१ जानेवारी २०२५ पासून थायलंड भारतीय पासपोर्टधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा (ई-व्हिसा) प्रणाली लागू करणार आहे. पर्यटन आणि छोट्या व्यावसायिक भेटींसाठी ६० दिवसांची व्हिसा सूट पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. थाई दूतावासाच्या मते, सर्व प्रकारच्या व्हिसांसाठीचे अर्ज ‘thaievisa.go.th’ या वेबसाइटद्वारे सबमिट केले जाणे आवश्यक आहे. “नवी दिल्लीतील रॉयल थाई दूतावास ऑफलाइन पेमेंट पद्धतीसह थायलंडची इलेक्ट्रॉनिक व्हिसा (ई-व्हिसा) प्रणाली भारतात लागू करण्याची घोषणा करू इच्छित आहे,” असे एका निवेदनात म्हटले आहे.
ई-व्हिसा म्हणजे काय?
ई-व्हिसा किंवा इलेक्ट्रॉनिक व्हिसा एक डिजिटल प्रवास परवाना आहे, या प्रणालीमुळे प्रवाशांना व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. ही प्रणाली व्हिसा अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आली आहे आणि त्यात अधिक सोयीसाठी ऑफलाइन पेमेंट पर्यायही समाविष्ट आहे. या प्रणाली अंतर्गत जारी केलेले इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ईटीए) थायलंडमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देते आणि हा व्हिसा ६० दिवसांपर्यंत वैध असतो, त्यात ३० दिवसांचा मुक्काम वाढवण्याचाही पर्याय आहे.
हेही वाचा : ‘Ghost Gun’ म्हणजे काय? गुन्हेगारांमध्ये याचा वापर का वाढतोय?
ईटीए असलेले प्रवासी चेकपॉईंटवर स्वयंचलित इमिग्रेशन गेट्समध्ये प्रवेश करू शकतात, त्यांच्या ईटीएवर क्यूआर कोड स्कॅन करून जलद क्लिअरन्स करते. यात सिस्टीम व्हिसा-सवलत असलेल्या नागरिकांच्या मुक्कामाच्या कालावधीचेदेखील निरीक्षण केले जाते. ई-व्हिसा प्रणाली अंतर्गत व्हिसा अर्जांवर व्हिसा शुल्क मिळाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत प्रक्रिया केली जाते. सध्याच्या प्रणालीनुसार, साधारण पासपोर्टसाठी अर्ज १६ डिसेंबरपर्यंत नियुक्त व्हिसा प्रक्रिया कंपन्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. डिप्लोमॅटिक आणि अधिकृत पासपोर्ट अर्ज २४ डिसेंबरपर्यंत दूतावास किंवा वाणिज्य दूतावास-जनरल यांना सादर करणे आवश्यक आहे.
भारतासाठी थायलंडच्या ई-व्हिसाचे महत्त्व काय?
भारत आणि थायलंड हे शेजारी राष्ट्रे आहेत, जे अंदमान समुद्रात सागरी सीमा सामायिक करतात. या दोन देशांनी शतकानुशतके सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीने मजबूत संबंध निर्माण केले आहेत. थायलंडमध्ये राहणारे आणि काम करणाऱ्या परदेशस्थ भारतीयांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे दोन देशांतील संबंध आणखी मजबूत झाले आहेत. बँकॉक, पट्टाया, फुकेत, चियांग माई आणि कोह सामुई हे भारतीय पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. हा देश भारतीय विवाह नियोजक आणि हनिमून पर्यटनासाठीदेखील एक केंद्र आहे. २०१९ मध्ये दोन दशलक्षाहून अधिक भारतीय पर्यटकांनी थायलंडला भेट दिली. मागील काही वर्षांच्या तुलनेत यात लक्षणीय वाढ झाली आहे.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत थायलंडमध्ये जवळपास १.६४ दशलक्ष भारतीय पर्यटकांची नोंद करण्यात आली होती. मलेशिया आणि चीननंतर भारत हा तिसरा सर्वात मोठा देश आहे, जेथील पर्यटक थायलंडला भेट देतात, असे ‘बिझनेस स्टँडर्ड’ने वृत्त दिले आहे. थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाने (टीएटी) वर्षाच्या अखेरपर्यंत दोन दशलक्षाहून अधिक भारतीय पर्यटकांची अपेक्षा केली आहे; ज्यामुळे जवळपास ९० अब्ज थाई बाह्ट (थायलंड चलन) महसूल देशाला मिळेल. या वाढीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे थायलंडचे भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश धोरण. हे धोरण नोव्हेंबर २०२४ मध्ये अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आले होते. हे धोरण भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय ६० दिवसांपर्यंत राहण्याची परवानगी देते. त्यांना ३० दिवसांची मुदत वाढवण्याचादेखील पर्याय मिळतो.
इतर कोणते देश भारतीयांना ई-व्हिसा सुविधा देतात?
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी असे दहा देश आहेत, जेथे भारतीय पासपोर्टधारक ई-व्हिसासाठी अर्ज करू शकतात:
१. फिलीपिन्स: फिलीपिन्सने अलीकडेच भारतीय पर्यटकांसाठी ई-व्हिसा प्रणाली सुरू केली आहे. सध्या एकल-प्रवेश ई-व्हिसा उपलब्ध आहेत आणि ३० दिवसांच्या मुक्कामाची परवानगी आहे. मुदत वाढवायची असल्यास स्वतंत्र नूतनीकरण अर्ज आवश्यक आहे. ई-व्हिसासाठी प्रक्रिया करण्याची वेळ सामान्यतः १० ते १५ दिवस असते.
२. कंबोडिया: प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, वास्तुकला आणि बाजारपेठांसाठी ओळखले जाणारे कंबोडिया ३० दिवसांसाठी वैध एकल-प्रवेश ई-व्हिसा देते. या ई-व्हिसांवर प्रक्रिया करण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो.
३. तुर्की: बीजान्टिन आणि ओटोमन साम्राज्यातील सांस्कृतिक वारसा संपन्न देश तुर्की १८० दिवसांसाठी ई-व्हिसा प्रदान करते. पर्यटक ३० दिवसांपर्यंत देशात राहू शकतात. प्रक्रिया करण्याची वेळ सामान्यतः २४ तास असते, परंतु हा कालावधी निवडलेल्या प्रक्रिया श्रेणीनुसार बदलू शकते.
४. न्यूझीलंड: भारतीय पर्यटक न्यूझीलंड ई-व्हिसासाठी अर्ज करू शकतात, ज्या अंतर्गत पर्यटक १८० दिवसांपर्यंत देशात मुक्काम करू शकतात. एक वर्षासाठी वैध असलेला हा ई-व्हिसा फक्त एकाच प्रवेशास परवानगी देतो. अर्ज प्रक्रियेस सुमारे चार आठवडे लागतात.
५. दुबई: लक्झरी आणि आधुनिक आर्किटेक्चरसाठी ओळखले जाणारे जागतिक पर्यटनाचे हॉटस्पॉट दुबई ई-व्हिसा ऑफर करते, ज्या अंतर्गत ३० दिवसांच्या मुक्कामाची आणि एकाच प्रवेशाची परवानगी मिळते. अर्ज प्रक्रिया कालावधी तीन ते पाच दिवसांच्यादरम्यान असतो.
६. दक्षिण कोरिया: पॉप कल्चर आणि समृद्ध सांस्कृतिक अनुभवासाठी ओळखले जाणारे दक्षिण कोरिया त्याच्या ई-व्हिसा प्रणाली अंतर्गत ९० दिवसांच्या मुक्कामाची परवानगी देते. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सामान्यत: १० ते १३ दिवस लागतात.
७. जपान: परंपरा आणि आधुनिकतेच्या मिश्रणासाठी प्रसिद्ध असलेला जपान ९० दिवसांपर्यंत एकल-प्रवेशासाठी ई-व्हिसा प्रदान करते. अर्ज प्रक्रियेस सहसा पाच ते १० दिवसांचा कालावधी लागतो.
८. इजिप्त: प्राचीन पिरॅमिड आणि समृद्ध इतिहासासाठी ओळखले जाणारे इजिप्त ३० दिवसांच्या वैधतेसह एकल-प्रवेशासाठी ई-व्हिसा प्रदान करते. अर्ज प्रक्रिया वेळ सुमारे पाच ते सात दिवसांचा असतो.
९. पापुआ न्यू गिनी: वाळवंट आणि आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी ओळखले जाणारे पापुआ न्यू गिनी ६० दिवसांच्या वैधतेसह ई-व्हिसा प्रदान करते आणि अर्ज प्रक्रिया कालावधी १० ते १५ दिवसांचा असतो.
१०. जॉर्जिया: युरोप आणि आशियाच्या क्रॉसरोडवर वसलेले जॉर्जिया त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. त्याचा ई-व्हिसा ३० दिवसांपर्यंत एकल प्रवेशास परवानगी देतो आणि अर्ज प्रक्रियेस पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागतो.