-अभय नरहर जोशी
‘द डायरी ऑफ अॅन फ्रँक’ म्हणजे अॅन फ्रॅंकच्या रोजनिशीच्या (डायरी) प्रसिद्धीस नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जगभर तिला अभिवादन केले जात आहे. ती डायरी काय होती? ही अॅन फ्रॅंक कोण होती? याविषयी…
काय आहे या रोजनिशीत?
वयाच्या अवघ्या १३ ते १५ व्या वर्षांपर्यंत त्या मुलीने एक रोजनिशी अथवा दैनंदिनी (डायरी) लिहिली. अन् या छोट्याशा ज्यू मुलीच्या या डायरीने अवघ्या जगाचे हृदय हेलावले. आज ७५ वर्षांनंतरही या डायरीतले अनुभव अवघ्या जगाच्या हृदयावर कोरले गेले आहेत. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या अत्याचारी नाझी साम्राज्याच्या काळात लाखो ज्यूंचा नरसंहार करण्यात आला. ‘हॉलोकॉस्ट’ या नावाने तो नरसंहार बदनाम आहे. या डायरीत अॅन फ्रॅंकने तिला दिसलेले युद्धाचे विदारक चित्र आणि ज्यूंच्या नरसंहाराची वर्णने केली आहेत. उण्यापुऱ्या १५ वर्षांच्या आयुष्यातील दोन वर्षे तिने ही डायरी लिहिली आहे. नाझी जर्मन सैन्याच्या तावडीत न सापडण्यासाठी आपल्या कुटुंबासह लपलेली असताना तिने हे अस्सल अनुभव शब्दबद्ध केले आहेत. त्यानंतर दुर्दैवाने अॅन नाझी सैन्याकडून पकडली गेली. तिचा छळछावणीत दुर्दैवी अंत झाला. मात्र, तिनं डायरीत केलेले अत्यंत मर्मभेदी आणि हृदयद्रावक वर्णन मात्र अजरामर झाले. आधुनिक इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या नोंदी असलेले ते एक महत्त्वाचे पुस्तक बनले आहे.
अॅन फ्रॅंक ही कोण होती?
अॅन फ्रॅंकचा जन्म १२ जूून १९२९ रोजी जर्मनीत फ्रँकफर्ट येथे ज्यू कुटुंबात झाला होता. मात्र, जर्मनीत नाझी पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे व अल्पसंख्य ज्यू समाजाविषयी त्यांची पक्षपाती धोरणे व हिंसाचाराला कंटाळून तिचे कुटुंब नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम येथे स्थलांतरित झाले होते. अॅन दहा वर्षांची असताना दुसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटले. त्यानंतर अल्पावधीतच जर्मनीने नेदरलँड्स पादाक्रांत केले. त्यामुळे हे युद्ध अॅनच्या कुटुंबाच्या दाराशी येऊन ठेपले. या काळात नाझी आक्रमकांकडून ज्यू समाजातील लोकांना लक्ष्य केले जात होते. ज्यूंना अटक, त्यांची हत्या अथवा अमानूष छळछावण्यांत (काँन्सन्ट्रेशन कॅम्प) त्यांची रवानगी केली जात असे. त्यामुळे लाखो ज्यूंना आपले घर-दार सोडून पलायन करावे लागले, त्यापैकी काही जण लपूनछपून जगू लागले. अॅनच्या कुटुंबाने अॅनच्या वडिलांच्या कार्यालयातील छुप्या निवासस्थानी १९४२ च्या वसंतापासून राहणे सुरू केले.
या रोजनिशीने इतिहास कसा घडवला?
इतर लाखो ज्यू कुटुंबांप्रमाणे अॅन फ्रँकच्या कुटुंबालाही होते-नव्हते त्याचा त्याग करून मोजक्या सामानासह पलायन करावे लागले व छुप्या निवासस्थानी आश्रय घ्यावा लागला. अॅनचा तेरावा वाढदिवस काही आठवड्यांपूर्वीीच झाला होता. त्यावेळी तिला प्रेमाने मिळालेली एक भेटवस्तू तिने सोबत घेतली होती. ती भेटवस्तू म्हणजे एक वही (चेकर्ड हार्डबॅक नोटबुक) होती. हीच तिने दैनंदिनी (डायरी) म्हणून पुढे दोन वर्षे वापरली व इतिहास घडला! अवघ्या जगापर्यंत पोहोचण्याचे माध्यम ही डायरी ठरली. पुढील २५ महिने अॅनने या डायरीच्या प्रत्येक पानाला आपले हृदगतच सांगितले. लपून बसलेल्या जागेतून तिने आपल्या किशोरवयीन दृष्टीतून निरीक्षणे नोंदवली. तिने आपली गूढ स्वप्ने, तिला वाटत असलेले भय आदीचे तपशीलवार वर्णन केले आहे. ही वर्णने हृदयंगम आहेत. युद्धानंतर तिच्या डायरीतील नोंदी प्रकाशित होऊ शकतील या आशेने, अॅनने तिचे लेखन ‘हेट अक्टरहुइस’ (‘द सिक्रेट अॅनेक्स’) नावाच्या एका सुसंगत कथेत गुंफले.
अॅन फ्रँकचा दुर्दैवी अंत कसा झाला?
लपलेल्या फ्रँक कुटुंबाला दुर्दैवाने ४ ऑगस्ट १९४४ रोजी नाझी पोलिसांनी शोधून काढले. या सर्वांना अटक करण्यात आली. त्यांना कैदखान्यात नेण्यात आले. त्यानंतर त्यांचा छळ करण्यासाठी असह्य अशा सक्तमजुरीला जुंपण्यात आले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने पोलंडमधील ऑत्सविट्झ छळछावणीत पाठवण्यात आले. तेथे त्यांना अतिशय अपुऱ्या छोट्याशा अनारोग्यकारक जागेत ठेवले गेले. त्यानंतर अॅनला तिची बहीण मार्गोसह जर्मनीतील बर्गेन-बेल्सेन छळछावणीत पाठवण्यात आले. नाझी जर्मनांनी आंतरराष्ट्रीय ज्यूं कैद्यांच्या ठरवून केलेल्या निर्घृण हत्या तर केल्याच. शिवाय या अनारोग्यकारक छळछावण्यांत प्राणघातक रोगांनी थैमान घातलेले असे. या अमानुष छळछावण्यांतील अशा अनारोग्यकारक वातावरणात अखेर अॅन व मार्गो फ्रँक भगिनींचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. अॅन त्यावेळी अवघी १५ वर्षांची होती.
या रोजनिशीचा नव्या पिढ्यांसाठी उपयोग कसा?
अॅन फ्रँक छळछावण्यांतून वाचली नसली तरी, त्या भयंकर वर्षांचा तिने मांडलेला लेखाजोखा, ‘द डायरी ऑफ अॅन फ्रँक’ या नावाने जगभरात वाचला गेला. तेव्हापासून ते आतापर्यंत प्रकाशित वास्तववादी साहित्यात अतिशय मोठ्या प्रमाणात वाचले गेलेले, असे हे साहित्य झाले आहे. जगभरातील ८० पेक्षा जास्त भाषांमध्ये ते अनुवादित झाले आहे. फ्रँकची ही रोजनिशी जगभरातील शाळांत जागतिक महायुद्धाचे भयंकर दुष्परिणाम शिकवण्यासाठी महत्त्वाचे साधन बनली आहे. तिचा उपयोग पुढील अनेक पिढ्यांना वांशिक भदभाव, त्यातून होणारा नरसंहार, अत्याचाराचे धोके शिकवण्यासाठी केला जातो.
‘डुडल’ ठेवण्यामागचा ‘गुगल’चा उद्देश काय?
नाझीवादाच्या सर्व बळींच्या भावजीवनाची प्रातिनिधिक अभिव्यक्ती जगासमोर यावी, म्हणून अॅनचे वडील, ओट्टो फ्रँक यांनी युद्धानंतर लवकरच ही दैनंदिनी पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. वांशिक भेदभावाविषयी नवीन पिढ्यांत जागृती व संवादाचा पाया तयार करणे, हाही त्यामागचा उद्देश होता. नुकताच २५ जून रोजी अॅन फ्रँकच्या डायरीच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा ७५ वा वर्धापन दिन झाला. त्यानिमित्ताने गुगलने आपले डुडल ठेवताना अॅनला आपले अनुभव सांगितल्याबद्दल व भूतकाळाची माहिती देताना भविष्यातील आशावाद जागृत केल्याबद्दल धन्यवाद दिले. गुगलने पुढे नमूद केले, की हे डूडल भूतकाळाचे दालन तर उघडतेच, त्याचबरोबर वर्तमानाबद्दल जागरूकताही वाढवते. आजही जगातील लाखो मुलांना युद्ध, वांशिक आणि वर्णद्वेषाची झळ बसत आहे. आम्हाला आशा आहे, की हे डुडल या समस्येकडे जगाचे लक्ष वेधेल आणि अॅन फ्रँकच्या डायरीच्या प्रकाशनामागील तिच्या वडिलांचा उदात्त हेतू साध्य होईल.