कारगिल संघर्ष जवळपास तीन महिने चालला. लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर काहीशा विलंबाने भारतीय हवाई दलास पाचारण करण्यात आले. हवाई दल तैनात झाले नसते तर, कारवाई अधिक लांबली असती. हवाई दलाच्या कारवाईने पाकिस्तानी राजकारण, लष्कर यांच्यावर लक्षणीय परिणाम झाला. हवाई हल्ल्यांनी घुसखोरांची तटबंदी भेदली. रसद पुरवठा तोडला. घुसखोरांच्या लढाऊ क्षमतेचे खच्चीकरण हे प्राथमिक उद्दिष्ट साध्य झाले. लष्कराच्या कारवाईचा मार्ग सुकर झाला. हवाई दलाच्या वापराने सैन्याचे कमी नुकसान होते आणि मोहीम कमी काळात निर्णायक अवस्थेत पोहचते. भारतीय हवाई दलाच्या ‘सफेद सागर’ मोहिमेतून तेच अधोरेखित झाले.

‘सफेद सागर’ मोहीम काय होती?

पाकिस्तानी घुसखोरांनी व्यापलेल्या द्रास, कारगिल, टोलोलिंग, टायगर हिल, मश्कोव्ह खोऱ्यात भारतीय लष्कराने मे १९९९ मध्ये ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेतून कारवाईला सुरुवात केली होती. काही दिवसांत उत्तुंग पर्वतीय क्षेत्रात ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांची प्रतिकार क्षमता अधिक असल्याचे लक्षात आले. भारतीय सैन्याचे नुकसान होऊ लागले. २१ दिवसानंतर हवाई दलास कारवाईत उतरविण्याचे निश्चित झाले. सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने घुसखोरांवर हवाई हल्ले चढविण्यास मान्यता दिली. कारगिल युद्धात हवाई दलाने राबविलेली मोहीम ‘सफेद सागर’ म्हणून ओळखली जाते. जगातील सर्वोच्च उंचीच्या युद्धभूमीवर राबविलेली ही पहिलीच मोहीम. तत्कालीन हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस यांच्या नेतृत्वाखाली ४७ दिवस ती राबविली गेली. यामुळे लष्कराला आगेकूच करीत आपल्या भूप्रदेशावर कब्जा प्रस्थापित करणे शक्य झाले.

हेही वाचा >>>राजकीय पक्षांची नोंदणी अथवा मान्यता केव्हा रद्द होते? कायदा काय सांगतो?

कामगिरी कशी होती?

या मोहिमेत भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर, मालवाहू विमाने व लढाऊ विमानांनी ७६३१ वेळा उड्डाण केले. शोध मोहीम, सैन्य, दारुगोळा, रसद पुरवठा, जखमी सैनिकांना युद्ध क्षेत्रातून बाहेर काढणे ही जबाबदारी सांभाळताना घुसखोरांची ठिकाणे व त्यांच्या रसद पुरवठा केंद्रांवर हल्ले चढविले. एकूण उड्डाणांत ३४७७ उड्डाणे वाहतूक विमानांची तर २४७४ उड्डाणे हेलिकॉप्टरची होती. लढाऊ विमानांनी १७३० वेळा उड्डाण केले. प्रारंभी, एमआय – १७ हेलिकॉप्टर व मिग – २७ विमान गमवावे लागले. त्यामुळे रणनीती बदलण्यात आली. मिराजच्या माध्यमातून ‘लेझर गाइडेड बॉम्ब’चा मारा केला गेला. यासाठी तात्पुरती नवीन शक्कल लढवावी लागली. जेव्हा एखादा बॉम्ब टाकला जातो, तेव्हा त्यातील ‘फ्यूज’ विशिष्ट परिस्थितीत युद्धसामग्रीच्या स्फोटक सामग्रीचा स्फोट करतो. एक हजार पाऊंड बॉम्बसाठी कोणतेही ‘फ्यूज’ उपलब्ध नव्हते. पिस्तुल फ्यूजमध्ये बदल करून एक उपाय शोधला गेला आणि तो प्रभावी ठरला. जॅग्वार व मिग २५ चा टेहेळणीसाठी वापर झाला. सैन्याला तोफखान्याच्या माऱ्याची आवश्यकता होती. रस्त्यांअभावी तोफांची वाहतूक शक्य नव्हती. एमआय – १७ हेलिकॉप्टरमधून हलक्या छोटेखानी तोफा (विलग करून) युद्धभूमीवर नेण्यात आल्या. घुसखोरीचे संकेत मिळाले, तेव्हाच हवाई दलाच्या चिता हेलिकॉप्टरने शोध मोहीम सुरू केली होती. चिता हे नि:शस्त्र होते. त्याच्याकडे कोणतेही आत्मसंरक्षण नव्हते. दिशादर्शन प्रणाली व आधुनिक प्रणाली नव्हती. तरी ते कार्यरत राहिले.

मोहिमेची वैशिष्ट्ये कोणती?

मर्यादित युद्धात हवाई शक्तीचा वापर झाला तर, त्याचे स्वरूप सर्वंकष युद्धापर्यंत विस्तारण्याची शक्यता बळावते. कारगिल हे मर्यादित युद्ध होते. भारतीय हवाई दल मर्यादित युद्ध लढले. सरकारच्या आदेशान्वये नियंत्रण रेषा ओलांडली जाणार नाही, याचे कटाक्षाने पालन केले. कमी तीव्रतेच्या संघर्षात परिणामकारक हवाई कारवाईची क्षमता दलाने सिद्ध केली. हवाई शक्तीचा प्रतिबंधात्मक प्रभाव वाढला. यामुळे सफेद सागर ही मोहीम लष्करी विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वळण ठरल्याचे निवृत्त हवाई दल अधिकारी सांगतात.

हेही वाचा >>>विश्लेषण: कॉफी आणि जातीव्यवस्था याचा नेमका काय संबंध होता?

कोणती आव्हाने पेलली?

उत्तुंग पर्वतीय क्षेत्रात हवाई शक्तीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. लष्करी इतिहासात यापूर्वी कधीही हवाई दलाने कारगिल पर्वताएवढ्या उंचीवर जमिनीवरील लक्ष्यभेद केलेला नव्हता. उच्च उंचीवरील मोहिमेत लढाऊ विमाने व शस्त्रास्त्रांची कामगिरी कळीचा प्रश्न ठरतो. तापमान, हवेची कमी घनता, वातावरणीय प्रभावाने शस्त्रे, हेलिकॉप्टर व वैमानिकांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. या परिस्थितीत वैमानिक कार्यरत राहिले. सरकारची कारवाईत नियंत्रण रेषा ओलांडू नये, ही अट होती. लढाऊ विमानाला वळण घेण्यास (त्रिज्या) साधारणत: सहा ते आठ किलोमीटरचे क्षेत्र लागते. त्यामुळे वैमानिकाला नियंत्रण रेषेला समांतर उड्डाण करावे लागले. परिणामी, लक्ष्य शोधणे कठीण झाले. एखादे लक्ष्य दिसल्यानंतर ५०० आणि एक हजार पौंडचा बॉम्ब वा रॉकेटचा अचूक मारा करणे कठीण होते. या भागात हवाई दलाने यापूर्वी कोणताही सराव केलेला नव्हता. वैमानिकांना मैदानी भागातील कमी उंचीवरून हल्ल्यांसाठी प्रशिक्षित केले गेले होते. त्यांना १५ ते १८ हजार फूट उंतरावरील लक्ष्यांवर प्रहार करण्यासाठी पुन्हा मार्गदर्शन करावे लागले.

Story img Loader