देवळाली फायरिंग रेंजवर तोफांच्या सरावावेळी स्फोट होऊन गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शित या अग्निवीरांचा मृत्यू झाला. तोफेतून डागलेला गोळा बॅरलच्या अगदी समीप फुटला. प्रशिक्षणादरम्यान घडलेल्या या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश लष्कराने दिले आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच दुर्घटनेत सदोष दारुगोळ्याचे कारण पुढे आले होते. दोन्ही अग्निवीर ‘इंडियन फिल्ड गन’ या जुनाट तोफेवर सराव करीत होते. गेल्या काही वर्षात अत्याधुनिक तोफा दलात दाखल होऊनही प्रशिक्षणाची भिस्त मात्र जुनाट तोफांवर असल्याचे यामुळे उघड झाले आहे. 

प्रशिक्षणाचे स्वरूप कसे आहे?

देवळाली-नाशिकरोड हे तोफखाना दलाचे देशातील मुख्य प्रशिक्षण केंद्र आहे. तोफखाना केंद्रात जवान, अग्निवीरांना प्रशिक्षित केले जाते. गतवर्षीपासून येथे अग्निवीरांना ३१ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. पहिल्या १० आठवड्यांत मूलभूत लष्करी आणि पुढील २१ आठवड्यांत प्रगत प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये आभासी पद्धतीने सराव करता येणाऱ्या आधुनिक प्रणाली अर्थात सिम्युलेटरचा वापर होतो. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारा प्रशिक्षणार्थींचा दिवस रात्री १० वाजता संपतो. रात्रीच्या लष्करी कारवाई प्रशिक्षणासाठी आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी वर्ग होतात. हिंदी अवगत नसणाऱ्यांना या भाषेचेही शिक्षण दिले जाते. पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी असल्याने प्रशिक्षणास जास्त वेळ मिळतो, असा केंद्राचा दावा आहे. सैन्याच्या पूर्वीच्या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींना साधारणत: वर्षभराचे प्रशिक्षण मिळत असे. हा कालावधी अग्निवीरांसाठी निम्म्याने कमी झाला आहे. 

हेही वाचा >>>नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजवरून दोन देशांत वितुष्ट; काय आहे वादाचा केंद्रबिंदू?

फायरिंग रेंजवरील दुर्घटनांचा इतिहास काय आहे?

देवळालीच्या लष्करी क्षेत्रात कोनहिल, बहुला एक आणि दोन, शिवडोंगर अशा साधारणत: १२ ते १५ किलोमीटर अंतराच्या फायरिंग रेंज आहेत. याच ठिकाणी विविध बनावटीच्या तोफांचा प्रत्यक्ष सराव होतो. काही वर्षापूर्वी काही दिवसांच्या अंतराने अशाच दोन दुर्घटना घडल्या होत्या. एका घटनेत ‘इंडियन फिल्ड गन’मधून डागलेला गोळा बॅरलच्या अगदी समीप फुटला. त्यात कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत ‘एल – ७०’ विमानभेदी तोफेच्या सरावावेळी सुभेदाराचा मृत्यू झाला होता. एकदा तोफेतून डागलेले गोळे थेट गौळाणे शिवारातील शेतात म्हणजे नागरी भागात पडले होते. त्याचा स्फोट न झाल्याने अनर्थ टळला. 

जुनाट तोफा की सदोष दारुगोळा?

सरावावेळी दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्यामुळे या दुर्घटनेमागे दोष जुन्या तोफेचा की दारुगोळ्याचा, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. यापूर्वीही एकदा तोफेतून बाहेर पडलेला गोळा अगदी जवळ फुटल्यामुळे दुर्घटनेला सामोरे जावे लागले होते. दुसऱ्या घटनेत डागल्यानंतर गोळ्याच्या बाह्य आवरणाबरोबर स्फोटकांचे पेटते अंशही मागे आल्याचा विचित्र प्रकार घडला होता. तोफखाना केंद्राच्या चौकशीत सदोष दारुगोळा हे कारण पुढे आले होते. त्यामुळे ज्या आयुधनिर्माणीत दारुगोळ्याचे उत्पादन झाले, तेथील तज्ज्ञांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी आणि आताही ‘इंडियन फिल्ड गन’ याच तोफेतून गोळे डागताना दुर्घटना घडली आहे. साधारणत: चार दशकांपासून ही तोफ वापरात आहे. प्रशिक्षण संस्थेला ती आजही विश्वासार्ह वाटते, हे आश्चर्यकारक आहे. सरावापूर्वी प्रत्येक तोफेची कार्यक्षमता तपासली जाते. यात काही दोष आढळल्यास तिच्यावर सराव केला जात नाही. तोफ सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच ‘फायरिंग’ केले जाते, असे अधिकारी सांगतात. चौकशीअंती याची कारणमीमांसा होईल. 

हेही वाचा >>>Workout Pill: आता जिमला जाण्याची चिंता मिटणार? व्यायामाची गोळी हा काय प्रकार आहे?

दुर्घटनेशी हवामानाचा संबंध असू शकतो का ?

हवामानाचा तोफखान्याच्या कार्यवाहीत परिणामकारकता व अचूकतेवर लक्षणीय परिणाम होतो. आर्द्रता, तापमान, वारा, पर्जन्य हे तोफगोळ्यांच्या माऱ्यात अडचणी निर्माण करू शकतात. वातावरणाचा परिणाम होऊन कधीकधी तोफगोळा भरकटू शकतो. आर्द्रतेचे अधिक प्रमाण हवेची घनता बदलू शकते. तापमानातील चढ-उतारामुळे दारुगोळा वेगळ्या पद्धतीने कार्य करू शकतो. अचूकतेत वाऱ्याचा वेग व दिशा महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे ‘गनर्स’नी हवामान परिस्थितीबद्दल जागरूक असणे आवश्यक मानले जाते. सरावाआधी आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा व वेग आदींचे अवलोकन करावे लागते. हवामान अनुकूल असल्यास सराव केला जातो. काही दिवसांपूर्वी नागरी भागात तोफगोळे पडल्यानंतर तोफखाना केंद्राने उपरोक्त उपाययोजना करीत तोफांच्या माऱ्याच्या दिशेतही काही बदल केल्याचा इतिहास आहे. हवामानाची सद्यःस्थिती तात्काळ उपलब्ध करणारी आधुनिक प्रणाली दलाकडे आहे. पाऊस निरोप घेण्याच्या काळात अग्निवीर सराव करीत होते. प्रशिक्षकांनी हवामानाची स्थिती जाणून घेतली की नाही, याची स्पष्टता चौकशीतून होणे महत्त्वाचे ठरेल.

जुन्या तोफांना निरोप कधी मिळणार?

देवळालीच्या तोफखाना स्कूलतर्फे दरवर्षी ‘तोपची‘ वार्षिक सोहळ्यात विविध तोफा व रॉकेट लाँचरच्या भडिमारातून दलाची प्रहारक क्षमता अधोरेखित केली जाते. देशांतर्गत निर्मिलेल्या साधनसामग्रीने तोफखाना दलाच्या आधुनिकीकरणाला वेग आल्याचे दावे केले जातात. दलाच्या भात्यात १५५ मि.मी. क्षमतेच्या भारतीय बनावटीची के ९ – वज्र, धनुष, सारंग, एम-९९९ (मूळ अमेरिकन)  या अत्याधुनिक तोफांबरोबर बोफोर्स, सोल्टन (मूळ रशियन फिल्ड गन), इंडियन फिल्ड गन, मॉर्टर अशा तोफा आहेत. बोफोर्सनंतर प्रदीर्घ काळ नव्या तोफांची खरेदी झाली नव्हती. परिणामी जुनाट तोफांवर विसंबून राहावे लागले होते. अत्याधुनिक तोफा दाखल झाल्यानंतर जुन्या तोफांना विश्रांती दिली जाणार होती. अलीकडेच ४०० तोफा खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नव्या तोफा समाविष्ट होऊनही प्रशिक्षणासाठी जुन्या तोफांचा वापर चिंताजनक आहे.