The Mystery of the 1831 Blue Sun: सूर्य म्हणजे तेजाचा गोळा, धगधगते तापमान आणि रंगछटा म्हटल्या तर पिवळा आणि नारंगी. या पलीकडे जर सूर्यानेच रंग बदलला तर चित्र कसं असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. परंतु, असंच काहीसं सुमारे २०० वर्षांपूर्वी घडलं होतं. सूर्याने चक्क निळ्या रंगाचं आवरण परिधान केलं होतं. मात्र असं नेमकं का घडलं? हे अद्यापही गूढ होतं. अलीकडेच संशोधकांनी या रहस्याची उकल केल्याचा दावा केला आहे. याच नव्या संशोधनाचा घेतलेला हा आढावा.

प्रसिद्ध जर्मन संगीतकार फेलिक्स मेंडेल्सोन यांनी १८३१ साली उन्हाळ्यात आल्पसाठी केलेल्या प्रवासादरम्यान एक असामान्य निरीक्षण नोंदवलं. वास्तविक उन्हाळा सुरु होता. पण प्रत्यक्ष सभोवतालचे वातावरण हिवाळ्यातले होते. प्रचंड थंड तापमान आणि बर्फाच्छादित टेकड्यांनी अपवादात्मक परिस्थिती निर्माण केली होती. हवामानातील अनियमित बदल केवळ एकट्या ठिकाणी झालेला नव्हता. संपूर्ण उत्तर गोलार्धात तापमान अनपेक्षितपणे कमी झाले होते. परिणामी पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन घटले आणि मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाई निर्माण झाली. जवळपास गेल्या दोन शतकांपासून हा वातावरणातील बदल शास्त्रज्ञांसाठी रहस्य ठरला होता. या विलक्षण थंड हवामानासाठी एखादा ज्वालामुखीचा उद्रेक जबाबदार असावा असे मत मांडण्यात आले होते. परंतु, त्यासाठी निश्चित पुरावा सापडला नव्हता. मात्र, आता यूकेमधील सेंट अँड्र्यूज विद्यापीठाच्या संशोधकांनी उत्तर शोधल्याचा दावा केला आहे. या प्रश्नाचे उत्तर रशियातील कुरिल बेटांमध्ये असलेला झावरित्स्की ज्वालामुखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इतिहासात गडप झालेला ज्वालामुखीचा उद्रेक

१८३१ च्या वसंत आणि उन्हाळ्यात एका अज्ञात ज्वालामुखीने मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड वातावरणात सोडले. यामुळे तात्पुरते पण परिणामकारक जागतिक पातळीवर थंड हवामान निर्माण झाले आणि हवामानात प्रचंड बदल घडून आला. त्या काळातील नोंदींमध्ये सूर्याला एक रहस्यमय निळसर, जांभळट किंवा हिरवट छटा दिसल्याचे वर्णन आहे. रंग बदल ही जरी विस्मयकारक घटना वाटत असली तरी त्यापेक्षा अधिक गंभीर परिणाम शेतीवर झाले. तापमानातील घसरणीमुळे पिके नष्ट झाली, अन्नटंचाई निर्माण झाली आणि विशेषतः उत्तर गोलार्धात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला. त्या काळातील शास्त्रज्ञांनी या हवामान बदलासाठी ज्वालामुखीच्या उद्रेकाला जबाबदार ठरवले, परंतु अचूक नोंदींचा अभाव असल्यामुळे याचा निश्चित स्रोत ओळखू शकला नाही. त्यासाठी काही संभाव्य ज्वालामुखी सुचवले गेले, ज्यामध्ये फर्डिनांदिया (सिसिलीच्या जवळील पाण्याखालील ज्वालामुखी) आणि फिलीपिन्समधील बाबुयान क्लारो यांचा समावेश होता. मात्र, या पैकी कोणताही ज्वालामुखी उपलब्ध हवामानविषयक माहितीशी पूर्णपणे जुळत नव्हता.

आधुनिक तंत्रज्ञानाने शोधला स्त्रोत

डॉ. विल्यम हचिसन यांच्या नेतृत्वाखालील सेंट अँड्र्यूज विद्यापीठाच्या संशोधकांनी ध्रुवीय प्रदेशांमधील बर्फाच्या थरांवर प्रगत भू-रासायनिक विश्लेषण तंत्रांचा उपयोग केला त्यामुळे महत्त्वाचा शोध लागला. या बर्फाच्या नमुन्यांमधून सूक्ष्म ज्वालामुखी राखेचे कण वेगळे काढून आणि त्यांची रासायनिक संरचना ज्ञात ज्वालामुखीच्या अवशेषांशी तुलना करून संशोधकांनी संभाव्य स्त्रोताचा शोध घेतला. प्रारंभीचे संकेत जपानी ज्वालामुखीकडे निर्देश करत होते, परंतु १८३१ मध्ये त्या प्रदेशात कोणताही मोठा उद्रेक नोंदवलेला नव्हता. त्यामुळे संशोधकांचे लक्ष रशियाच्या कुरिल बेटांवरील ज्वालामुखी शृंखलेवर केंद्रित झाले.

झावरित्स्की ज्वालामुखीचा पुरावा मिळाला

रशियन संशोधकांनी झावरित्स्की ज्वालामुखीचे दशके आधी गोळा केलेले नमुने उपलब्ध करून दिले. जेव्हा या नमुन्यांचे ध्रुवीय बर्फातील राखेसोबत विश्लेषण करण्यात आले, तेव्हा दोन्हींची रासायनिक संरचना पूर्णपणे जुळल्याचे आढळले. डॉ. हचिसन यांच्या मते, हा क्षण या संशोधनातील एक निर्णायक टप्पा ठरला. त्यांनी सांगितले, “जेव्हा आम्ही ज्वालामुखी आणि बर्फाच्या थरातील राखेचे एकत्र विश्लेषण केले, तेव्हा खरा ‘युरेका’ क्षण आला. दोन्हींची संख्यात्मक मूल्ये अगदी समान होती.”

भविष्यातील ज्वालामुखी उद्रेकांचा धोका समजून घेणे

१८३१ मधील हवामानातील बदलास कारणीभूत ठरलेल्या ज्वालामुखीचा शोध लागल्यामुळे मोठ्या ज्वालामुखी उद्रेकांच्या संभाव्य हवामानविषयक परिणामांबाबत महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळते. डॉ. हचिसन यांचा ठाम विश्वास आहे की, अशा प्रकारचे उद्रेक भविष्यात पुन्हा होऊ शकतात आणि त्याचे परिणाम आधुनिक जगासाठी अनपेक्षित ठरू शकतात. ते स्पष्ट करतात, “असे अनेक ज्वालामुखी आहेत जे जागतिक थंड हवामान निर्माण करू शकतात. पुढील मोठा उद्रेक केव्हा आणि कुठे होईल, हे अंदाज बांधणे अत्यंत कठीण आहे.”

आंतरराष्ट्रीय स्तरावर तयारीची आवश्यकता

या संशोधनामुळे जागतिक स्तरावर पूर्वतयारी करण्याची गरज अधोरेखित होते. भविष्यात अशाच प्रमाणातील ज्वालामुखी उद्रेक झाल्यास तो जागतिक हवामान प्रणाली विस्कळीत करू शकतो. ज्यामुळे शेती, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. शास्त्रज्ञ भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून हवामान अंदाज अधिक अचूक करण्यासाठी आणि अशा व्यापक ज्वालामुखी उपद्रवांचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरी १८३१ मधील हवामान बदलाच्या रहस्याचा उलगडा झाला असला, तरी अशा घटनांची वारंवारता आणि तीव्रता याबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. हे संशोधन आपल्याला या गोष्टीची आठवण करून देते की पृथ्वीचे हवामान आणि तिची भूवैज्ञानिक हालचाल यांचा परस्परसंबंध आहे आणि भूतकाळातील घटनांचे आकलन करून आपण भविष्यातील आव्हानांसाठी अधिक चांगली तयारी करू शकतो.

Story img Loader