितले होते. इतर माध्यमांनीही असेच वृत्त प्रकाशित केले.
अॅपलच्या विचारसरणीत बदल होण्याची अनेक कारणे होती. त्यापैकी जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळी विस्कळित करणारा कोविड-१९ हा एक महत्त्वाचा घटक होता. दुसरे कारण म्हणजे चीनची अर्थव्यवस्था वाढत असताना आणि शैक्षणिक पातळी सुधारत असताना काही चिनी तरुण श्रीमंतांसाठी इलेक्ट्रॉनिक्स असेंबल करण्याचे काम माफक वेतनावर करण्यास उत्सुक नाहीत, असे एका अहवालात म्हटले होते.
काही कारखान्यांमध्ये कामाच्या ठिकाणचे भयानक परिस्थितीचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दीर्घकाळ दिले आहे. शेन्झहेनमधील एका कारखान्यात कामगारांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वसतिगृहाजवळ सुरक्षा जाळी बसवण्यात आली. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव २०१७ मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळापासूनच सुरू झाला. ट्रम्प यांनी अमेरिकेतील उत्पादनांच्या चीनमधील स्थलांतराला बराच काळ विरोध केला आहे आणि परदेशांतील उत्पादन रोखण्यासाठी उच्च शुल्क आकारण्याचा युक्तिवादही केला आहे.
भारतात अॅपलची आयफोन असेंब्ली कुठे केली जाते?
अॅपलने २०१७ मध्ये भारतात आयफोन असेंब्ली सुरू केली. सध्या भारतातील तीन आयफोन असेंब्ली प्लांटपैकी दोन तमिळनाडूमध्ये व एक कर्नाटकमध्ये आहे. तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर हा सर्वांत मोठा प्लांट आहे. भारतातील अॅपलचे इतर दोन कंत्राटी उत्पादन प्लांट विस्ट्रॉन व पेगाट्रॉन हे टाटा समूहाने विकत घेतले आहेत. २०२१ मध्ये श्रीपेरंबुदूर प्लांटमधील कामगारांनी प्लांट आणि त्यांच्या वसतिगृहातील परिस्थितीच्या विरोधात निषेध केला. त्यानंतर राज्य सरकारने ‘फॉक्सकॉन’ला कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सूचनांसह पत्र लिहिले. २०२४ मध्ये ‘रॉयटर्स’ने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की प्लांटमधील कार्यालयात विवाहित महिलांना त्यांच्या अविवाहित सहकाऱ्यांपेक्षा जास्त कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. या कारणास्तव काम करण्यापासून रोखले जाते.
असे असताना भारतात स्मार्टफोन उत्पादनात अल्पावधीतच लक्षणीय वाढ झाली आहे. भारत सरकारच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेमुळे देशात अॅपलचा उत्पादन आधार वाढण्यास मदत झाली आहे, असे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले होते. या योजनेमुळे कंपन्यांनी विक्री आणि गुंतवणूक लक्ष्यांची विशिष्ट मर्यादा पूर्ण केल्यास त्यांना पैसे देण्याची परवानगी मिळते. सरकारने २०२२-२३ ते २०२४-२५ दरम्यान स्मार्टफोन उत्पादनासाठी १९ कंपन्यांना सुमारे एक अब्ज डॉलर्स दिले. ही पद्धत झेंगझोऊमधील चिनी मॉडेलशी साम्य असणारी आहे. २०२३-२४ मध्ये भारताने सुमारे १५ अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले. या वर्षाच्या सुरुवातीला भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा स्मार्टफोन उत्पादक देश बनला.