आजच्या काळात नोकरीची निष्ठा अनेकांसाठी प्राधान्य राहिलेले नाही. अनेक जण आज ‘रिव्हेंज क्विटिंग’ ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. या ट्रेंडअंतर्गत आपली नोकरी सोडून लोक एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक निराश कर्मचारी एकाच वेळी नोकरी सोडण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ किंवा ‘रिव्हेंज क्विटिंग’ हा ट्रेंड वेगाने वाढताना दिसत आहे. पूर्वी लोक शांतपणे आपली नोकरी सोडायचे; परंतु आता त्याची जागा या नव्या ट्रेंडने घेतली आहे.
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अधिक लोकांना ट्रेंडचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. विशेषत: ज्यांना कामाच्या ठिकाणी समस्या आहेत; परंतु ते राजीनामा देण्यास विचार करतात. पण, हा ट्रेंड नक्की काय आहे? कोणते घटक कर्मचाऱ्यांना ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’साठी प्रवृत्त करत आहेत? आणि कंपन्या ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’च्या सभोवतालच्या चिंतांचे निराकरण कसे करू शकतात? त्याविषयी जाणून घेऊ.
‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ म्हणजे काय?
‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ हा ट्रेंड समजून घेण्याआधी, काही कर्मचारी अशा प्रकारे नोकरी सोडण्याचा पर्याय का निवडत आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ करिअरच्या वाढीसाठी कामगार आता राजीनामा देत नाहीत. काही जण असंतोषाच्या भावनेमुळे नोकऱ्या सोडत आहेत. नियोक्त्यांविरुद्ध ‘रिव्हेंज’ घेण्याचा हा एक प्रकार म्हणून या ट्रेंडकडे पाहिले जात आहे. कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण न मिळणे, कामाच्या वेळा, कमी वेतन, मानसिक थकवा (बर्नआऊट) यांसारख्या गोष्टींना त्रासून कर्मचारी हा पर्याय निवडत आहेत.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/revenge-resignation-.jpg?w=830)
बऱ्याचदा कंपनीची गैरसोय व्हावी या उद्देशाने लोक राजीनामा देतात. नियोक्त्यांना एक मजबूत संदेश जावा, हा त्यामागील उद्देश असतो. विशेष म्हणजे जनरेशन झेड (१९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली पिढी) या ट्रेंडमध्ये आघाडीवर आहे. कारण- ते नोकरीच्या सुरक्षिततेवर पारंपरिक लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मानसिक आरोग्य, काम, जीवनातील संतुलन आदींना प्राधान्य देतात.
मागील पिढ्यांच्या तुलनेत विचार केल्यास आज बरेच कर्मचारी वाईट वागणूक सहन करण्यास तयार नाहीत. काही लोकांसाठी, राजीनामा देणे हा निषेध व्यक्त करण्याचा एक प्रकार झाला आहे. सोशल मीडियानेदेखील यात एक प्रमुख भूमिका बजावली आहे. कारण- बरेच लोक त्यांचे अनुभव सामायिक करतात आणि त्यांच्या नोकऱ्यांचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे स्पष्ट करतात. त्यातून अनेक जण प्रेरणा घेऊन राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. ‘Glassdoor’s Worklife Trends 2025’च्या अहवालानुसार, ६५ टक्के कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकरीत अडकले असल्याचे मानतात. कंपन्या या चिंतेचे निराकरण करण्यात अयशस्वी झाल्यास, कर्मचाऱ्यांमधील वाढत्या निराशेमुळे या वर्षी ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ ट्रेंडमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
हा ट्रेंड वाढण्याची कारणे काय?
निराशा, बर्नआउट व अपेक्षांची अपूर्तता हे ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’च्या वाढीस कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. अनेक कर्मचारी दररोज कामाच्या भीतीने उठतात. हे करिअरची थांबलेली वाढ, कंपनीतील राजकारण किंवा फक्त अपमानास्पद वाटल्यामुळे होऊ शकते. या कारणांमुळे लोक अशा नोकऱ्यांपासून दूर जाणे निवडत आहेत. या नोकऱ्यांचा त्यांच्या आनंदावर परिणाम होतोय, असे त्यांचे सांगणे आहे. या ट्रेंडच्या वाढीस कारणीभूत ठरणारी कारणे खालीलप्रमाणे :
करिअरच्या प्रगतीचा अभाव : करिअरच्या प्रगतीबद्दल स्पष्टता नसताना किंवा जेव्हा पदोन्नती, कौशल्य विकास किंवा प्रगतीच्या संधी मर्यादित असतात तेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये आपण नोकरीत अडकले असल्याची भावना निर्माण होऊ शकते.
कमी पगार आणि पगारवाढीचा अभाव : अनेक कर्मचारी जे सातत्याने त्यांची उद्दिष्टे पूर्ण करतात, त्यांना त्यांचा पगार कमी वाटू शकतो किंवा त्यांना असे वाटते की, ते मूल्यांकनादरम्यान उच्च पगारवाढीस पात्र आहेत.
बर्नआउट, काम व जीवनात असंतुलन : जास्त कामाचा भार, वेळेपेक्षा अधिक काम आणि दीर्घकाळापर्यंत ताण यांमुळे भावनिक थकवा येऊ शकतो. परिणामी लोक तातडीने राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ शकतात. जेव्हा कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वेळ मिळणे कठीण होते, तेव्हा बर्नआउटची समस्या उद्भवते.
दुर्लक्षिततेची भावना : जेव्हा कर्मचाऱ्यांना असे वाटते की, त्यांच्या परिश्रमांकडे दुर्लक्ष होत आहे, तेव्हा त्यांच्या प्रयत्नांची किंमत आहे की नाही, असा प्रश्न त्यांना पडू शकतो.
उद्देशाकडे दुर्लक्ष होणे : तरुण कामगार, विशेषतः, त्यांच्या नोकऱ्यांमध्ये उद्देश शोधत असतात. जर ते त्यांच्या दैनंदिन कार्यांना मोठ्या उद्देशाशी जोडू शकत नसतील, तर त्यांच्यात कामाची प्रेरणा शिल्लक उरत नाही.
पाठिंब्याचा अभाव : दुर्लक्षित, अनादर अनुभवणारे कर्मचारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात. काही वेळा या समस्यांचे निराकरण करण्यात, त्यांच्या संस्थेचे अपयश प्रतिबिंबित करण्याचा हा एक मार्ग म्हणून ते राजीनामा देण्याचा निर्णय घेतात.
‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ हा ट्रेंड कसा ठरत आहे?
ऑक्टोबरमध्ये ३,३९० व्यावसायिकांचा समावेश असलेल्या ग्लासडोअर सर्वेक्षणात असे आढळून आले की, सुमारे तीनपैकी दोन कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकरी अडकले असल्याचे मानतात. विशेष म्हणजे Glassdoor डेटाने हेदेखील उघड केले की, १७ टक्के कर्मचाऱ्यांनी २०२४ मध्ये नोकऱ्या बदलताना पगारात कपात दर्शवली. २०२३ मध्ये हे प्रमाण १५ टक्के होते. हे सूचित करते की, काही कर्मचारी केवळ नोकरीसंबंधित निराशेपासून वाचण्यासाठी कमी पगार स्वीकारण्यास तयार आहेत आणि याकडे ते ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ म्हणून पाहत आहेत. तरुण पिढ्यांमध्ये ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’अधिक सामान्य असले तरी ते त्यांच्यापुरते मर्यादित नाही. वृद्ध कर्मचारीदेखील कामाच्या वातावरणात दुय्यम वागणूक किंवा अनादर वाटत असेल, तर ते निषेध म्हणून ‘रिव्हेंज रेजिग्नेशन’ हा पर्याय निवडतात. मध्यमस्तरीय व्यावसायिकदेखील हा ट्रेंड वाढवत आहेत.
‘रिव्हेंज रेजिग्नेशन’चा ट्रेंड थांबवता येणे शक्य आहे का?
स्पष्ट करिअरवाढीचे मार्ग सेट करणे : नियोक्ते पदोन्नतीच्या संधी प्रदान करू शकतात आणि प्रशिक्षण, मार्गदर्शन यांद्वारे कर्मचाऱ्यांच्या विकासास समर्थन देऊ शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आश्वासन मिळते की, कंपनीमध्ये त्यांचे भविष्य आहे.
कार्य-जीवन समतोल वाढवणे : योग्य कार्य व्यवस्था प्रदान करणे, कर्मचाऱ्यांना वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि बर्नआउट व निराशा कमी करण्यासाठी कंपनीद्वारे धोरण तयार केले जाणे महत्त्वाचे आहे.
कार्यस्थळाचे वातावरण : समस्यांचे त्वरित आणि व्यावसायिक निराकरण केले जाईल, अशी कार्यसंस्कृती तयार करणे महत्त्वाचे आहे. हे खुल्या चर्चा किंवा संघबांधणी उपक्रमांद्वारे केले जाऊ शकते.
खुल्या आणि प्रामाणिक संवादाला प्रोत्साहन देणे : कंपन्यांसाठी अशी जागा तयार करणे आवश्यक ठरते, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या चिंता किंवा निराशा सामायिक करणे सोईस्कर वाटेल.
कर्मचाऱ्यांचे योगदान ओळखणे : कर्मचाऱ्यांच्या यशासाठी त्यांचे कौतुक करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कौतुकाची संस्कृती निर्माण करण्यासाठी पीअर-टू-पीअर ओळख कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो.