मुंबई शहरातील हवेचा दर्जा अनेक दिवस खालावलेला आहे. धुलिकणांचे अतिधोकादायक प्रमाण, त्यामुळे नागरिकांवर होणारे दुष्परिणाम, वाढते प्रदूषण यावर तातडीचा उपाय म्हणून धुरके शोषक यंत्राचा (अँटी स्मॉग गन) पर्याय पालिकेने निवडला आहे. धुरके शोषक यंत्र नेमके काय काम करते, ते किती प्रभावी आहे याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुरके शोषक यंत्र म्हणजे काय?

धुरके शोषक यंत्र म्हणजे अँटी स्मॉग गनला स्प्रे गन, मिस्ट गन किंवा वॉटर कॅनन असेही म्हणतात. अँटी स्मॉग गन धूळ आणि इतर प्रदूषकांचे कण पाण्यासह जमिनीवर आणते. त्यामुळे वायू प्रदूषणाची पातळी कमी होते. अवजड वाहनांच्या मागील बाजूस अँटी स्मॉग गन बसवून ती पाण्याच्या टाकीला जोडलेली असते. मोठ्या शहरांमधील वाढते हवा प्रदूषण कमी करण्याबरोबरच इतर काही कारणांसाठीही अँटी स्मॉग गन वापरल्या जातात. खाणीत ग्राइंडिंग, कोळसा आणि दगड फोडताना निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.

धुरके शोषक यंत्र कसे काम करते?

अँटी स्मॉग गनमधून पाणी फवारले जाते. सूक्ष्म तुषारांना धुळीचे कण चिकटतात आणि ते जमिनीवर बसतात. पावसासारखा परिणाम या यंत्रणेने साधला जातो. अधिक दाबाने फवारलेल्या पाण्याचे एक आवरण तयार होते, त्यात धूळ आणि प्रदूषकांचे सूक्ष्म कण शोषले जातात. अँटी स्मॉग गनमधून सुमारे १५० फूट उंचीपर्यंत पाणी फवारता येते आणि एका मिनिटात सुमारे ३० ते १०० लिटर पाण्याची फवारणी केली जाऊ शकते.

हेही वाचा… विश्लेषण: गतविजेते इंग्लंड विश्वचषकात इतके कसे ढेपाळले? अंतर्गत कुरबुरींची लागण?

धुरक्याचे दुष्परिणाम काय आहेत?

धुरक्याचे परिणाम मानवासह, प्राणी, वनस्पती आणि एकूणच निसर्गावर दिसून येतात. किरकोळ दुखण्यापासून ते फुप्फुसाच्या कर्करोगासारखे आजार जडण्यास धुरके कारणीभूत ठरू शकते. धुरके ही विशेषतः औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणामुळे उद्भवणारी विनाशकारी स्थिती आहे.

अँटी स्मॉग गन हा कायमस्वरूपी उपाय आहे का?

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, या उपकरणांचा प्रभाव मर्यादित काळासाठीच होतो. प्रदूषण कमी करण्यासाठी हा कधीही कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही. या यंत्रातून जेव्हा पाणी फवारले जाते तेव्हा त्यांचा प्रभाव विशिष्ट क्षेत्र किंवा जागेपुरता मर्यादित असतो. परिस्थिती तत्काळ आटोक्यात आणण्यासाठीचा हा तात्पुरता उपाय आहे, दीर्घकाळ टिकणारा उपाय नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या यंत्राचा वापर प्रथम कुठे करण्यात आला?

मुंबईत सध्या पालिकेने मोठ्या बांधकामांच्या ठिकाणी अँटी स्मॉग गन बसवणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी दिल्ली आणि नोएडा येथे धुरके शोषक यंत्राचा वापर करण्यात आला होता. दिल्ली येथील महादेव रोड येथे सध्या एक धुरके शोषक यंत्र असून आणखी काही यंत्रे भाड्याने घेण्याची स्थानिक प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे.

धुरके शोषक यंत्राची किंमत किती?

धुरके शोषक यंत्राची किंमत साधारण एक ते पन्नास लाखांपर्यंत आहे. विविध प्रकारांनुसार त्यांच्या किमतीत बदल होतात. यामध्ये ट्रक माउंटेड ॲंटी स्मॉग गन, टेरेस ॲंटी स्मॉग गन, ऑटोमॅटिक ॲंटी स्मॉग गन असे विविध प्रकार आहेत. अँटी स्मॉग गनप्रमाणे अँटी स्मॉग टॉवर्सही असतात. ते धुरके शोषून शुद्ध हवा सोडतात. परंतु त्याचाही उपयोग अत्यंत कमी क्षेत्रापुरता होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याची किंमत २२ कोटी रुपयांपासून सुरू होते. भारतात विविध ठिकाणी सध्या आठ टॉवर्स आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The municipality has chosen the option of an anti smog gun to reduce increasing pollution how effective it is print exp dvr
Show comments