झोंबीवर आधारित अनेक वेब सीरिज, चित्रपट, लघुपट आपण पाहिले असतील. त्यात दाखविण्यात येणारे झोंबी एखाद्या प्रयोगशाळेत संशोधनात होणार्‍या चुकीमुळे, बुरशीच्या संपर्कात आल्याने तसे होतात. त्यातील बहुतांश घटना काल्पनिक असतात. परंतु, या वेब सीरिजमध्ये किंवा चित्रपटात दाखवलेली गोष्ट खरी झाली तर? झोंबीचे अस्तित्व खरे करणारे काही पुरावे संशोधकांना आढळून आले आहेत. कोळ्यांना (Spider) झोंबीमध्ये बदलणारी बुरशी स्कॉटिश रेनफॉरेस्टमध्ये सापडली आहे. त्याने निसर्गप्रेमी, ‘द लास्ट ऑफ अस’ गेम आणि वेब सीरिजच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द लास्ट ऑफ अस’ वेब सीरिज झोंबींवर आधारित आहे. त्यात अशाच बुरशीमुळे माणसे संक्रमित होऊन झोंबी होतात. ‘झोंबी फंगस’ नक्की काय आहे? संशोधनात नक्की काय आढळून आले आहे? याचा माणसांना धोका किती? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोंबी बुरशीचा शोध कोणी लावला?

झोंबी बुरशी म्हणून ओळखण्यात येणार्‍या गिबेलुला बुरशीचा शोध निसर्गशास्त्रज्ञ बेन मिशेल यांनी अर्गिल व बुटे येथील वेस्ट कोवल हॅबिटॅट रिस्टोरेशन प्रकल्पात लावला. त्यांनी गिबेलुला बुरशीचा शोध घेण्याबद्दलचा आपला अनुभव, “या प्रकल्पाचा भाग होऊन खूप आनंद झाला आणि मला अनेक प्रजाती सापडल्या आहेत. पण आतापर्यंतचा माझा सर्वांत आवडता आणि अनोखा शोध गिबेलुला बुरशी आहे,” या शब्दांत सांगितला. ही बुरशी बुरशीजन्य बीजाणूंद्वारे कोळ्यांना संक्रमित करते. ही बुरशी त्यांचे बाह्य कंकाल तसेच ठेवते आणि आतील भाग खाते. त्यानंतर कोळ्यांतून बुरशीमुळे शरीराच्या भागासारखाच एक प्रकार बाहेर पडतो, जो बीजाणूंद्वारे इतरांना संक्रमित करतो. मिशेलने पुढे बुरशीमुळे होणाऱ्या वर्तनातील बदलाचे स्पष्टीकरण दिले आणि सांगितले, “गिबेलुला कोळी पानांच्या खालच्या बाजूस लपण्याचा प्रयत्न करते. जेव्हा त्यांच्यातून शरीराच्या भागासारखाच एक प्रकार निघतो. तेव्हा बीजाणू पावसापासून संरक्षित करण्यासाठी त्या पानांखाली लपतात. हे थोडेसे भयंकर आहे; परंतु नैसर्गिक जगाचा भाग आहे.”

हे विलक्षण वर्तन ‘द लास्ट ऑफ अस’ या वेब सीरिजमध्ये दाखविल्याप्रमाणे आहे. या वेब सीरिजमध्ये कॉर्डीसेप्स-प्रेरित बुरशीजन्य संसर्ग माणसांना हिंसक झोंबीमध्ये रूपांतरित करतो. पेड्रो पास्कल व बेला रॅमसे अभिनेते असलेल्या या वेब सीरिजमध्ये सुरुवातीलाच बुरशीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी वैज्ञानिक इशारा देतात; ज्याच्या उद्रेकामुळे माणसांमध्ये संसर्ग पसरतो. या वेब सीरिजमध्ये संक्रमित माणसांमध्ये भयंकर परिवर्तन दिसून येते, ते आंधळे होतात आणि त्यांच्या डोक्यात बुरशीची वाढ होते.

गिबेलुला बुरशीविषयी शास्त्रज्ञांना कायम एक आकर्षण राहिले आहे. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

हेही वाचा : हुकूमशाह किम जोंग उनने केली जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्राची चाचणी? काय आहे उत्तर कोरियाकडील आयसीबीएम?

गिबेलुला बुरशीचा परिणाम माणसांवर होऊ शकतो का?

गिबेलुला बुरशीविषयी शास्त्रज्ञांना कायम एक आकर्षण राहिले आहे. तज्ज्ञ सांगतात की, काल्पनिक कथांवर आधारित चित्रपट वा वेब सीरिजमध्ये दाखविण्यात येते, त्याप्रमाणे माणसांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही ज्ञात बुरशी विकसित झालेली नाही. मिशेलने टिप्पणी केल्याप्रमाणे, “गेल्या ७० वर्षांत स्कॉटलंडमध्ये गिबेलुलाचे १० रेकॉर्ड्स आहेत. ही बुरशी समशीतोष्ण रेन फॉरेस्टमध्ये आढळून येते.” संशोधकांना आढळून आलेल्या या बुरशीविषयी फारशी माहिती नाही. संशोधकांनी आढळून आलेल्या या बुरशीचा माणसांना धोका असल्याचा इशाराही अनेकदा दिला आहे. मात्र, अद्याप तरी माणसांना या बुरशीचे संक्रमण झाल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The last of us kind zombie fungus found that eats the host body inside out rac