Challenges in women’s wrestling आजच्या आधुनिक जगात महिला म्हणजे चूल- मूल हे सूत्र काही प्रमाणात बदलताना दिसत असलं तरी ते सहजच शक्य झालेलं नाही. या परिवर्तनाच्या कालखंडाचा सामना अनेक विरांगनांनी केला आहे. मग ते क्षेत्र कोणते का असो, संघर्ष मात्र कोणालाही चुकलेला नाही. त्यातही पुरुषप्रधान खेळाच्या मैदानातील चित्र याच संघर्षगाथेतील महिला खेळाडूंच्या वाट्याला येणारी भीषणताही दर्शवते. त्याचेच उत्तम उदाहरण कुस्ती हा खेळ आहे.
रक्त घाम आणि अश्रूंचा प्रवास
मुख्यतः हा पुरुषप्रधान खेळ मानला जातो. असे असताना सोनिका कालीरामन यांनी रूढीवादी विचारांना आणि या खेळाच्या मर्यादांना मागे सारत आपला ठसा या खेळात उमटवला. त्या आपली मनोव्यथा व्यक्त करताना सांगतात, मी कधी कुस्तीसाठी आदर्श उमेदवार नव्हतेच. मी बारीक आणि कमजोर होते. माझ्यावर कामगिरी करून दाखवायचा नेहमीच दबाव असायचा. त्यातही कठोर प्रशिक्षणामुळे मी कोलमडून पडायचे आणि हृदयविकाराची समस्या असल्याने प्रत्येक स्पर्धेनंतर मी बेशुद्ध पडायचे. पूरक आणि सकस अन्न हीच माझी जीवनरेखा होती. पण, काहीही असले तरी हार मानणं हा पर्याय माझ्यासमोर कधीच नव्हता. भारताची पहिली महिला कुस्तीपटू होण्याचा माझा प्रवास रक्त, घाम आणि अश्रूंनी भरलेला होता.
पहिल्या महिला भारत केसरी
आपल्या मुलींना कुस्ती खेळताना पाहण्याचे त्यांच्या वडिलांचे (दिग्गज कुस्तीपटू मास्टर चंदगी राम) स्वप्न होते. सामाजिक विरोध तसेच इंडियन रेसलिंग फाऊंडेशनच्या विरोधाला न जुमानता त्यांनी या दृष्टीने प्रयत्न केले. २००० साली, कालीरामन यांनी आशियाई महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि हरियाणा सरकारने आयोजित केलेल्या प्रतिष्ठित फ्रीस्टाइल स्पर्धेतील पहिल्या भारत केसरीचा मुकुट जिंकला. त्या पुढे सांगतात, ज्यावेळेस मी ९० च्या दशकात या खेळाला सुरुवात केली त्यावेळी आयोजकांनी खर्च कमी करण्यासाठी महिलांच्या खेळाचे महत्त्व कमी केले होते. म्हणूनच माझ्या वडिलांनी पुरुषांची तुलना लांडग्यांशी आणि स्त्रियांची मेंढ्यांशी केली आणि आम्हाला आमची लायकी सिद्ध करून दाखवण्यासाठी पुढे जाण्याचा आग्रह धरला.
महिला लढ्याचे प्रतीक
या संपूर्ण प्रवासात आमच्यावर पलवलसारख्या गावात दगडफेक झाली, अबला-नारी अशी लेबलं लावण्यात आली. या कठीण परिस्थितीतही कालीरामन यांनी धीर खचू दिला नाही. २००० साली मुख्यमंत्री शीला दीक्षित असताना दिल्लीतील राजीव गांधी गोल्ड टूर्नामेंटमध्ये समान बक्षीस रकमेसाठी लढा दिला. त्यावेळी सोनिका या हरियाणातील महिला कुस्तीचे प्रतीक ठरल्या होत्या.
पुरुषांची मक्तेदारी का टिकून राहिली?
६ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि महिला कुस्ती पुन्हा चर्चेत आली. देशभरात जल्लोष झाला. सोशल मीडियावर आनंदाची लाट उसळली. पण महिला कुस्तीपटूंच्या संघर्षाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. फोगटचा प्रवास इतर महिला कुस्तीपटूंप्रमाणेच संघर्षमय होता. तिने वयाची २५ वर्षे कुस्तीला समर्पित केली. २०१४, २०१८ आणि २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आणि तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतीय महिलांसाठी आखाड्यात स्थान मिळवणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. क्रीडा अभ्यासक जेमी शुल्त्झ यांनी त्यांच्या ‘वुमेन्स स्पोर्ट्स: व्हॉट एव्हरीवन नीड्स टू नो’ या पुस्तकात असे निरीक्षण नोंदवले आहे की, लढाऊ खेळांच्या आक्रमक स्वरूपामुळे महिलांना ऐतिहासिकदृष्ट्या या खेळांपासून दूर ठेवले गेले आहे. त्यामुळेच या खेळात पुरुषांची मक्तेदारी टिकून राहिली आहे.
२० व्या शतकातील कुस्तीचे बदलते रूप
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात कुस्ती या खेळाने मातीच्या आखाड्यातून मॅट फॉरमॅटशी जुळवून घेतले, त्यामुळे ऑलिम्पिक प्रोटोकॉल पाळण्यास मदत झाली. रुद्रनील सेनगुप्ता यांच्या ‘एंटर द दंगल’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, भारतातील पहिली मॅट कुस्ती १९७९ साली एका खाजगी आखाड्यात आयोजित केली होती, तर मॅटवरील दुसरी कुस्ती १९९२ साली नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये खेळली गेली होती. सेनगुप्ता सांगतात की, “भारतामध्ये कुस्तीवर आता हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचे वर्चस्व आहे. दक्षिण भारतातील राज्ये तसेच बिहार आणि गुजरात या ठिकाणीही या खेळाला समृद्ध इतिहास आहे. परंतु सध्याच्या काळात या राज्यांमध्ये कुस्ती फारशी दिसत नाही, फक्त काही भागांत ती अजूनही टिकून आहे.”
अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
स्त्रीची नजर सापाच्या विषाप्रमाणे?
१९८७ साली प्रकाशित झालेल्या ‘द रेसलर’स बॉडी: आयडेंटिटी अॅण्ड आयडियॉलॉजी इन नॉर्थ इंडिया’ या संशोधनात मानववंश शास्त्रज्ञ जोसेफ एस. ऑल्टर यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आखाड्यांचे निरीक्षण केले. गुरूंच्या देखरेखीखाली चालणाऱ्या या कुस्ती आखाड्यांमध्ये सामान्यतः मातीचा खड्डा, एक विहीर आणि हनुमानाला समर्पित देवस्थान असते. ऑल्टर यांनी त्यांच्या निरीक्षणात असं म्हटलं आहे की, महिलांच्या उपस्थितीने युवा कुस्तीपटूंच्या शिस्तीत व्यत्यय आणला जाऊ शकतो असा एक समज आहे. याच पुस्तकात त्यांनी एका कुस्तीपटूचे मतही दिले आहे, तो कुस्तीपटू म्हणतो, स्त्रीची नजर सापाच्या विषाप्रमाणे असते. अशाच स्वरूपाचे मत सेनगुप्ता यांच्या पुस्तकातही आढळून येते. पुरुषांच्या या खेळात स्त्रियांना जागा नसल्याचे दिसून येते. ते म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) कठोर प्रशिक्षण, शारीरिक शक्ती आणि ब्रह्मचर्य यावर जोर देऊन समान तत्त्वांचे पालन करतो.
हरियाणातील कुस्ती
आधुनिक हरियाणातील कुस्तीची लोकप्रियता समजून घेण्यासाठी, उत्तर भारतातील लष्करी कामगार बाजारपेठेचा विचार करावा लागतो. हरियाणातील कृषी जाती त्यांच्या शारीरिक सामर्थ्य आणि निष्ठेसाठी ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्यांना ब्रिटिश भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात स्थान मिळाले. सेनगुप्ता लिहितात की, कुस्ती हा या शिपायांचा आवडता मनोरंजनाचा प्रकार होता, त्यामुळे राज्यभर आखाड्यांची स्थापना झाली. हरियाणातील जाट आणि गुज्जरांची वाढती ताकद आणि धाडसीपणा यामुळे ब्रिटिशांनी त्यांना ‘मार्शल रेस’ म्हणून वर्गीकृत केले. जे बंगाली लोकांच्या सौम्य चित्रणाच्या अगदी उलट होते. परिणामी, लष्करी आणि क्रीडा परंपरांच्या एकत्रिकरणामुळे हरियाणाच्या अद्वितीय क्रीडा संस्कृतीला आकार मिळाला. सुहेल फॅरेल टंडन (प्रो स्पोर्ट डेव्हलपमेंटचे संस्थापक) म्हणतात, क्रीडा संस्कृती जटिल आहे. या खेळात प्रेरणा देण्यासाठी रोल मॉडेल्स असतात. ही रोल मॉडेल्स ऑलिम्पियन असण्याची गरज नाही. गोव्यातील फुटबॉल, ओडिशातील वेटलिफ्टिंग आणि मिझोराममधील बॅडमिंटन यासारख्या भारतातील विविध प्रदेशात विविध क्रीडा संस्कृती आहेत. परंतु महिलांना अनेकदा दुर्लक्षित केले गेले आहे. सोनिका कालीरामन म्हणतात, आमच्या घरी आखाडा असला तरी, मला आणि माझ्या बहिणींना कधीही त्याच्या जवळ जाऊ दिले नाही. मास्टर चंदगी राम यांनी पुढाकार घेतल्यानंतरच कुस्तीमध्ये महिलांना प्रोत्साहन मिळू लागले आणि त्यानंतरच आखाड्यांमध्ये महिला कुस्तीपटू दिसू लागल्या.
महिला आखाड्यात उतरल्या
घरातील पुरुष लष्करात भरती झाल्यामुळे, हरियाणातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर शेती आणि पशुपालनाची जबाबदारी सांभाळली. १९७० च्या श्वेतक्रांतीदरम्यान दुग्ध उत्पादनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठ्या दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादकांपैकी एक ठरला. १९६० साली हरित क्रांतीनंतर श्वेतक्रांती झाली, ज्याने हरियाणाला भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य केले. परंतु, १९८० च्या दशकाच्या मध्यापासून हरियाणाला कामगारांचे स्थलांतर, वाढते कर्ज आणि सामाजिक-राजकीय संकटांचा सामना करावा लागला. इतिहासकार प्रेम चौधरी यांच्या संशोधनानुसार, या समस्यांमुळे प्रादेशिक विषमता वाढली, ज्यामुळे गरीब शेतकरी त्यांच्या मुलांसाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्यास प्रवृत्त झाले होते. हंटर कॉलेज, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या प्रोफेसर रुपल ओझा महिला कुस्तीपटूंच्या वाढत्या संख्येबद्दल निरीक्षण नोंदवताना त्यांच्या Wrestling Women: Caste and Neoliberalism (२०१८) संशोधनात म्हणतात, ‘१९९० च्या दशकातील उदारमतवादी आर्थिक सुधारणांनी हरियाणाची अर्थव्यवस्था आणि संस्कृती बदलली. या बदलांमुळे खासगी कुस्ती शाळांच्या वाढीला प्रोत्साहन मिळाले, ज्यामुळे महिलांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या.
जर या करू शकतात, तर तुम्ही का नाही?
नवउदारवादाचा प्रभाव विशेषत: कालीरामन यांच्यावर दिसून आला. त्यांनी सांगितले, “माझ्या वडिलांनी आम्हाला भारताची पहिली ऑलिम्पिक महिला वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरी आणि मिस वर्ल्ड १९९७ डायना हेडन यांची पोस्टर्स दाखवली आणि म्हणाले, ‘जर या करू शकतात, तर तुम्ही का नाही?,’ त्या म्हणतात, ही मुक्तीची झालेली भावना जबरदस्त होती.
खेळातून ग्रामविकास
त्यावेळी महिला कुस्ती हा अनेकांच्या नाकमुरडीचा विषय असला तरी चंदगी राम यांचे सहकारी लक्षणीय प्रभावित झाले होते. चंदगी राम यांच्या आखाड्याचे प्रशिक्षक जगरूप राठी यांनी त्यांची मुलगी नेहा राठी हिचा कुस्तीशी परिचय करून दिला. तिने ४२ वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले असून २०१३ साली तिला भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणखी एक प्रशिक्षक, जब्बार सिंग सोन यांनी मेरठमध्ये महिला कुस्तीची सुरुवात केली. २००६ साली त्यांची विद्यार्थिनी अलका तोमर हिने दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले तर तिची बहीण अंशू तोमरनेही आंतरराष्ट्रीय पदक मिळवले. असे असले तरी समाजाने हे यश स्वीकारले नाही.
ग्रामपंचायतीमध्ये महिला कुस्तीवर बंदी
२०१३ साली मेरठमधील ग्रामपंचायतीने महिलांना कुस्ती खेळण्यास बंदी घातली होती. याउलट, हरियाणामध्ये खेळांची भरभराट झाली. २००६ साली, हरियाणा सरकारने क्रीडा धोरण लागू केले, ज्यामध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन देण्यात आले, प्रतिभा शोध कार्यक्रम सुरू केले आणि महिलांचे क्रीडा महोत्सव आयोजित केले. पदक विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे आणि मोफत प्रवासासारखे फायदे मिळाले, तसेच पोलिसांच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षणही प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त, प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या गावांना बक्षीस देण्यात आली; सुवर्णपदक विजेत्या गावाला पंचायतीकडून २ लाख रुपये मिळाले, त्यामुळे स्थानिक विकासाला चालना मिळाली आणि गावकऱ्यांना त्यांच्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा धोरणांमुळे महिलांना खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले, ज्यामुळे अधिक पालकांनी त्यांच्या मुलींच्या क्रीडा करिअरला पाठिंबा दिला.
फोगट बहिणी
गीता फोगटने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कुस्तीमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले त्यावेळी या खेळाला आणखी गती मिळाली. बबिता फोगटला २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक आणि २०१२ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. फोगट बहिणींच्या यशाने हरियाणातील महिलांच्या कुस्तीसाठी उत्साहाची लाट निर्माण केली. फोगट बहिणींना त्यांच्या कर्तृत्वाची ओळख म्हणून सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आणि २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामागील प्रेरणा ठरल्या.
कुस्ती आणि नोकऱ्या
इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत, ड्यूक युनिव्हर्सिटी पब्लिक पॉलिसीचे प्राध्यापक अनिरुद्ध कृष्णा म्हणाले, “यशस्वी कुस्तीपटूंकडे करिअरचे अनेक पर्याय असतात. साक्षी मलिक तिच्या २०१६ च्या ऑलिम्पिक यशानंतर सब-इन्स्पेक्टर झाली. त्यामुळे या खेळाकडे वळण्याचे प्रमाण अधिक आहे. उषा शर्मा सिहाग या माजी कुस्तीपटू आता हिसार, हरियाणात महिलांची कुस्ती शाळा चालवत आहेत. त्या म्हणतात, “जेव्हा नोकरीच्या संधी कमी असतात, तेव्हा अभ्यास करून काय फायदा? त्यामुळेच अनेक गरीब महिला कुस्ती, बॉक्सिंग आणि कबड्डीकडे वळतात हे खेळ नोकरीची सुरक्षितता देतात.”
शिस्त, प्रसिद्धी आणि संपत्ती
शिक्षण किंवा करिअरच्या इतर मार्गांच्या तुलनेत कुस्ती शक्ती, राजकारण आणि विशेषाधिकारांच्या पलीकडे जाते. ती शिस्त, प्रसिद्धी आणि संभाव्य संपत्ती देते आणि हे सर्व केवळ कौशल्यावर आधारित असते. किंबहुना इतर राज्याच्या तुलनेत हरियाणात कुस्तीसाठी असलेल्या पायाभूत सुविधा जास्त प्रगतीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे अधिकृत आकडेवारी नसतानाही भारतातील बहुतेक महिला कुस्तीपटू हरियाणातून येतात, हे सर्वत्र मान्य केले जाते. विजय कृष्णमूर्ती, एक स्पोर्ट्स रिसर्च स्कॉलर आणि ‘गेट किड्स टू प्ले’चे सह-लेखक आहेत. ते म्हणतात, केवळ मेडल जिंकल्यावरच नाही तर प्रशिक्षणादरम्यानही नोकऱ्या दिल्या जाव्यात. नाहीतर पदक आणि नोकरी मिळाल्यानंतर खेळाडू प्रशिक्षण थांबवतात. आमच्या खेळाडूंना सातत्याने पाठिंबा देणे खूप महत्त्वाचे आहे. कुस्तीपटू अनेकदा या पाठिंब्यासाठी तळमळत असतात, कारण पदक विजेता होण्याचा त्यांचा मार्ग खडतर आणि नीरस असतो. त्यांच्यावर जबाबदाऱ्याही असतात. ज्यात घरगुती कामे आणि पशुधनाची काळजी घेणे यांचा समावेश असतो. प्रेम, फास्ट फूड आणि चित्रपट यासारख्या चैनीच्या गोष्टींचा त्याग करताना प्रशिक्षणाचा खर्च, दूध, तूप, बदाम आणि खेळाच्या पोशाखासाठी तसेच आवश्यक पोषक आहार घेण्यासाठी अनेकजणी आपल्या वडिलांवर अवलंबून असतात. त्यामुळे नोकऱ्यांच्या संधी त्याच काळात मिळणं गरजेचं आहे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ नैनिका सेठ म्हणतात, महिला खेळाडूंच्या मासिक पाळी संदर्भात चर्चा होणे गरजेचे आहे हेही आवर्जून नमूद करतात.
पुढील मार्ग आखणे
कुस्तीपटू महिला केवळ खेळाडू नाहीत; त्या नवीन मार्गदर्शक आहेत, त्यांनी रूढीवादी धारणांना आव्हान दिले आहे आणि खेळांमध्ये महिलांच्या सहभागाची व्याख्या नव्याने केली आहे. पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक लिंग समानता प्राप्त झाली असूनही टंडन असा युक्तिवाद करतात की, चॅम्पियनशिप आणि राष्ट्रीय गौरव यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तरुणांच्या व्यापक सहभागाला प्रोत्साहन दिले पाहिजे. ते म्हणतात, आपण कमी लोकांच्या मदतीने पदक जिंकत आहोत. तर बहुसंख्य जनता यात सहभागी नाही. कृष्णमूर्ती देखील या मताशी सहमत आहेत. ते म्हणतात, भारताच्या तळागाळातील वर्ग अजूनही या खेळात सहभागी नाही. किती यात सहभागी आहेत आणि किती फक्त प्रेक्षक आहेत हेही पाहणं गरजेचं आहे. लिसा ट्रॅव्हला मुराव्स्की (‘प्रोजेक्ट नन्ही काली’ या भारतातील वंचित मुलींच्या शिक्षणाला समर्थन देणाऱ्या NGO च्या क्रीडा संचालक) म्हणतात, पद्धतशीर बदल घडवण्यासाठी महिलांनीच या बदलाचे नेतृत्व केले पाहिजे.
एकुणातच महिला कुस्तीपटूंची कथा संघर्ष आणि बलिदानाच्या मथळ्यांपलीकडे जाते. महिलांनी पहिल्यांदा आखाड्यात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या यशाचा हा प्रवास सुरू झाला आहे.”तर पंचवीस वर्षानंतरही त्यांच्यासमोर आव्हाने कायम आहेत. त्यांचे अनुभव अधिक सर्वसमावेशक आणि आश्वासक क्रीडा वातावरणाची गरज अधोरेखित करतात.
-निकिता मोहता.