The Kumbh Currency: महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक विधींवर आधारित उत्सव नाही तर ती एक प्रबळ आर्थिक यंत्रणा ठरली आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक महोत्सवात ४० कोटींहून अधिक भाविक गंगा नदीच्या किनारी एकत्र येतील. श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर आर्थिक प्रगतीस चालना देत आहे.

महाकुंभ: प्राचीनतेपासून आधुनिकतेपर्यंतचा प्रवास

महाकुंभ मेळ्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. सातव्या शतकातील चिनी प्रवासी ह्यूएन त्सांग/ श्वांग यांनी आपल्या लिखाणांमध्ये कुंभमेळ्याच्या श्रद्धा आणि व्यापाराच्या संगमाचा उल्लेख केला आहे. त्या काळी शासक, व्यापारी आणि सामान्य नागरिक गंगेच्या पवित्र जलात स्नान करत आणि मोठ्या प्रमाणात दानधर्म करत. ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली गेली आहे. परंतु, आता केवळ श्रद्धा नव्हे तर कुंभ हा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव ठरला आहे. ४० दिवस चालणारा हा मेळा लाखो लोकांना रोजगाराची संधी देतो आणि व्यापाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अधिक वाचा: Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यावर ब्रिटिशांनी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न का केला होता?

अर्थव्यवस्थेची पायाभूत रचना

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळ्याच्या तयारीसाठी ६९९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधी २०१९ च्या कुंभमेळ्यासाठी ३,७०० कोटी रुपये खर्च झाले होते. यावेळी ५४९ प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यात पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. या मेळ्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर २ लाख कोटी रुपयांपर्यंतचा सकारात्मक प्रभाव पडेल असा अंदाज आहे. २५,००० कोटी रुपयांची उलाढाल केवळ उत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारातून होईल.

गंगेच्या किनाऱ्यावरील आर्थिक बाजारपेठ

महाकुंभ ही एक भव्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी प्रत्येक निर्णय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. फूड स्टॉल लावणे, तंबू उभारणे किंवा फ्लोटिंग जेट्टी उभारणे यांसारख्या प्रत्येक गोष्टीत आर्थिक जोखीम आणि संधी यांचा विचार केला जातो. गंगेच्या किनाऱ्यावर १.६ लाख तंबू उभारले गेले आहेत. यात २,२०० लक्झरी तंबूंचा समावेश आहे. या तंबूंसाठी प्रति रात्र १८,००० ते १ लाख रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. काही तंबूंमध्ये बाथरूम, वाय-फाय, बटलर सेवा आणि हीटिंग सुविधा आहेत. याशिवाय, शहरातील २१८ हॉटेल्स, २०४ गेस्ट हाऊस आणि ९० धर्मशाळा भाविकांना निवासासाठी उपलब्ध आहेत.

पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळ्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. यामध्ये प्रमुख सुविधा खालीलप्रमाणे आहेत:

  1. पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प: फ्लोटिंग जेट्टी, वॉटर स्पोर्ट्स आणि मंदिर पर्यटनाच्या माध्यमातून देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.
  2. प्रवाशांसाठी विशेष कॉरिडॉर: गंगाकाठावर १०,००० ते २०,००० यात्रेकरूंच्या व्यवस्थेसाठी विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत.
  3. गंगा घाटांवरील सुधारणा: स्वच्छता व्यवस्थापन, घाट विकास आणि बहुभाषक संकेतस्थळांच्या माध्यमातून घाट अधिक आकर्षक बनवले गेले आहेत.
  4. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन: २,००० हून अधिक विक्रेत्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

व्यवसायाचा विस्तार

महाकुंभ मेळ्यात व्यवसाय वाढवण्यासाठी विविध क्षेत्रे सक्रिय झाली आहेत. महाकुंभच्या फूड स्टॉल्ससाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. उदाहरणार्थ, RR हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने १२-१३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि ५०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या फूड कोर्टसाठी एका स्टॉलची किंमत १.२३ कोटी रुपये होती. आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससुद्धा कुंभच्या व्यवसायात रस दाखवत आहेत. Starbucks, Coca Cola आणि Domino’s यांसारख्या ब्रँड्सनी कुंभमध्ये सहभाग नोंदवला आहे. काही व्यावसायिकांनी १०० ते २०० कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

छोट्या व्यापाऱ्यांसाठी मोठी संधी

महाकुंभ मेळ्यात फक्त मोठ्या उद्योगांनाच नाही, तर छोटे व्यापारी आणि स्थानिक कामगारांनाही आर्थिक संधी उपलब्ध होतात. घाटांवर नाव चालवणारे नावाडी, पथारीवर विक्री करणारे दुकानदार आणि पूजा साहित्य विकणारे व्यापारी या काळात आपली उलाढाल १० पट वाढवतात. स्नानाच्या दिवसांत छोटे व्यवसायिक हजारोंची उलाढाल करतात. काही नावाडी एका प्रवासासाठी ७५ रुपये आकारतात. एका नावाड्याने सांगितले की, “बोटीची खरेदी करण्यासाठी मला १ लाख रुपये कर्ज घ्यावे लागले. या कुंभमुळे मला ३-४ लाख रुपयांची कमाई होणे अपेक्षित आहे.”

तंबूंचे शहर: लक्झरीपासून सामान्य निवासापर्यंत

तंबूंच्या भव्यतेमुळे महाकुंभचे आयोजन वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तंबूंच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे:

  1. लक्झरी तंबू: प्रति रात्र १ लाख रुपयांपर्यंत दर असलेल्या या तंबूंमध्ये इन-सूट बाथरूम, वाय-फाय, आणि हीटिंग सुविधा आहेत.
  2. मूलभूत तंबू: सामान्य भाविकांसाठी तंबूंमध्ये स्वस्त व आरामदायक निवासव्यवस्था आहे.
  3. इग्लू तंबू: गंगेच्या किनाऱ्यावर इग्लूच्या आकाराचे पारदर्शक तंबू उभारण्यात आले आहेत.

पर्यटनाचा आर्थिक परिणाम

महाकुंभ उत्सवामुळे स्थानिक व्यवसायांना प्रचंड चालना मिळते. उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे की कुंभमुळे २५,००० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होईल. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (CII) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाकुंभ हा स्थानिक व्यवसायांसाठी सुवर्णसंधी निर्माण करतो. जिथे एका वर्षाचे उत्पन्न व्यावसायिक दोन महिन्यांत कमावतो.

अधिक वाचा: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

सर्वांसाठी संधी

महाकुंभ हा फक्त मोठ्या ब्रँड्ससाठी नाही, तर प्रत्येकासाठी आहे.

साधू-संतांचे निवास: नागा साधूंनी त्यांच्या तंबूसाठी खर्च केला आहे. काही साधूंनी तंबू उभारणीसाठी १०,००० रुपये खर्च केले आहेत.

स्थानिक होमस्टे: काही स्थानिकांनी होमस्टे सुरू करून ३ पट नफा कमवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

छोटे स्टॉल्स: स्टॉल्स लावण्यासाठी ९२ लाख रुपये खर्च करणारे व्यापारीही या मेळ्यात मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवतात.

महाकुंभ: एक जागतिक अनुभव

महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. लाखो भाविक आणि शेकडो व्यावसायिक यांच्या सहभागामुळे महाकुंभ जागतिक स्तरावर महत्त्वाचा उत्सव ठरतो. श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापनाचा हा संगम भारताच्या आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधोरेखित करतो. महाकुंभ हा श्रद्धेइतकाच आर्थिकदृष्ट्याही भारताचा वारसा आहे. या ठिकाणी धार्मिकता आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. स्थानिकांपासून जागतिक ब्रँड्सपर्यंत, सर्वांसाठी संधीचा मेळ हा कुंभ आहे.

Story img Loader