संजय जाधव
जगभरात मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात दहापैकी एक व्यक्ती मधुमेहग्रस्त असणार आहे. पुढील ३० वर्षांत प्रत्येक देशात मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. जगात २०५० पर्यंत मधुमेहाचे १.३ अब्ज रुग्ण असतील, असा अंदाज ‘लॅन्सेट’ संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात मांडण्यात आला आहे. ही संख्या वाढण्यामागे आर्थिक असमानतेचे कारणही आहे. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या विकारामुळे हृदयरोग आणि इतर सहव्याधींचा धोका वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
संशोधन नेमके काय?
अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीन’मधील ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन’मधील संशोधकांनी हा अंदाज मांडला आहे. जागतिक पातळीवर एकूण मधुमेहींमध्ये ९६ टक्के टाईप २ प्रकारच्या मधुमेहाचे आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज २०२१’ या अभ्यासाचा आधार संशोधकांनी घेतला आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या सहव्याधी, मधुमेहामुळे होणारे मृत्यू यांचा २०४ देशांमधील वेगवेगळ्या वय आणि लिंगाच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला होता. याच अभ्यासाच्या आधारे संशोधकांनी आता २०५० पर्यंतचा मधुमेहाबाबतचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार रुग्णसंख्येत ६० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
कोणत्या वयोगटाला धोका जास्त?
जागतिक पातळीवर मृत्यू आणि अपंगत्व येण्यासाठी कारण ठरणाऱ्या प्रमुख दहा घटकांमध्ये मधुमेहाचा समावेश आहे. मधुमेहाचे प्रमाण प्रामुख्याने ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांमध्ये आढळून येत आहे. जगभरात ज्येष्ठांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सरासरी २० टक्के आहे. त्यात उत्तर आफ्रिका आणि आखाती देशांत हे प्रमाण तब्बल ३९.४ टक्के आहे. मध्य युरोप, पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये हे प्रमाण १९.८ टक्के आहे. ‘इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन’च्या माहितीनुसार, जगात मधुमेहाचे २०२१ मध्ये ५२.९ कोटी रुग्ण होते आणि त्याच वर्षी मधुमेहामुळे ६७ लाख जणांचा मृत्यू झाला.
संशोधनातील निष्कर्ष काय?
जागतिक पातळीवर वृद्धांच्या संख्येत होणारी वाढ आणि लठ्ठपणा ही दोन प्रमुख कारणे मधुमेहींची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत, असे संशोधनात म्हटले आहे. मधुमेह हा शतकातील सर्वांत मोठा आजार असणार आहे. पुढील दोन दशके आरोग्य व्यवस्था याला कशा प्रकारे तोंड देते, यावर पुढील ८० वर्षे जनतेचे आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून असेल. मधुमेहामागील सामाजिक कारणे समजून घेण्यात जग अपयशी ठरले आहे. या रोगाची तीव्रता आणि धोका अद्याप सर्वांना गांभीर्याने घेतलेला नाही. जगात २०२१ मध्ये टाईप २ प्रकारच्या मधुमेहाची रुग्णसंख्या बहुतांश आहे. या प्रकारचा मधुमेह वाढण्यास लठ्ठपणा हे प्रमुख कारण आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, वृद्धांची वाढणारी लोकसंख्या मधुमेहींची संख्या वाढण्यास ५० टक्के कारणीभूत ठरेल. उरलेल्या ५० टक्के वाढीला लठ्ठपणा हे कारण ठरेल.
सामाजिक असमानतेची पार्श्वभूमी नेमकी काय?
मधुमेह हा उच्च उत्पन्न गटातील देशांमध्ये जास्त आढळून येतो, असे आधीपासून निरीक्षण नोंदवले जात होते. आता अल्प उत्पन्न गटांतील देशांमध्ये वाढू लागला आहे. मधुमेहींची संख्या वाढण्यामागे अल्प उत्पन्न गटांतील देशांमध्ये वाढणारा लठ्ठपणाही कारणीभूत आहे. कारण या देशांकडून उच्च उत्पन्न गटातील देशांचे अनुकरण केले जात आहे. जीवनशैली, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि कमी झालेली शारीरिक हालचाल या गोष्टी मधुमेह वाढण्यासाठी पूरक ठरत आहेत. तसेच, अल्प उत्पन्न गटातील देशांकडून आरोग्यावर होणारा कमी खर्च आणि अपुऱ्या उपचाराच्या सुविधा यामुळे तिथे मधुमेहाला वेळीच प्रतिबंध करणे शक्य होत नाही. त्यामुळे या देशांमध्ये हा धोका अनेक पटीने वाढत आहे.
जगभरात सर्वाधिक रुग्ण कुठे?
जगभरातील अल्प व मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये २०४५ पर्यंत एकूण मधुमेहींपैकी दोन तृतीयांश असतील, असा संशोधकांचा अंदाज आहे. याचवेळी अशा देशांतील केवळ १० टक्के मधुमेहींना सर्वांगीण उपचार मिळत असल्याचे भयावह वास्तव आहे. उत्तर आफ्रिका, आखाती देश, मध्य लॅटिन अमेरिका आणि ओशनियातील देशांमध्ये २०५० पर्यंत मधुमेहींची संख्या १० टक्क्यांच्या पुढे जाईल. उत्तर आफ्रिका व आखातातील २१ पैकी १० देशांमध्ये आणि ओशनियातील १८ पैकी १३ देशांमध्ये हे प्रमाण २० टक्क्यांवर जाईल. जगातील कोणत्याही देशात यापुढे मधुमेहींची संख्या कमी होणार नाही, असा गंभीर इशाराही या संशोधनातून देण्यात आला आहे. त्यामुळे मधुमेह हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे संकट ठरणार आहे.
sanjay.jadhav@expressindia.com