-भक्ती बिसुरे
करोना महामारीच्या काळात लहान मुलांमध्ये या संसर्गाची लक्षणे प्रामुख्याने सौम्य राहिल्याने नागरिक आणि आरोग्य यंत्रणांसाठी ती बाब दिलासादायक ठरली. मात्र सध्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारी बातमी युरोपच्या काही भागांतून समोर येत आहे. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत युरोपच्या ११ देशांमध्ये तब्बल १६९ मुलांना तीव्र यकृतरोग (अक्युट हिपेटायटिस) आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या घडामोडीकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहनकेले आहे. युरोपातील काही देश वगळता आशियात केवळ जपानमध्ये या प्रकारचा संसर्ग आढळून आला आहे. भारतात अद्याप अशा रुग्णांची नोंद नाही, मात्र खबरदारी आवश्यक आहे. म्हणूनच या आजाराच्या सद्यःस्थितीबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
युरोपमधील चित्र काय?
युरोपातील तब्बल ११ देशांमध्ये सुमारे १६९ बालकांना (२१ एप्रिलपर्यंत) तीव्र यकृत विकाराची (अक्युट हिपेटायटिस) लक्षणे दिसून आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने एक महिना ते १६ वर्ष या वयोगटातील बालके आणि मुलांचा समावेश आहे. हे रुग्ण प्रामुख्याने ब्रिटन, स्पेन, इस्रायल, अमेरिका, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड, इटली, नॉर्वे, फ्रान्स, रोमानिया आणि बेल्जियम या देशांमध्ये आहेत. पोटात दुखणे, डायरिया, उलट्या आणि त्यानंतर तीव्र स्वरूपाचा यकृत विकार, यकृतातील एंझाईम्समध्ये झालेली वाढ अशी लक्षणे या मुलांमध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे, हिपेटायटिस ए, बी किंवा सी हे काविळीला कारणीभूत ठरणारे विषाणू या विकाराला कारणीभूत ठरत असताना दिसत नाहीत. उपलब्ध आकडेवारीनुसार १७ मुलांना यकृत प्रत्यारोपणाची गरज निर्माण झाली असून एक रुग्ण दगावल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे मत काय?
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सर्वप्रथम मुलांमध्ये तीव्र यकृतविकाराची लक्षणे आढळण्यास सुरुवात झाली. या यकृतविकाराचे मूळ ज्ञात नाही. ज्या मुलांमध्ये हा संसर्ग आढळला आहे, ती सर्व मुले या विकाराचे निदान होण्यापूर्वी संपूर्ण निरोगी होती, हे त्यांच्या वैद्यकीय माहितीवरून स्पष्ट झाले आहे. अडिनोव्हायरस ४१ या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे हा संसर्ग होत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विषाणूचे तब्बल ५० प्रकार आहेत. अडिनोव्हायरस ४१ हा विषाणू डायरिया, उलट्या, ताप आणि श्वसनविकारांना कारणीभूत ठरतो. रोगप्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या बालकांमध्ये त्यामुळे हिपेटायटिस संसर्ग होण्याची शक्यता असते, मात्र निरोगी आणि सुदृढ बालकांमध्ये तशी शक्यता कमी असल्यामुळे या संसर्गाचे कारण शोधण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला काय?
सध्या ज्या देशांमधील बालकांमध्ये हा संसर्ग आहे ते देश आणि इतर देशांनीही खबरदारी घेण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या संसर्गाचे कारण अद्याप अज्ञात असल्याने कोणत्याही स्वरूपातील श्वसन विकार, पोटाचे विकार यांबाबत गाफील न राहण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. प्राथमिक खबरदारीसाठी हात धुणे, मुलांच्या आरोग्याच्या कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष न करणे आणि शक्य तेवढ्या तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
लसीकरणाचा संबंध आहे का?
युरोपातील ज्या देशांमध्ये मुलांमधील यकृतविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या देशांमधील बालकांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झालेले नसल्याने या संसर्गाचा आणि लसीकरणानंतरच्या दुष्परिणामांचा (साइड इफेक्ट्स) काही संबंध नसल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. मात्र, करोना काळात मुलांमध्ये अडिनोव्हायरसमुळे उद्भवणाऱ्या संसर्गांचे प्रमाण कमी राहिल्याने, अडिनोव्हायरसच्या उद्रेकासारखी परिस्थिती आहे का याबाबत सखोल संशोधन होण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
तज्ज्ञ डॉक्टर्स काय म्हणतात?
बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर म्हणाल्या, की महामारीच्या काळात सर्वांत सुरक्षित राहिलेला वर्ग म्हणजे मुले होय. करोना काळात मुले घरातच बंदिस्त राहिल्याने त्यांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क आलेला नाही. त्यातून त्यांना नियमितपणे होणारे लहान-मोठे संसर्गही झाले नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मुलांची विषाणू किंवा जिवाणू विशिष्ट रोगप्रतिकारशक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे स्वाभाविकच आता शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये तापासारखे संसर्ग दिसून येत आहेत. अडिनोव्हायरस विषाणूच्या संसर्गातून होणारा ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब अशी लक्षणे मुलांमध्ये दिसत आहेत. तशातच उष्माघाताची लाट असल्याने साधा ताप उतरण्यासही चार-पाच दिवसांचा वेळ लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुलांमध्ये लक्षणे असताना यकृत विकार बळावल्याचे दिसून आले. या मुलांना यकृत प्रत्यारोपण लागेल का अशी चिंताही निर्माण झाली, मात्र इतर लक्षणे नियंत्रणात आल्यानंतर यकृत विकारही कमी झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले.
यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपिन विभुते म्हणाले, की भारत आणि आशियामध्ये अद्याप या आजाराचे किंवा आजारासदृश रुग्ण आढळल्याची नोंद नाही. मात्र, अडिनोव्हायरसमध्ये झालेल्या काही बदलांमुळे प्रामुख्याने युरोप आणि त्याखालोखाल अमेरिकेत मुलांमध्ये हा आजार दिसत आहे. केवळ आजार नव्हे तर काही मुलांना यकृत प्रत्यारोपण करण्यावाचून पर्याय नसल्याचेही दिसून आले आहे. भारतात सध्या चिंतेचे कारण नाही, मात्र मुलांमध्ये श्वसनविकार आणि त्याबरोबरीने काविळीसदृश लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.