तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र, मंत्री व अभिनेता असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माची तुलना ‘डास, डेंग्यू, मलेरिया व करोना‘शी केली. त्यानंतर भाजपाने या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, उदयनिधीच्या विधानावर देशभरात वाद सुरू आहेत. सनातन धर्माला अनेकदा हिंदू धर्माचा समान अर्थी शब्द म्हणून पाहिले जाते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा ‘आमच्या धर्मावर’ हल्ला असल्याचे म्हटले. सनातन धर्म म्हणजे नेमके काय? हिंदू धर्म आणि सनातन धर्मात काही फरक आहे का? अनेक पुरोगामी पक्ष किंवा नेतेमंडळींकडून सनातन धर्मावर जहाल टीका होण्याची कारणे काय आहेत? आणि भाजपासारख्या पक्षांकडून किंवा इतर हिंदू संघटनांकडून सनातन धर्माच्या विरोधातील वक्तव्यांना एवढे तीव्र प्रत्युत्तर का मिळते? या प्रश्नांचा धांडोळा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा हा प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनातन धर्माची उत्पत्ती आणि मुळे

सनातन धर्म हा संस्कृत शब्द असून, त्याचा शब्दशः अर्थ ‘शाश्वत धर्म’ किंवा ‘शाश्वत कायदा’ असे केले जाते. सनातन धर्माला ‘अचल’, ‘धर्मोपदेश’ किंवा ‘प्राचीन’ व ‘निरंतर मार्गदर्शन’, असेही म्हटले जाते. पौराणिक अभ्यासक व लेखक देवदत्त पटनायक यांनी ट्विटरवर (आता एक्स) एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात सनातन धर्म म्हणजे काय? याबद्दलची माहिती दिली. पटनायक यांनी सांगितले की, सनातन म्हणजे शाश्वत; ज्याचा अंत होत नाही. सनातन हा शब्द वेदांमध्ये आढळत नाही.

भगवदगीतेमध्ये सनातन शब्द वापरण्यात आला असून, तो आत्म्याशी निगडित असल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या लेखात म्हटले आहे. तर देवदत्त पटनायक यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले, “ज्या धर्मात आत्मा आणि पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो, त्याला सनातन धर्म म्हणतात. आत्म्याचा, पुनर्जन्माचा अंत होत नाही. सनातन याचा अर्थच ज्याचा अंत नाही; हिंदू, बौद्ध व जैन यांना सनातन धर्म असल्याचे म्हटले जाते. कारण- या धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो. सनातन धर्माला १९ व्या शतकात राजकारणाशी जोडले गेले. १९ व्या शतकात अनेक समाजसुधारकांनी वर्णव्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलला. महिलांची गुलामगिरी, जातिवादाला समाजसुधारकांनी विरोध केला; पण काही रूढीवादी लोकांनी समाजसुधारकांना विरोध करून जातिव्यवस्था, वर्णव्यवस्थेचे समर्थन केले. मुलींना शाळेत पाठवण्यास या लोकांनी विरोध केला. या रूढीवादी लोकांना सनातनी असल्याचे म्हटले गेले. अशा पद्धतीने सनातन धर्माच्या शब्दाचा वापर झाला.”

हे वाचा >> सनातन धर्म मुद्दय़ावरून भाजप आक्रमक विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान; उदयनिधी स्टॅलिन यांच्या माफीची मागणी

केंब्रिज विद्यापीठातील हिंदू धर्म आणि धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणारे निवृत्त प्राध्यापक जुलियस जे. लिपनर यांनी “हिंदुज : देअर रिलिजियस बिलिफ अँड प्रॅक्टिस” (Hindus : Their Religious Beliefs and Practices – 1994) हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, सनातन धर्माचा उल्लेख अर्जुनाने महाभारतात केलेला आहे. कृष्णाशी संवाद साधताना अर्जुन म्हणतो, “जेव्हा कुळ विकृत होते, तेव्हा त्या कुळाचा सनातन धर्म नष्ट होतो”. लिपनर यांनी पुढे म्हटले की, सनातन धर्माचा उल्लेख द्रौपदीनेही एके ठिकाणी केल्याचे आढळते. “जेव्हा कुणीही तिच्या मदतीला येत नाही, तेव्हा ती सनातन धर्माचा उल्लेख करते.”

पटनायक म्हणतात की, सनातन धर्माची संज्ञा हिंदू धर्माशी संबंधित असली तरी जैन व बौद्धांनाही ती लागू पडते; मात्र जे धर्म एकाच जन्मावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जात नाही. जसे की, पूर्वेत उगम पावलेल्या यहुदी, ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जात नाही.

अगदी अलीकडे म्हणजे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला इतर धर्मांपेक्षा वेगळा धर्म असल्याचे सांगण्यासाठी सनातन धर्माचा वापर केला जातो. हिंदू धर्मातील विशिष्ट एकजिनसीपणा असल्याचे सांगण्यासाठी ही संज्ञा वापरली जात असली तरी एकजिनसीपणा नेमका कसा आहे? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या लेखात म्हटले गेले आहे.

लिपनर यांनी नमूद केले आहे की, अनेक हिंदू धर्मीय स्वतःला सनातनवादी असल्याचे म्हणवतात. म्हणजेच ते शाश्वत धर्माचे पालन करतात; पण शाश्वत धर्म काय आहे, हे स्पष्ट होत नाही. लिपनर यांनी लिहिले आहे की, काही वैश्विक मान्यताप्राप्त तत्त्वज्ञानाच्या आधारे मला अद्याप हिंदू सनातन धर्म शोधायचा आहे.

हे वाचा >> उदयनिधी स्टॅलिन यांच्यानंतर प्रकाश आंबेडकरांकडूनही सनातन धर्माबाबत ट्वीट; म्हणाले, “अस्पृश्यता…”

१९ व्या शतकातील सनातन धर्म

इतिहासकार जॉन झॅवोस यांनी २००१ साली ‘डिफेंडिंग हिंदू ट्रेडिशन’ या लेखात नमूद केले की, सनातन धर्म हा वसाहतवादी भारतातील रूढी-परंपरांना चिकटून बसलेल्यांचे प्रतीक मानले गेले. त्यांनी पुढे म्हटले की, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध धार्मिक सभांचा उदय झाल्यानंतर त्यांच्या धार्मिक प्रचारामुळे या शब्दाला आणखी वलय प्राप्त झाले.

वर ज्याप्रमाणे देवदत्त पटनायक यांनी सांगितले की, १९ व्या शतकात सुधारणावादी चळवळ चालविणाऱ्यांना विरोध करण्यासाठी रूढीवादीही पुढे सरसावले होते. त्यातून सनातन धर्म हा शब्द अधिक प्रचलित झाला. मिशनरी, ब्राह्मो समाज व आर्य समाज यांनी सुधारणावादी चळवळ सुरू केल्यानंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून रूढीवादी लोकांनीही धार्मिक चळवळीला वेग आणला होता. त्या काळाच्या राजकीय गरजेपोटी सनातन धर्म याचा उल्लेख वाढीस लागला.

त्यासाठी पंजाबचे उदाहरण पाहू. पंजाबमध्ये पंडित श्रद्धा राम हे आधुनिक सनातनवादी चळवळीशी जोडले गेलेले नाव आहे. त्यांच्या कारकिर्दीत सनातन चळवळीला वेग आला. असे मानले जाते की, दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना करून हिंदू धर्मातील जुन्या चालीरीती बाजूला करून सुधारणांची चळवळ सुरू केली. या कामाच्या प्रचारासाठी ते पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या कार्याला प्रत्युत्तर म्हणून श्रद्धा राम यांनी हिंदू धर्मातील रूढी-परंपरा आणखी दृढ होण्यासाठी सनातन धर्माला पुढे केले.

दरम्यान, १८९० साली पंजाब प्रांतात पंडित दीनदयाळ शर्मा यांनी आर्य समाजाच्या शिकवणीला विरोध करण्यासाठी ‘सनातन धर्म सभा’ या नावाने एक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून शर्मा यांनी मूर्तिपूजा किंवा प्रतीकांच्या पूजेचे महत्त्व विशद केले. याच काळात राष्ट्रीय स्तरावर ‘भारत धर्म महामंडळ’ या संस्थेनेही सनातन धर्माच्या अनुषंगाने हिंदू धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यास प्राधान्य देऊन काम सुरू केले. ‘हिंदू महासभा’ संघटनेनेही सनातन धर्म या शब्दाचा उल्लेख हिंदू धर्मासाठी वापरला होता.

सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्मातील रूढीवादाचे समर्थन आणि सुधारणेला विरोध करणारा आहे, असा एक समज १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजामध्ये पसरला होता.

झॅवोस यांनी आपल्या लेखात १८९१ साली झालेल्या पंजाबच्या जनगणना अहवालाचा हवाला दिला. त्यात जनगणना अधीक्षकांनी आपले मत नोंदवताना म्हटले की, अनेक रूढीवादी हिंदूंनी स्वतःला सनातन धर्मीय असल्याचे सांगण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसली.

आणखी वाचा >> “सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

या जनगणना अहवालात जनगणना अधीक्षकांनी नमूद केले, “मोठ्या संख्येने लोकांनी स्वतःला सनातन धर्मीय असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांची संख्या नोंदवणे मला योग्य वाटले नाही. आर्य समाजाच्या अनुयायांना विरोध करण्यासाठी आणि आपण कसे प्राचीन धर्माचे पालनकर्ते आहोत, हे दाखविण्यासाठी हा शब्द वापरला जात होता. लाहोर शहरात प्राथमिक गणना करीत असताना आढळून आले की, आर्य नसलेल्या प्रत्येकाने स्वतःची ओळख सनातन धर्मीय असल्याचे सांगितले होते.”

झॅवोस यांनी आणखी एक बाब अधोरेखित केली. त्यांनी लेखात लिहिले, “सनातन धर्माच्या प्रचारासाठी घेतलेल्या प्रत्येक सभेत एक बाब सामान्य होती; ज्यामुळे ते लोक रूढीवादी असल्याचे दिसत होते. ते म्हणजे हे सर्व लोक सुधारणावादी विचारांना कडाडून विरोध करीत होते. श्रद्धा राम यांच्याप्रमाणेच इतर सनातनींनी जिल्ह्या-जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी प्रवास केला. दयानंद सरस्वती आणि इतर सुधारणावादी व्यक्तींच्या कार्याला विरोध करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.

१९ व्या शतकातील दोन चळवळींमधील संघर्ष अजूनही पाहायला मिळतो. सुधारणावाद्यांची जागा आता पुरोगाम्यांनी घेतलेली दिसते. तर, हिंदू महासभा आदी धार्मिक संघटनांचे एकीकरण संघ परिवारात झालेले पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच जेव्हा केव्हा सनातन धर्मावर टीकाटिप्पणी होते, तेव्हा समोरून त्याचा प्रतिध्वनी उमटतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The concept of sanatan dharma its roots and the historical context of its use know udhayanidhi stalin controversy kvg
Show comments