भारतीय संस्कृती ही वैविध्याने नटलेली आहे. या संस्कृतीचे प्राचीन अस्तित्त्व सांगणारे पुरावे आजही या भूमीत संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण नेहमीच भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळी मंदिरे, लेणी, शिल्प सापडल्याचे ऐकतो. या सगळ्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये असे काही सांस्कृतिक पुरावे सापडल्याचे फारच क्वचितप्रसंगी ऐकिवात येते. गेल्या वर्षभर हा भाग वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आलेलाही आपण पाहिला. त्यात संस्कृती हा विषय होताच, त्यावेळी प्रश्न मणिपूरचा असला तरी एकूणच ईशान्य भारताकडे काहीसे दुर्लक्षच होते. परंतु आता नव्याने समोर आलेल्या संशोधनात या पूर्व-ईशान्य भारताला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. इसवी सनाच्या ८ व्या शतकातील हिंदू- बौद्ध धर्मांच्या प्रसाराचे अस्तित्त्व सांगणारी शिल्प अलीकडेच उघडकीस आली आहेत. त्या निमित्ताने या शोधाचा घेतलेला हा मागोवा.

शिल्पांचा शोध कोणी लावला?

आसाम विद्यापीठ सिलचरचे एक प्राध्यापक डॉ. गणेश नंदी आणि त्यांच्या हाताखालील कार्यरत असणाऱ्या रिसर्च स्कॉलर डॉ. बिनॉय पॉल यांना आसाम-मिझोराम सीमेजवळील पहाडी भागात सुमारे १५०० वर्षे जुनी (इसवी सन ८ वे शतक) हिंदू-बौद्ध तत्त्वज्ञानाने प्रभावित शिल्पे सापडली आहेत. डॉ. गणेश नंदी  हे आसाम विद्यापीठाच्या दृश्यकला विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून तर डॉ. बिनॉय पॉल रिसर्च स्कॉलर म्हणून कार्यरत आहेत, या दोघांनी नमूद केल्याप्रमाणे आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यातून आसाम-मिझोराम राज्याची सीमा ओलांडून, ज्या ठिकाणी ही शिल्प आढळली आहेत तेथे पोहचण्यासाठी त्यांना जवळजवळ संपूर्ण रात्र जंगलातून प्रवास करावा लागला होता. 

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?

आणखी वाचा: भारत आणि इटलीच्या पुन्हा एकदा जुळतायत रेशीमगाठी, पण का? आणि कशासाठी?

शिल्पांचा काळ नेमका कोणत असावा? 

मिझोरामच्या मामित (Mamit) जिल्ह्यातील कोलालियन (Kolalian) गावात हे शिल्प सापडल्याचे त्यांनी सांगितले. त्या भागातील बहुतेक स्थानिक रेआंग (Reang) जमातीचे आहेत आणि ते हिंदू देवतांची पूजा करतात. डॉ. नंदी यांच्या मते, या शिल्पाकृतींमध्ये आणि त्रिपुरातील उनाकोटी तसेच पिलक येथे सापडलेल्या शिल्पांमध्ये साम्य आहे, उनाकोटी आणि पिलक येथे सापडलेली शिल्पे ७ व्या ते ९ व्या शतकादरम्यान तयार केलेली असावीत. “आमचा विश्वास आहे की, कोलालियनमध्ये सापडलेल्या शिल्पांची निर्मिती त्याच काळात झाली असावी,” असे नंदी म्हणाले. नंदी सांगतात, ‘ फक्त एकच पूर्ण आकाराची मूर्ती सापडली जी भगवान बुद्धांसारखी दिसते (या मूर्तीतील वेशभूषा आणि शैली बुद्धांसारखी आहे) परंतु या शिल्पाची रचना स्त्री मूर्ती सारखी असल्याने ती हिंदू देवता आहे की बौद्ध हे निश्चितपणे सांगता येत नाही. (महत्त्वाचे: यात हिंदू किंवा बौद्ध असा वाद निर्माण करण्याचा अभ्यासकांचा कोणताही उद्देश्य नाही, बराच काळ हे शिल्प अज्ञातवासात, आडवळणावर असल्याने शेवाळं तसेच इतर घटकांमुळे झाकोळले गेल्याने अभ्यासकांनी कोणताही ठाम दावा केलेला नाही) परंतु या शिल्पातील कलेचा प्रकार कंबोडियामध्ये सापडलेल्या बुद्ध मूर्तींशी साम्य साधणारा आहे, असे प्रथमदर्शनी नमूद करण्यात आलेले आहे. 

प्राचीन लिखित-मौखिक पुरावे कोणते?

डॉ नंदी सांगतात, ‘राजमाला’ (त्रिपुराच्या माणिक्य राजांचा इतिहास) या इतिवृत्तानुसार, महाराजा धन्य माणिक्य यांनी काही रेआंग बंडखोरांवर नियंत्रण मिळविण्याकरिता आपला सेनापती राय कचक याला या भागात पाठवले होते, त्या वेळेस त्यानी या ठिकाणी दुर्गा पूजा केली होती. “त्रिपुराच्या माणिक्य राज्यांतर्गत अनेक छोटी राज्ये होती आणि रेआंग हा त्यापैकी एक लहान गट होता. स्थानिक लोककथांनुसार, राय कचक काही वेळा येथे राहिले आणि त्यांनी या टेकडीवर दुर्गा पूजा केली,” राजमालानुसार, धन्य माणिक्य हे इसवी सन १४९० ते १५१५ या दरम्यान त्रिपुराचे महाराज तर राय कचक हे त्यांचे सेनापती होते. उदयपूर येथील त्रिपुरा सुंदरी मंदिरासह सुंदर दगडी बांधकाम असलेली अनेक मंदिरे धन्य माणिक्यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आली. परंतु कोलालियनमधील दगडी बांधकामे त्या काळात निर्माण झाली होती का याचा पुरावा नाही. 

प्रोफेसर नंदी यांनी नमूद केल्याप्रमाणे, या शिल्पांचा कला प्रकार गुप्त आणि पाल कालखंडातील कला प्रकारांसारखा आहे. “या शिल्पाची शैली, मूर्तींचे दागिने, पोशाख या गोष्टींचा विचार करता, हे गुप्त आणि पाल यांच्या काळात केलेल्या शिल्पांसारखेच आहे असे आपण म्हणू शकतो. त्रिपुरातील उनाकोटी (Unakoti) आणि पिलक (Pilak) येथेही अशाच स्वरूपाची शिल्प सापडतात. माझी इच्छा आहे की आम्हाला येथे आणखी मूर्ती पाहायला मिळतील,” असे नंदी म्हणाले. राजमालानुसार प्राचीन कचारला (Cachar)  हिडिंबाचे राज्य म्हटले जात होते आणि ते काही काळासाठी त्रिपुरा राज्याचा भाग होते. कदाचित आता सापडलेली शिल्प ही त्या कालखंडातील असू शकतात. कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तपशीलवार संशोधनाची आवश्यकता असेल,”असेही त्यांनी नमूद केले आहे.

स्थानिकांमुळे जतन 

प्राध्यापक नंदी यांनी भग्न मूर्तींची छायाचित्रे घेतली आणि त्यांच्या पुढील संशोधनात त्यांना असे आढळून आले की दागिन्यांमध्ये, विशेषत: स्त्री-रचनांवर, पाल आणि गुप्त काळातील शैलीचा प्रभाव आहे.  नंदी आणि पॉल यांच्या मते, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) आणि पूर्वीच्या संशोधकांना ही जागा माहितच नव्हती. परंतु, स्थानिक मात्र या शिल्पांना देव मानून त्यांचे संरक्षण करत होते. “जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा रेआंग समुदायातील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की तेथे कोणीही संशोधनासाठी आलेले नाही. आमच्या संशोधनानुसार, ही शिल्पे निःसंशयपणे बराक व्हॅलीच्या इतिहासातील अशा कलाकृतींपैकी सर्वात जुनी आहेत.” कोलालियनमधील स्थानिक रहिवाशांच्या मते, संपूर्ण टेकडी वेगवेगळ्या कलाकृतींनी भरलेली होती परंतु आता फक्त काही शिल्पेच शिल्लक आहेत. “आम्ही हिंदू धर्मावर विश्वास ठेवतो आणि पिढ्यानपिढ्या, आम्ही हिंदू देव आणि देवी म्हणून या मूर्तींची पूजा करत आहोत,” असे स्थानिक रहिवासी पीताराम रेआंग यांनी सांगितले आहे. आणखी एक स्थानिक रहिवासी, प्रदिप कुमार रेआंग यांनी हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राकडे नमूद केल्याप्रमाणे कोलालियन, रेंगडील आणि आसपासच्या भागात रेआंग आदिवासी राजांशी संबंधित किल्ले आणि इतर अनेक दगडी बांधकामे होती परंतु त्यापैकी बहुतेक बाहेरच्या लोकांनी नष्ट केली आहेत. “१९८९ पूर्वी हा आसामचा भाग होता आणि हा भाग मिझोरामचा झाल्यानंतर यावर हल्ले सुरू झाले. ही दगडी बांधकामे, शिल्पे नष्ट करण्यासाठी बाहेरील लोकांनी ग्रेनेड आणि इतर शस्त्रांचा वापर केला. आमचा वाटते आहे की येथील ९०% मौल्यवान शिल्पे नष्ट झाली आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. 

प्रदिप म्हणाले की त्यांनी संशोधक, भारतातील मुख्य भूमीतील मान्यवर- अभ्यासक आणि पत्रकारांना या कामांवर प्रकाश टाकण्यासाठी बोलावले कारण त्यांचा विश्वास होता की यामुळे शेवटच्या शिल्लक शिल्पांचे संरक्षण होईल. “आम्ही त्यांची (शिल्पांची) दुर्गा, शिव, लक्ष्मी, विष्णू आणि गणेश म्हणून पूजा करतो. आमची संपूर्ण संस्कृती या विश्वासावरच  आधारलेली आहे. येथील पुजारी कुटुंबही अनेक पिढ्या आपले कर्तव्य बजावत आहे. आम्ही असुरक्षित, कमकुवत आणि कमी संरक्षित आहोत पण आमचा विश्वास अतूट आहे,” असे ते पुढे म्हणाले.

आणखी वाचा: तब्बल ९३ वर्षांनी मोहेंजोदारोमध्ये सापडला ‘हा’ खजिना! 

अभ्यासकांचे मत 

ज्येष्ठ संशोधक आणि आसाम विद्यापीठ सिलचरचे माजी कुलगुरू डॉ जयंता भूषण भट्टाचार्जी यांनी सांगितले की, त्यांनी बराक खोऱ्यातील ऐतिहासिक वास्तूंवर अनेक दशके काम केले आहे, परंतु देशाच्या या भागात अशी महत्त्वाची कामे अस्तित्वात आहेत हे त्यांना माहीत नव्हते. त्यांच्या मते, भारताच्या या भागाच्या इतिहासावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणजे लेखक उपेंद्रचंद्र गुहा यांचे ‘कचरेर इतिब्रित्यो’ (Kacharer Itibrityo) हे पुस्तक आहे, परंतु पुस्तकात कोलालियनचा संदर्भ नाही. या भागाच्या भौगोलिक इतिहासाविषयी सांगताना प्राध्यापक भट्टाचार्जी म्हणाले, सुरुवातीच्या शतकांमध्ये या सपाट जमिनीवर संस्कृती मोठ्या प्रमाणात होती तसेच त्रिपुरा, श्रीहट्टा (सिलहेट) आणि दिमासा राज्यांना जोडणारा भाग होता. कोलालियन तेथेच आहे, त्यांच्या मते कोलालियन पूर्वी सुरमा खोऱ्याचा भाग होते. “आपण भूगोल पाहिल्यास, उनाकोटी, पिलक आणि हे कोलालियन एका विशिष्ट भौगोलिक मार्गावर आहेत आणि कोलालियनमध्ये सापडलेली शिल्पे १००० वर्षांहून अधिक जुनी असण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले. भट्टाचार्जी म्हणाले की या भूमीचा बहुतेक इतिहास मौखिक आहे आणि सर्वत्र पुराव्यांचा अभाव आहे परंतु प्राध्यापक नंदी आणि त्यांच्या संशोधकांच्या या शोधामुळे बराक खोरे आणि आसपासच्या परिसराचा इतिहास बदलण्याची क्षमता आहे.“आम्ही अनेक ऐतिहासिक वास्तू गमावल्या आहेत पण आता या वास्तूंचे जतन आणि संरक्षण केले पाहिजे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहे आणि त्यांना तेथे आणखी गोष्टी, अवशेष मिळू शकतील,” ते म्हणाले.

एएसआय, गुवाहाटी येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की ते परिसराला भेट देण्याची तयारी करत आहेत आणि आसाम विद्यापीठ सिलचरचे एक पथक त्यांच्यासोबत जाईल.