-निलेश पानमंद
ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार कमी व्हावा यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार असून या स्थानकाच्या आराखड्यास रेल्वे विभागाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. रेल्वे हद्दीतील कामे रेल्वे विभागामार्फत तर इतर कामे महापालिका करणार असून या संपूर्ण प्रकल्पाचे काम स्मार्ट सिटी योजनेतून होणार आहे. त्याचबरोबर नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशा कामांची निविदा महापालिकेने यापूर्वीच काढली आहे. त्यापैकी रस्त्यांची कामेही सुरू केलेली आहेत. तरीही हा प्रकल्प अजूनही कागदावरच असल्याचे चित्र आहे. नव्या स्थानकाचे घोडे नेमके अडले कुठे, असा सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे.
ठाणे स्थानकाचे महत्त्व काय?
मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे म्हणून ठाणे स्थानक ओळखले जाते. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा २००८मध्ये अभ्यास करून महापालिकेने एक अहवाल तयार केला होता. त्याआधारे या स्थानकावर प्रवाशांचा वाढलेला भार कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेत नवे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि अधिकारी, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन या सर्वांच्या अनेक संयुक्त बैठका झाल्या होत्या. या बैठकांनंतर महापालिका प्रशासनाने नवे स्थानक उभारण्यासाठीचा आराखडा तयार केल. त्यास रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. त्यामुळे या स्थानकाच्या प्रस्तावास वेग आला खरा. मात्र मनोरुग्णालयाच्या जागेवर हे स्थानक उभे राहणार असल्यामुळे त्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी आवश्यक आहे. या जागेच्या हस्तांतरणाबाबत आरोग्य विभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये जागा हस्तांतरणाबाबत सकारात्मकता चर्चा झाली असली तरी ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
काय आहे प्रकल्प?
नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी, फलाट तयार करणे, रेल्वे मार्गिका तयार करणे, स्थानकावर छप्पर टाकणे, प्रवाशांकरीता पुलांची उभारणी करणे तसेच इतर कामे रेल्वे विभागामार्फत केली जाणार असून त्यासाठी महापालिका स्मार्ट सिटी योजनेतून ११९.३२ कोटी रुपये रेल्वे विभागाला देणार आहे. तर, स्थानकाबाहेरील परिसरात रस्ते, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशी कामे महापालिकेमार्फत करण्यात येणार आहेत. याशिवाय, ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाप्रमाणेच याठिकाणी डेक उभारण्यात येणार आहे. या कामांसाठी १४२.७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाच्या निविदा यापूर्वीच महापालिकेने अंतिम केल्या असून त्यापैकी नव्या स्थानकाकडे जाणारे रस्ते तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
जागा हस्तांतरणातील काय अडचण आहे?
मनोरुग्णालयाच्या जागेसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशामुळे राज्याच्या आरोग्य विभागाला नवीन रेल्वे स्थानकासाठी महापालिकेला जागा हस्तांतरित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प किती महत्त्वाचा हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असून या प्रकल्पाच्या उभारणीकरिता जागा हस्तांतरित करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. त्यावर उच्च न्यायालय काय निर्णय देते, यावरच या प्रकल्पाची पुढील दिशा ठरणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
शहराच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे प्रकल्प ?
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज पाच लाख प्रवासी प्रवास करतात. त्याचप्रमाणे मुुलुंड रेल्वे स्थानकातूनही लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. या स्थानकांवर प्रवाशांचा भार वाढला आहे. तो कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील ३५ टक्के तर, मुलुंड रेल्वे स्थानकातील २५ टक्के गर्दी कमी होणार आहे. या स्थानकाचा फायदा घोडबंदर, वागळे इस्टेट, पोखरण रोड परिसरातील प्रवाशांना होणार आहे. त्याचबरोबर नव्या स्थानकामुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक विभागली जाणार असून यामुळे स्थानक भागातील कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
नव्या आयुक्तांसमोर कोणती आव्हाने?
मुलुंड आणि ठाणेदरम्यानच्या नवीन स्थानक प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे कागदावरच आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी महापालिकेचे नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावले उचलली असली तरी अजून बरीच आव्हाने असणार आहेत. या नियोजित स्थानकाच्या विषयाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीत ते प्रकल्पाची माहिती घेण्याबरोबरच त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, याबाबत चर्चा करणार आहेत.