अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर अमेरिकेतील मतदारांनी डोनाल्ड जॉन ट्रम्प यांना अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिले आहे. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेला २७० चा आकडा पार केला. २०२० ची निवडणूक हरल्यानंतर महाभियोग, गुन्हेगारी शिक्षा आणि इतर अनेक आरोप झाल्यानंतर आता ट्रम्प देशाच्या सर्वोच्च पदावर आले आहेत. ते सलग दोन कार्यकाळ सेवा देणारे अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या विजयामुळे कमला हॅरिस आणि डेमोक्रॅटिक पक्षाला धक्का बसला आहे. प्रचारात अर्थव्यवस्था आणि बेकायदा स्थलांतर यांसारखे मुद्दे उपस्थित केल्याने ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला, असे म्हणता येईल.
आपल्या विजयी भाषणात, ट्रम्प स्वतःची प्रशंसा करीत म्हणाले की, ते सर्वकाळातील सर्वांत महान राजकीय चळवळीचे नेते आहेत. ते म्हणाले, “आम्ही त्यांनी अशक्य वाटणाऱ्या अडथळ्यांवर मात केली आणि अभूतपूर्व जनादेश मिळवला.” ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब आता व्हाईट हाऊसमध्ये परत जातील. या अधिकृत निवासस्थानात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब राहतात. १७९२ व १८०० च्या दरम्यान बांधलेले व्हाईट हाऊस वास्तुविशारद जेम्स होबन यांनी डिझाईन केले होते. दोन शतके जुनी असलेली ही इमारत अमेरिकेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. या इमारतविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊ.

हेही वाचा : वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
१८१२ चे युद्ध
२४ ऑगस्ट १८१४ रोजी ब्रिटिशांनी वॉशिंग्टन डी.सी.मधील इतर सरकारी इमारतींसह व्हाईट हाऊस जाळले. व्हाईट हाऊस आतून जळून खाक झाले होते आणि बाहेरचा बराचसा भागही जळून खाक झाला होता. १८१७ मध्ये युद्ध संपल्यानंतर लवकरच व्हाईट हाऊसची पुनर्बांधणी करण्यात आली. व्हाईट हाऊस अनेक वेळा विस्तारित केले गेले आहे. ओव्हल ऑफिस असलेले वेस्ट विंग १९०२ मध्ये थिओडोर रुझवेल्टच्या नेतृत्वाखाली जोडले गेले. दुमजली वेस्ट विंगमध्ये ओव्हल ऑफिस, सिच्युएशन रूम, कॅबिनेट रूम, रुझवेल्ट रूम व प्रेस ब्रीफिंग रूम यांचा समावेश आहे. ईस्ट विंग १९४२ मध्ये जोडली गेली, जी ‘फर्स्ट लेडी’ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. ईस्ट विंगला मोठ्या कार्यक्रमांदरम्यान पाहुण्यांच्या स्वागतासाठी एक प्रवेशद्वारही आहे.
‘व्हाईट हाऊस’मध्ये खोल्या किती?
अधिकृत व्हाईट हाऊस वेबपेजनुसार या इमारतीत २८ फायरप्लेस, आठ जिने, तीन लिफ्ट, ४१२ दरवाजे व १४७ खिडक्या आहेत. तसेच १४० पाहुण्यांसाठी जेवण तयार करण्याकरिता मोठे स्वयंपाकघर आहे. ही इमारत आणि त्यासभोवतालची जागा १८ एकर परिसरात व्यापली आहे.

पूर्वी ‘व्हाइट हाऊस’ला कोणत्या नावाने ओळखले जायचे?
१९०१ मध्ये राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाला ‘व्हाईट हाऊस’ असे नाव दिले. त्यापूर्वी त्याला प्रेसिडेंट हाऊस, एक्झिकेटिव्ह मेन्शन, प्रेसिडेन्शियल पॅलेस, पीपल्स हाऊस व प्रेसिडेन्शियल मेन्शन यांसारख्या विविध नावांनी ओळखले जायचे.
पूर्णवेळ काम करणारे तीन हजार कामगार
एकट्या व्हाईट हाऊस कार्यालयात ५०० पेक्षा जास्त लोक काम करतात. उपाध्यक्ष कार्यालयात सुमारे १००, लष्करी कार्यालयात सुमारे १,३०० आणि व्यवस्थापन व बजेट कार्यालयात सुमारे ५०० कामगार काम करतात. त्याव्यतिरिक्त व्हाईट हाऊसमध्ये ५०० हून अधिक गुप्त सेवा एजंट आणि जवळपास २०० कर्मचारी सदस्यदेखील आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे संरक्षण करण्यासाठी समर्पित असणार्यांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे.

मतदानाच्या अधिकारासाठी व्हाईट हाऊससमोर दोन वर्षे केलेले आंदोलन
‘सायलेंट सेंटिनेल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाने व्हाईट हाऊसच्या गेटबाहेर निषेध करण्यास सुरुवात केली. महिला तब्बल अडीच वर्षे आठवड्यातून सहा दिवस व्हाईट हाऊसच्या बाहेर तळ ठोकून होत्या. जोपर्यंत महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हलण्यास नकार दिला होता. त्यांना वाईट वागणूक दिली गेली, त्रास दिला गेला, तुरुंगात टाकले गेले व मारहाणही झाली. अखेर त्यांच्या दृढनिश्चयामुळे ४ जून १९१९ रोजी १९ वी घटनादुरुस्ती पार पडली आणि शेवटी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.