स्वमालकीचे धरण नसल्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिकेला वाढत्या नागरीकरणामुळे पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. यानुसार शहराला प्रतिदिन १११६ दशलक्षलिटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. वेगवेगळ्या स्रोतांमार्फत हे वाढीव पाणी मिळविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असले तरी हा कोटा मंजूर होईपर्यंत टंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. यातूनच प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी मुंबई महापालिकेकडून प्रतिदिन २५ दशलक्षलिटर इतके वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यास मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या काही दिवसांत ठाण्याला वाढीव पाणी मिळण्याची चिन्हे आहेत. या पाण्यामुळे ठाण्यातील पाणी टंचाईच्या झळा कमी होतील का आणि कोणत्या भागाला वाढीव पाण्याचा फायदा होऊ शकेल, याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे महापालिका क्षेत्राला किती पाणी पुरवठा?

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला चार जलस्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलिटर इतकाच पाणी पुरवठा होतो. यामध्ये एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण, मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेची स्वत:ची योजना या चार स्रोतांचा सामावेश आहे. ठाणे महापालिकेचे स्वमालकीचे धरण नाही. यापूर्वी शाई धरणाचा प्रस्ताव पुढे आला होता. परंतु तो अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला पाणी पुरवठ्यासाठी विविध स्रोतांवरच अवलंबून रहावे लागत आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेकडून ६५ दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा ठाणे शहरात होत होता. पैकी ३० दशलक्षलिटर इतके पाणी शुद्धीकरण प्रक्रियेविनाच पुरवठा केले जात होते. दोन वर्षांपासून शुद्धीकरण प्रक्रिया करून पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा >>> निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?

कोणत्या भागाला किती पाणी?

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ११५ दशलक्षलिटर, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलिटर, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलिटर, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ६५ दशलक्षलिटर, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात ६८ दशलक्षलिटर, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात ५३ दशलक्षलिटर, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात ४५ दशलक्षलिटर, उथ‌ळसर प्रभाग समिती क्षेत्रात ५५ दशलक्षलिटर, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ५१ दशलक्षलिटर असा एकूण ५८५ दशलक्षलिटर इतका प्रतिदिन पाणी पुरवठा होतो. दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने २० दशलक्षलिटर वाढीव पाणी मंजूर केले आणि त्याचा पुरवठाही सुरू केला. यामुळे ६५ ऐवजी आता ८५ दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा मुंबई महापालिकेकडून ठाण्याला होतो. २० दशलक्षलिटरपैकी इंदिरानगर भागात १० दशलक्षलिटर तर, किसननगर आणि आनंदनगर भागात १० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या भागांना पाणी दिलासा मिळाला असला तरी वाढत्या नागरीकरणामुळे नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या जाणवते.

हेही वाचा >>> विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?

पाणी बंदमुळे टंचाईत भर कशी पडते?

ठाणे शहराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून शहरात आजही मोठमोठी गृहसंकुले उभी राहात आहेत. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात आजही नवनवीन गृह प्रकल्प उभे राहात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे टंचाईची समस्या जाणवतेच, शिवाय इतरही कारणे आहेत. यामध्ये धरण क्षेत्रातील पाणी नियोजन, जलवाहिन्या दुरुस्ती, विद्युत पुरवठा खंडित होणे, अतिवृष्टीमुळे पाणी उचल प्रक्रियेवर होणारा परिणाम अशा कारणांमुळे पाणी पुरवठा ठप्प होतो. पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो.

पालिकेच्या आराखड्यानुसार किती गरज?

भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी सद्यःस्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडणार आहे. ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला. त्यावेळेस शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी ४५ टक्के वाढ होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान, पायाभूत सुविधा, क्लस्टर योजना याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यःस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात प्रतिदिन १११६ दशलक्षलिटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. सद्यःस्थितीत शहराला दररोज ६१६ दशलक्षलिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर असून उर्वरित ४०० दशलक्षलिटर इतके वाढीव पाणी सूर्या, भातसा या धरणांसह स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळावे यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केल आहेत. याशिवाय, एमएमआरडीएच्या प्रस्तावित काळू धरणामध्ये ४०० दशलक्षलिटर इतका पाणी कोटा मंजूर करावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला असून याबाबत बैठकाही पार पडल्या आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

मुंबई महापालिकेकडे मागणी

शहराला प्रतिदिन १११६ दशलक्षलिटर इतका पाणी कोटा मंजूर होईपर्यंत पाणीटंचाईवर तात्पुरती मात करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचा एक भाग म्हणून सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या जाणवत असलेल्या घोडबंदर भागासाठी ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलिटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी केली. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हे वाढीव पाणी मिळावे यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींही पुढाकार घेतला आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकतीच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर मुंबई आणि ठाणे महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० पैकी २५ दशलक्षलिटर पाणी तातडीने मिळावे असा केळकर यांनी आग्रह धरला. त्यावर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. तसेच याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा याविषयावर देखील चर्चा झाली. यामुळे येत्या काही दिवसांत हे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता आहे. घोडबंदर म्हणजेच माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ११५ दशलक्षलिटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी याठिकाणी आणखी १५ ते २० दशलक्षलिटर वाढीव पाण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेकडून पाणी मिळाल्यास घोडबंदर भागातील नागरिकांना जलदिलासा मिळेल.