जागतिक बाजारातील पामतेल पुरवठा नियंत्रित?

गत काही वर्षांच्या तुलनेत सध्या जागतिक खाद्यातेलाच्या बाजारपेठेत पामतेलाचा तुटवडा जाणवत आहे. जागतिक पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आघाडीवरील देश आहे. एकूण पामतेल उत्पादनात इंडोनेशियाचा वाटा ६० टक्क्यांपर्यंत आहे. मलेशिया दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. इंडोनेशियाने बायो – ४० धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार खनिज तेलात पामतेलापासून तयार केलेले बायोडिझेल ४० टक्क्यांपर्यंत मिश्रण करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२६ पर्यंत मिश्रण पातळी ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे धोरण आहे. शिवाय विमान इंधनातही तीन टक्के पामतेलापासून तयार केलेले बायोडिझेल मिळण्याची चाचपणी सुरू झाली आहे. यासह इंडोनेशिया आणि मलेशियाने कच्च्या पामतेलाच्या निर्यातीवर कर लागू केला आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील पामतेलाचा पुरवठा नियंत्रित करण्यात इंडोनेशिया आणि मलेशिया यशस्वी झाले आहेत.

इंडोनेशियाच्या धोरणांमुळे पामतेलाची दरवाढ?

जागतिक पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आघाडीवर आहे. इंडोनेशियाचे अर्थकारण पामतेलाच्या भोवती फिरते. त्यामुळे पामतेल उद्याोगाला इंडोनेशियात विशेष महत्त्व आहे. देशाअंतर्गत पामतेल उद्याोगाला बळ देण्यासाठी, रोजगार वृद्धी करण्यासाठी इंडोनेशिया पामतेल शुद्धीकरण प्रकल्पांना बळ देत आहे. शुद्धीकरण प्रकल्पांमुळे रोजगारात वाढ होऊन रोजगार टिकून राहतो. त्यामुळे इंडोनेशिया कच्च्या पामतेलाच्या निर्यातवर कर लादत आहे, तर शुद्ध पामतेलाच्या निर्यातीला सवलत देत आहे. मलेशियाचीही हीच भूमिका आहे. इंडोनेशियाने बायोडिझेल धोरणाचा अंगीकार करून खनिज तेलाच्या आयातीत मोठी कपात केली आहे. बायो डिझेल धोरणांचा मोठा परिणाम पामतेलाच्या जागतिक उपलब्धतेवर झाला आहे. इंडोनेशिया आणि मलेशियाने आपले पामतेल उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नातून १९८० ते २०२० पर्यंत पामतेल उत्पादन दुप्पट केले होते. त्यामुळे गत काही वर्षांत पामतेलाची उपलब्धता वाढून स्वस्ताई आली होती. आता भारतासह कोलंबिया, इक्वेडोर, आयव्हरी कोस्ट, नायजेरियात पाम लागवड वाढत असली तरीही पामतेल उत्पादनाला मर्यादा आहेत. त्यातही सर्व देश पामतेलापासून बायोडिझेल निर्मितीवर भर देत आहेत.

जागतिक पामतेल उत्पादनाची स्थिती काय?

जागतिक पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आणि मलेशिया आघाडीवरील देश आहेत. इंडोनेशियात सरासरी ४९७ लाख टन, मलेशियात सरासरी १८१ लाख टन, थायलंडमध्ये सरासरी २९ लाख टन, कोलंबियात सरासरी १७ लाख टन, नायजेरियात सरासरी १४ लाख टन, ग्वाटेंमालात सरासरी एक लाख टन पामतेल उत्पादन होते. एकूण पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आणि मलेशियाचा वाटा ८४ टक्के आहे. एकूण जागतिक उत्पादन सरासरी ८०० लाख टन असून, त्यात दोन्ही देशांचा वाटा ६७८ लाख टन इतका असतो.

भारताच्या खाद्यातेल बाजारपेठेवर परिणाम काय?

द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४, या खाद्यातेल वर्षात देशात १५९.६ लाख टन खाद्यातेलाची आयात करण्यात आली. त्यात १९.३ लाख टन शुद्ध पामतेल आणि ६९ लाख टन कच्च्या पामतेलाचा समावेश आहे. देशनिहाय आयातीचा विचार करता, इंडोनेशियातून सर्वांधिक ४८ लाख टन, मलेशियातून ३२ लाख टन, थायलंडमधून ०.७७ लाख टन खाद्यातेलाची आयात झाली आहे. देशातील बंदरांवर फेब्रुवारी २०२५ मध्ये शुद्ध पामतेल ११४६ डॉलर प्रति टन, कच्चे पामतेल ११९७ डॉलर प्रति टन दराने आयात झाले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये शुद्ध पामतेल ९०३ डॉलर तर कच्चे पामतेल ९३३ डॉलर प्रति टन दराने आयात झाले होते. सरासरी २४० डॉलर प्रति टनाने महागाई वाढली आहे. २०२२ मध्ये अन्य तेलाच्या तुलनेत पामतेल ४०० डॉलर प्रति टन आणि २०१९ मध्ये ५०० डॉलर प्रति टन कमी दराने उपलब्ध होत होते. यापुढे अशी स्वस्ताई पामतेलात येण्याची शक्यता नाही. सध्या जागतिक बाजारात अर्जेंटिनामधून निर्यात होणाऱ्या सोयाबीन तेलाचा मोठा दबाव आहे. अर्जेंटिनामध्ये उच्चांकी सोयाबीन उत्पादन झाल्यामुळे जागतिक बाजारात पामतेलापेक्षा सोयाबीन तेल स्वस्त विकले जात आहे. त्यासह पामतेलाचा वापर प्रक्रिया उद्याोगासह खाण्याचे केक, सौंदर्य प्रसाधने उद्याोगात मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या उद्याोगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय ग्राहकांवर परिणाम काय?

देशात एका खाद्यातेल वर्षात सुमारे ८० ते ९० लाख टन कच्च्या आणि शुद्ध पामतेलाची आयात होते. ही आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून होते. आजवर पामतेल सर्वात हलक्या दर्जाचे आणि स्वस्त तेल म्हणून ओळखले जाते.

आता पामतेलाचे दर सोयाबीन तेलाच्या बरोबरीने आले आहेत. यंदा जागतिक बाजारात सोयाबीन तेलाची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे पामतेल महाग झाले तरीही खाद्यातेलांच्या दरात फारसा फरक पडला नाही. पामतेलाऐवजी सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात आणि आहारातील वापर वाढेल. पामतेलात तयार केलेले पदार्थ जास्त काळ टिकतात. त्यामुळे प्रक्रिया उद्याोगात पामतेलाचा उपयोग जास्त होतो. तसेच आजवर पामतेल स्वस्त उपलब्ध होत असल्यामुळे पामतेलाचे सोयाबीन, सूर्यफूल तेलात मिश्रण केले जात होते. आता पामतेलाचे मिश्रण करणे आर्थिकदृष्ट्या हिताचे होणार नाही. त्यामुळे यंदा भेसळमुक्त अथवा मिश्रणमुक्त खाद्यातेल ग्राहकांना उपलब्ध होईल.
dattatray.jadhav@expressindia.com

Story img Loader