इंडोनेशियामध्ये बेल्जियमच्या आकाराची जंगले बायोइथेनॉल तयार करण्यासाठी तोडली जात आहेत, ज्यामुळे लाखो प्राणी आणि स्थानिक लोक विस्थापित होत आहेत. पण इतकी प्रचंड जंगलतोड करण्याचा निर्णय त्या देशाने का घेतला असावा, यातून कोणते नुकसान संभवते, याविषयी…

बायोइथेनॉल प्रकल्पामुळे नुकसान कोणते?

आग्नेय आशियाई देश इंडोनेशिया उसापासून बनवलेल्या बायोइथेनॉल, तांदूळ आणि इतर अन्न पिकांचे उत्पादन करण्यासाठी जगातील सर्वात मोठा, जवळजवळ बेल्जियमच्या आकाराचा जंगलतोड कार्यक्रम राबवण्याची योजना आखत आहे. यामुळे जगण्यासाठी जमिनीवर अवलंबून असलेल्या स्थानिक गटांना विस्थापित व्हावे लागणार आहे. दरम्यान, आदिवासी समुदायांनी त्यांना सरकार-समर्थित प्रकल्पांमुळे आधीच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. इंडोनेशिया जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वर्षावन आणि ऑरंगुटान, हत्ती आणि महाकाय वनफुलांसह अनेक धोक्यात असलेल्या प्रजातींचे अधिवासस्थान आहे. इंडोनेशियातील सर्वात मोठ्या नियोजित जंगलतोड मोहीमेमुळे त्याठिकाणी असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांना नुकसान होणार आहे. 

इंडोनेशियात आधीपासूनच जंगलतोड?

१९५० पासून इंडोनेशियातील ७४ दशलक्ष हेक्टर (२८५,७१५ चौरस मैल) पेक्षा जास्त वर्षावन, जे जर्मनीच्या आकारापेक्षा दुप्पट आहे, पाम तेल, कागद आणि रबर लागवड, निकेल खाणकाम आणि इतर वस्तूंच्या विकासासाठी तोडण्यात आले आहे. जाळण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये विस्तृत शेतीयोग्य जमीन असल्याने बायोइथेनॉल उत्पादनाची प्रचंड क्षमता आहे परंतु सध्या ऊस आणि कसावासारख्या शाश्वत कच्च्या मालाची कमतरता आहे. २००७ मध्ये बायोइथेनॉल-मिश्रित इंधन सादर करण्याचा प्रयत्न काही वर्षांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्याअभावी बंद करण्यात आला होता. तेव्हापासून सरकारने पापुआ आणि कालीमंतन बेटांवर ४.३ दशलक्ष हेक्टर (सुमारे १०.६ दशलक्ष एकर) पसरलेल्या अन्न आणि ऊर्जा इस्टेट मेगा-प्रकल्पावर काम सुरू केले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा मेगा-प्रकल्प जगातील सर्वात मोठा जंगलतोड प्रकल्प ठरत आहे.

पर्यावरण तज्ज्ञांनी काय इशारा दिला?

जंगलतोडीमुळे धूप होते. जैवविविधता क्षेत्रांचे नुकसान होते. वन्यजीव आणि जंगलावर अवलंबून असलेल्या मानवांना धोका निर्माण होतो आणि तीव्र हवामानामुळे होणाऱ्या आपत्ती वाढतात. त्यावर पुनर्वनीकरणाचा पर्याय शोधला तरीही आणि पुनर्वनीकरण जरी आवश्यक असले तरी, जुन्या परिसंस्थांना ते भरून काढू शकत नाही. आधीच्या परिसंस्थांपासून मिळणारे फायदे नव्याने उभारलेल्या परिसंस्थांच्या पर्यावरणीय फायद्यांशी जुळत नाही, कारण ते मातीत मोठ्या प्रमाणात कार्बन आणि बायोमास साठवतात. जलचक्र नियंत्रित करतात आणि जैवविविधतेला समर्थन देतात.

पापुआ बेटावरील समुदायाचे म्हणणे काय?

इंडोनेशिया सरकारने पापुआ प्रदेशातील सुमारे दोन दशलक्ष हेक्टर ऊस लागवड क्षेत्र वापरून बायोइथेनॉलचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. शिकार, मासेमारी आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळखीच्या इतर पैलूंसाठी या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या पापुआमधील स्थानिक समुदायांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पांमुळे त्यांच्या मूलभूत गरजांना हानी पोहोचली आहे. गावकऱ्यांनी शिकारीसाठी वापरलेल्या जमिनीचे उसाच्या रोपवाटिकांमध्ये रूपांतर केले आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या नेहमीच्या जगण्याच्या पद्धतींमध्ये बदल करावा लागला आहे. पापुआची जंगले जगातील ‘सर्वात मोठ्या फुप्फुसांपैकी एक’ आहेत, तरीही ती नष्ट केली जात आहेत. इंडोनेशियाने पापुआचे संरक्षण केले पाहीजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे, त्यांनी ते जंगल नष्ट करू नये. या प्रकल्पांच्या विकासाचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांसाठी आदिवासी गटांवर होईल. शतकानुशतके वर्षावनांवर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायांनी साखरेच्या मळ्यात राहावे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतात नेमके काय घडले?

हैदराबादजवळील ४०० एकरच्या कांचा गचीबोवली जंगलाच्या तोडीविषयी संपूर्ण भारतात चिंता वाढत आहे आणि लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. तेलंगणा सरकार कांचा गचीबोवली वनजमिनीचा वापर आयटी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करू इच्छित आहे. मात्र, त्यासाठी लाखो प्राण्यांची घरे आणि पर्यावरण धोक्यात आणले जात आहे. इंडोनेशियन सरकारने तेलंगणाच्या अनेक पावले पुढे जाऊन जगातील सर्वात मोठा जंगलतोड प्रकल्प राबवला आहे. 

rakhi.chavhan@expressindia.com