How names of two lions Sita & Akbar : पश्चिम बंगालमधील प्राणिसंग्रहालयात सिंह आणि सिंहिणीच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्यास सांगितले आहे. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. यावर विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच विहिंपने याला भावना दुखावणारे पाऊल म्हटले आहे. गुरुवारी कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या महाधिवक्त्यांना विचारले की, एखाद्या प्राण्याचे नाव देव, पौराणिक नायक, स्वातंत्र्यसैनिक किंवा नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावावर ठेवता येईल का? असा मलाच प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल हे कल्याणकारी अन् धर्मनिरपेक्ष राज्य आहे. सीता आणि अकबराला सिंहाचे नाव देऊन वाद का निर्माण करताय? हा वाद टाळायला हवा होता, असंही न्यायमूर्ती म्हणाले. केवळ सीताच नाही तर मी कोणत्याही सिंहाला अकबर असे नाव देण्याचे समर्थन करीत नाही. तो एक अत्यंत कुशल आणि महान मुघल सम्राट होता. अत्यंत यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होता. जर ते आधीच नाव दिले असेल तर राज्य प्राधिकरणाने ते बदलले पाहिजे, असंही न्यायमूर्तींनी अधोरेखित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सगळा गोंधळ कसा सुरू झाला?

याचिकाकर्त्यांनी सांगितले की, त्यांना त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणिसंग्रहालयातून सिलीगुडी येथील सफारी पार्कमध्ये आणलेल्या वन्य प्राण्यांची विचित्र नावे असल्याचे बातमीवरून समजले. बांगला वृत्तपत्र उत्तरबंगा संवादमध्ये यासंदर्भात बातमी छापून आली होती. बातमीला “संगीर खोजे अस्थिर सीता (सीता आपल्या साथीदारामुळे अस्वस्थ आहे)” असा मथळा दिला होता. त्यानंतर हा वाद उफाळून आला. देशभरातील सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत याविरोधात विश्व हिंदू परिषदेकडून याचिका दाखल करण्यात आली. उत्तरबंगा संवादने राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सचिवाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकाची माहिती प्रकाशित केली, ज्यात सिंहांच्या नावांचा उल्लेख आहे. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने हे अतार्किक आणि अपमानजनक नामकरण असल्याचे सांगत कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. खरं तर अलीकडेच त्रिपुराच्या सिपाहिजाला प्राणिसंग्रहालयातून आठ प्राणी सिलिगुडी सफारी पार्कमध्ये आणण्यात आलेत. यामध्ये ‘अकबर’ आणि ‘सीता’ नावाच्या सिंह आणि सिंहिणींचाही समावेश आहे. १६ फेब्रुवारी रोजी विहिंपने याबाबत कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सिंह आणि सिंहिणीला ‘अकबर’ आणि ‘सीता’ असे नाव देणे हा हिंदूंचा अपमान असल्याचे विहिंपने म्हटले आहे. अकबर हा मुघल शासक होता आणि सीता ही वाल्मिकीच्या रामायणातील एक पात्र आहे आणि हिंदू देवता म्हणून पूज्य आहे, असे विहिंपने म्हटले आहे. विहिंपने सिंहिणीचे नाव बदलण्याची मागणी केली होती. सिंह आणि सिंहिणीला वेगळे ठेवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती.

हेही वाचाः विश्लेषण: प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा सरकारला अधिकारच नाही! सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल का दिला?

पश्चिम बंगाल सरकार काय म्हणाले?

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान बंगाल सरकारने सांगितले होते की, या सिंह आणि सिंहिणींना त्रिपुराच्या प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आले होते आणि त्यांनीच त्यांची आधीपासून तशी नावे दिलीत. अतिरिक्त ऍडव्होकेट जनरल देबज्योती चौधरी यांनी सरकारतर्फे बाजू मांडताना राज्य सरकारने प्राण्यांची नावे दिली नसल्याचा युक्तिवाद केला होता.

हेही वाचाः टाटा एअरलाइन्सची अनोखी ऑफर; चेक इन बॅगेजशिवाय प्रवास केल्यास मिळणार जबरदस्त सवलत

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर २१ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सिंहिणीला सीतेचे नाव का दिले? कारण हे नाव स्नेहभावाने ठेवता आले असते, असं न्यायमूर्तींनी सांगितले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ही हिंदू धर्माची निंदा आहे, प्रेमळपणा नाही. जर प्राण्यांना देवतांची नावे देण्यास परवानगी दिली तर उद्या गाढवाचे नावदेखील एखाद्या देवतेचे नावावरून ठेवले जाईल. त्यानंतर सिंहांची नावे नेमकी कोणी ठेवली हे अस्पष्ट असल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला या विषयावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाव बदलण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले, ‘देशातील एक मोठा वर्ग सीतेची पूजा करतो. मीही अकबर हे नाव सिंहाला देण्यास विरोध केला असता. तो एक कार्यक्षम, यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होता. बुधवारी न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले होते की, नाव ठेवल्याने काय फरक पडतो? मात्र, एखाद्या प्राण्याला देवाचे नाव द्यावे की पौराणिक पात्राचे किंवा स्वातंत्र्यसैनिकाचे नाव द्यायचे याबाबत रात्रभर विचार केल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. गुरुवारी ते म्हणाले, सीता आणि अकबर यांच्या नावावर सिंह आणि सिंहिणीचे नाव देऊन वाद का निर्माण करताय. न्यायालयाने सरकारच्या वकिलाला विचारले, ‘तुम्ही त्याचे नाव बिजली किंवा असे काही ठेवू शकता. पण अकबर, सीता अशी नावे का दिली गेली?

सरकार नाव बदलणार

पश्चिम बंगाल सरकार आधीच अनेक वादात अडकले असून, सिंह आणि सिंहिणीच्या नावांबाबतचा वाद टाळता आला असता, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पश्चिम बंगाल सरकारने सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्यास सहमती दर्शवली आहे. विहिंपची याचिका फेटाळण्याची मागणीही सरकारने केली होती. परंतु कोलकाता उच्च न्यायालयाने ते मान्य केले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The name of the lion is akbar and the name of the lioness is sita what exactly is the argument how did the case go directly to court vrd
Show comments