सी. राजा मोहन
रविवारी बांगलादेशमध्ये राष्ट्रीय निवडणुका होत असल्याने याकडे भारताचे बारकाईने लक्ष असणार आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये ४,१०० किमी लांबीची सीमा आहे तसेच दीर्घ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधदेखील आहेत. एक स्थिर,समृद्ध आणि मैत्रीपूर्ण बांगलादेश असणे भारताच्या हिताचे आहे. त्याचमुळे,भारत शेख हसीना यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेख हसीना यांना भारताच्या जवळच्या मित्र म्हणून पाहिले जाते. त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे संबंध वाढवण्याचेच काम केले.
बांगलादेशच्या निवडणुकीत भारताला कोणता धोका?
राष्ट्रीय सुरक्षा:
२००९ साली शेख हसीना या सत्तेवर येण्यापूर्वी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या सरकारचे भारताशी अत्यंत प्रतिकूल संबंध होते. इतकेच नाही तर त्यांनी असंख्य भारतविरोधी दहशतवाद्यांना आणि अतिरेकी गटांना आश्रय दिला होता. पाकिस्तानच्या ISI शी संबंध असल्याचा आरोप असलेल्या आणि कट्टर इस्लामी कट्टरपंथीयांना त्यावेळेस बांगलादेशाने वापरण्यासाठी भूभाग दिला होता. हसीना यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताच्या पूर्वेसीमेवरील सुरक्षेचा भार प्रभावीपणे कमी करण्यास मदत केली. भारतविरोधी घटकांवर त्यांनी केलेल्या कारवाईमुळे आणि भारतासोबतच्या दहशतवादविरोधी सहकार्यामुळे गेल्या दशकभरात भारताच्या एकूण सुरक्षा स्थितीत चांगलीच सुधारणा झाली. विशेषत: म्यानमारमधील बिघडलेली परिस्थिती पाहता भारत आणि बांगलादेश हे जवळचे संरक्षक भागीदार राहणे अधिक महत्त्वाचे आहे.
अधिक वाचा: विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!
सखोल आर्थिक संबंध:
गेल्या काही वर्षांत दक्षिण आशियातील मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे बांगलादेशचा आर्थिक उदय, यामुळे आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानची जागा बांगलादेशने घेतली.जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, बांगलादेशचा GDP २०२२ साली ४६० अब्ज अमेरिकन डॉलर्स होता, जो पाकिस्तानच्या ३७५ अब्ज अमेरिकन डॉलर्स जास्त होता. २०२२-२३ मध्ये, युनायटेड स्टेट्स, UAE, नेदरलँड्स आणि चीन नंतर बांगलादेश हे भारतीय वस्तूंसाठी पाचवे सर्वात मोठे निर्यात गंतव्यस्थान होते. १२.२ अब्ज डॉलर्सच्या सर्व भारतीय निर्यातीपैकी २.७ टक्क्यांहून अधिक निर्यात बांगलादेशमध्ये होते.हसीना यांच्या सत्ते अंतर्गत, बांगलादेश ओव्हरलँड ट्रांझिट आणि अंतर्देशीय जलमार्गांद्वारे भारताच्या ईशान्येला कार्यक्षम कनेक्टिव्हिटीची सुविधा देत आहे.
पाकिस्तानने प्रादेशिक आर्थिक सहकार्याला पाठिंबा देण्यास नकार दिल्याने उपखंडातील आर्थिक एकात्मतेसाठी बांगलादेशचा सहभाह महत्त्वपूर्ण ठरतो.
प्रादेशिक सहकार्य:
उपखंडाच्या पलीकडे, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियाला जोडणाऱ्या बंगालच्या उपसागरातील प्रादेशिक सहकार्यासाठी बांगलादेश महत्त्वाचा आधार ठरावा, अशी भारताची इच्छा आहे. बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील बाजूस म्यानमार, थायलंड, बांगलादेश असून भारतीय उपखंडाचा पूर्वेकडील भाग या उपसागराने जोडला जातो. त्याच्या सुरक्षा आणि सहकार्यासाठी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अॅण्ड इकनॉमिक कोऑपरेशनची स्थापना करण्यात आली असून त्यांचे सचिवालय ढाका येथे आहे. अलिकडच्या वर्षांत, जपानसारख्या भारताच्या अनेक मित्रांनी बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
पंतप्रधान हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात लोकशाही मागे पडल्याच्या आरोपांचे काय?
शेख हसीना सत्तेवर आल्यापासून बांगलादेशातील राजकीय स्थैर्य भारतासाठी खूप उपयुक्त ठरले आहे आणि त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून त्या सर्वोत्तम दावेदार आहेत. त्यांनी कट्टरपंथी अतिरेकी शक्तींना दूर ठेवले आणि बांगलादेशशी भारताचे संबंध सुधारले, त्यामुळेच भारताचा पाठिंबा त्यांना आहे. हे खरे आहे की शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये लोकशाही मागे पडल्याबद्दल काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र शेख हसीना यांना दूर ठेवायचे तर बांगलादेशला जे पर्याय उपलब्ध आहेत ते लोकशाहीलाच नव्हे तर या प्रदेशातील शांतता आणि समृद्धीसाठीही मोठाच धोका आहेत. त्यामुळे भारतासाठी व या प्रदेशातील सुरक्षेसाठी शेख हसीना यांना पर्याय नाही, अशी सद्यस्थिती आहे.
अधिक वाचा: Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?
हसीना यांची चीनशी वाढती जवळीक ही भारतासाठी चिंतेची बाब?
शेख हसीना या भारताच्या अर्थबळावर चीनकडे वळत आहेत, हा आरोप काहीसा अतिरंजित आहे. आपल्याला येथे एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, चीन ही जगातील दुसरी आर्थिक महासत्ता आहे. आणि दक्षिण आशियाच्या शेजारीच स्थित आहे. त्याची जगभरात गुंतवणूक आहे. या परिस्थितीत भारताचे शेजारी चीनशी व्यापार करणार नाहीत, अशी अपेक्षा करणेच अवास्तव आहे. खरं तर, भूतानचा अपवाद वगळता इतर सर्व शेजाऱ्यांच्या तुलनेत, बांगलादेशने भारत आणि चीनमधील यांच्यामधील तणावपूर्ण स्थितीच्या वेळेस तारेवरची कसरत उत्तम पद्धतीने काळजीपूर्वक पार पाडली आहे.
बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील संबंध
बांगलादेशच नव्हे तर इतर कुठलाही शेजारील देश, भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे कोणतेही पाऊल उचलणार नाही हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. शेख हसीना यांनी भारताच्या संदर्भात अशी कोणतीही आगळीक होणार नाही, याची काळजीच घेतली आहे. अमेरिकेने हसीना आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर भारताची अमेरिकेशी असलेली मैत्री पाहता बांगलादेशबरोबर भारताच्या असलेल्या हितांवर याचा कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. बांगलादेशचे अमेरिका आणि ब्रिटनबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांना ऐतिहासिक कारणे आहेत, त्यांची असलेली पाकिस्तानशी जवळीक आणि १९७१ सालच्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे शेख हसीना या दोन्ही देशांकडे अविश्वासाने पाहतात. बांगलादेशच्या मते अमेरिकेच्या हुकुमशाहीविरोधातील भूमिकेत विसंगती दिसते. अमेरिका पाकिस्तानच्या मानवाधिकारबद्दल बोलते, परंतु त्याच वेळी पाकिस्तानकडून होणाऱ्या बांगलादेशीयांवरील अत्याचारबद्दल दुटप्पी भूमिका बजावते. ट्रम्प यांच्या काळात बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील परिस्थिती सुधारणेच्या वळणावर होती, परंतु जो बायडन यांच्या काळात परिस्थिती जैसे थेच असल्याचे चित्र आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या परिस्थिबद्दल वॉशिंग्टन डीसीमध्ये पुनर्विचार होताना दिसत आहे. निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपावर ढाका येथील अमेरिकेचे राजदूत पीटर हास यांनी ताशेरे ओढले आहेत. दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेत हसीना यांनी बायडेन आणि त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांची भेट घेतली. बायडेन प्रशासनाने बांगलादेशातील भारताच्या हिताचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे आणि ढाकाशी असलेले आपले शत्रुत्व कमी करण्यास ते तयार आहेत, असे सध्या चित्र आहे.
पुढील दोन दिवसांत आपल्या देशी-विदेशी टीकाकारांना खाद्य मिळू नये यासाठी शेख हसीना सर्वतोपरी प्रयत्न करतील, अशी भारताला आशा आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि अहिंसक असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून बाहेरील लोक बांगलादेशबद्दल अधिक धोरणात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊ शकतील.