तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजय राजकारणात आला आहे. त्याने स्वत:चा ‘तमिझगा वेत्री कळघम’ नावाचा पक्ष काढला आहे. २०२६ साली होणाऱ्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. याच पार्श्वभूमीवर थलपती विजयचा राजकाणात येण्याचा निर्णय कितपत सार्थ ठरणार आहे? त्याच्यासमोर कोणती आव्हानं असतील? याआधी अशाच पद्धतीने सुरू केलेल्या पक्षांचे नेमके काय झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
एमजीआर यांच्यानंतर विजय राजकारणात
तमिळनाडूच्या राजकारणात एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) हे दिग्गज राजकारणी होऊन गेले. तेही तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. अभिनय क्षेत्रात लाखोंनी चाहते कमावल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि पुढचे कित्येक वर्षे तमिळनाडूच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला. आता विजयदेखील राजकाणात आला आहे, त्यामुळे त्याला यात किती यश येणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
३० टक्के मतदारांकडे थलपती विजयचे लक्ष
तमिळनाडूच्या राजकारणावर नेहमी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या दोनच पक्षांचा प्रभाव राहिलेला आहे. मतांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तमिळनाडूतील साधारण ७० ते ८० टक्के मतदार या दोन्ही पक्षांच्या मागे उभे असतात. उर्वरित २० ते ३० टक्के मतांना मिळवण्यासाठी इतर पक्षांची धडपड असते. थलपती विजयच्या पक्षाचाही तोच प्रयत्न असणार आहे.
याआधीच्या नव्याने स्थापन झालेल्या पक्षांनी काय मिळवले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी. के. मूपनार यांनी १९९६ मध्ये तमिळ मनिला काँग्रेस (टीएमसी) या पक्षाची स्थापना केली होती. अभिनेता कॅप्टन विजयकांत यांनीदेखील २००५ मध्ये देसिय मुरपोक्कू दर्विड कळघम (डीएमडीके) या पक्षाची स्थापना केली होती. थलपती विजयचे चाहते विजयकांत यांच्या तुलनेत अधिक आहेत. विजयकांत यांची राजकीय कारकीर्द अल्पकाळ होती. मात्र, त्या काळात त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात आपला ठसा उमटवला.
आतापर्यंत कोण-कोण राजकारणात आलं?
चित्रपट दिग्दर्शक सीमन यांनीदेखील २००९ साली नाम तमिळार काटची (एनटीके) नावाचा पक्ष सुरू केला होता. सीमन यांनीदेखील काही काळासाठी तमिळनाडूच्या राजकारणावर आपला प्रभाव पाडला होता. माजी केंद्रीय मंत्री अबूमानी रामदोस यांनी मी पट्टाली मक्कल काटची पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आहे, असे सांगत २०१४ ते २०१६ या काळात तमिळनाडूच्या राजकारणात पाऊल ठेवले होते, मात्र यात त्यांना यश आले नाही.
सध्या के अण्णामलाई चर्चेचा विषय
अभिनेता कमल हसन यांनीदेखील २०१८ साली मक्कल निधी मियाम (एमएनएम) नावाचा पक्ष सुरू केला होता. माझा पक्ष हा डीएमके आणि एआयएडीएमके पक्षाला पर्याय आहे, असे ते लोकांना सांगत होते. मात्र, लोकांना आकर्षित करण्यात त्यांना यश आले नाही. सध्या ते डीएमके-काँग्रेस यांच्या युतीत असून २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत एक जागा मिळावी अशी मागणी करत आहेत. २०२१ सालापासून माजी आयपीएस अधिकारी तथा भाजपाचे नेते के. अण्णामलाई तमिळनाडूच्या राजकारणात चर्चेचा विषय आहेत.
जात, धर्म, वर्ग आणि प्रदेशापलीकडे जाऊन मतं मागणार?
थलपती विजय हा तमिळनाडूमध्ये अभिनेता म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हीच बाब त्याला राजकारणात आपले बस्तान बसवण्यासाठी महत्त्वाची आणि मदतीची ठरणार आहे. थलपती विजय हा मूळचा ख्रिश्चनधर्मीय आहे. त्यामुळे तो तमिळनाडूतील उदयार या मागास समाजाला मतं मागू शकतो. मात्र, तमिळनाडूतील राजकीय जाणकारांनुसार थलपती विजय जात, धर्म, वर्ग आणि प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे.
विजय मदुराई मतदारसंघातून निवडणूक लढवणार?
विजयकांत यांना बी आणि सी श्रेणीच्या थिएटरचे राजा म्हटले जायचे. याच कारणामुळे त्यांनी ग्रामीण मतदारांची संख्या असणाऱ्या विरुधाचलम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दुसरीकडे हसन यांनी शहरी मतदार लक्षात घेऊन कोईम्बतूर दक्षिण या मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, थलपती विजयचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांना मल्टिप्लेक्सपासून ते सी श्रेणीतील चित्रपटगृहांपर्यंत मोठा चाहतावर्ग असतो. विजयचे ग्रामीण भागात मोठे चाहते असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांना वाटते. याच कारणामुळे विजयला आम्ही मदुराई या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा सल्ला देऊ, असे विजयच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले.
विचारधारा घेऊन लोकांमध्ये जावे लागणार
थलपती विजय चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असला, तरी राजकाणात येण्यासाठी ही प्रसिद्धी पुरेशी नसणार आहे. राजकारणातही यशस्वी व्हायचे असेल तर विजयला लोकांपुढे एक निश्चित विचारधारा घेऊन जावे लागेल. थेट विचारधारा, अजेंडा नसल्यामुळे विजयनाथ आणि कमल हसन यांना राजकारणात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. दुसरीकडे एमजीआर यांना मात्र राजकारणात मोठे यश मिळाले होते. त्यांचे राजकारण द्रविड चळवळीशी निगडित होते, त्याचाच परिणाम म्हणून ते तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकले. विजयलादेखील राजकारणात दीर्घकाळ टिकायचे असेल तर एक निश्चित विचारधारा समोर ठेवावी लागेल.
“सध्या विभाजनवादी राजकारणाची संस्कृती”
थलपती विजयने जारी केलेल्या निवेदनात त्याने आपल्या नव्या पक्षाबद्दल तसेच आगामी राजकारणाबद्दल भाष्य केले आहे. “सध्याच्या राजकारणाशी तुम्ही सगळे परिचित आहातच. एकीकडे भ्रष्टाचार आणि कलंकित राजकारणाची संस्कृती आहे, तर दुसरीकडे विभाजनवादी राजकारणाची संस्कृती पाहायला मिळतेय. या माध्यमातून लोकांचे जात आणि धर्माच्या नावावर विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपली प्रगती आणि एकता यांच्यात हे सर्व अडथळे आहेत,” असे विजयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
मदतीसाठी कोणत्याही बड्या व्यक्तीची साथ नाही
थलपती विजयला संपूर्ण तमिळनाडूत ओळख असली तरी पक्ष म्हणून फक्त विजय पुरेसा नाही. आपल्या या पक्षात विजयला आणखी काही मोठे, महत्त्वाचे आणि प्रसिद्ध चेहरे लागणार आहेत. विजयकांत राजकारणात आले, तेव्हा त्यांना पाणरुती एस. रामचंद्रन या दिग्गज राजकारण्यांनी मदत केली होती. विजयला मात्र अशा प्रकारची मदत करणारा कोणाही नाही. त्यामुळे विजयला आणखी लोकांना पक्षात घ्यावे लागणार आहे. विजय हा फार बोलका नाही, त्यामुळे पक्ष वाढवायचा असेल, तर त्याला यावरही काम करावे लागेल.
विजयची अनेक बड्या व्यक्तींशी चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार विजयची तमिळनाडूतील अनेक लोकांशी चर्चा सुरू आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी एम. रवी, तमिळनाडूचे निवृत्त डीजीपी सी. शैलेंद्र बाबू, माजी आयएएस अधिकारी यू. सगायम यांच्याशी विजयची बोलणी चालू आहेत. ही चर्चा यशस्वी ठरल्यास वरील मंडळी त्याच्या पक्षात प्रवेश करू शकतात.
थलपती विजयला विस्तार करण्याची संधी आहे का?
थलपती विजयने प्रयत्न केल्यास त्याच्या पक्षाचा तमिळनाडूमध्ये विस्तार होऊ शकतो. कारण २०१६ साली जे. जयललिता यांचे निधन झाल्यानंतर एआयएडीएमके पक्ष झगडत आहे. जयललिता यांच्यानंतर या पक्षाकडे तेवढेच प्रभावी नेतृत्व नाही. हा पक्ष आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे.
विजय २०२४ सालची विधानसभा निवडणूक लढवणार?
दुसरीकडे डीएमकेसारख्या पक्षांनीदेखील विजयच्या राजकारणात येण्यावर कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. विजय राजकारणात येऊ शकतो याची चाहूल जून २०२३ मध्ये लागली होती. मात्र, डीएमकेसह कोणत्याही पक्षाने त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. सध्या विजय प्रत्यक्ष राजकारणात आला आहे. त्याचा पक्ष २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. मात्र, २०२६ सालच्या विधानसभा निवडणुकीत विजय निवडणुकीच्या रिंगणात उडी घेणार आहे.