भारतातील अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढत आहे. ‘हुरुन रिच लिस्ट २०२४’नुसार, भारतात आता ३३४ अब्जाधीश आहेत आणि त्यांच्याकडील एकूण संपत्ती १५९ लाख कोटी रुपये आहे. भारताने सौदी अरेबिया आणि स्वित्झर्लंडच्या एकत्रित जीडीपीला मागे टाकले आहे. ‘हुरुन रिच लिस्ट २०२४’ने हेदेखील उघड केले आहे की, भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये चीनची राजधानी बीजिंगपेक्षाही अधिक अब्जाधीश आहेत. संपूर्ण आशियात मुंबईमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. विशेष म्हणजे, इतर देश आपली संपत्ती गमावत असताना भारतातील संपत्ती वाढत आहे. चीनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट झाली आजे. देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये वाढ कशी होत आहे? देशाच्या संपत्ती निर्मितीमध्ये योगदान देणारे महत्त्वपूर्ण घटक कोणते? याविषयी जाणून घेऊ.
भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ
‘हुरुन रिच लिस्ट २०२४’नुसार, भारतात आता ३३४ अब्जाधीश आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, भारतातील अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये भारतात १०९ अब्जाधीश होते. हा आकडा २०२३ पर्यंत २५९ वर पोहोचला. ‘हुरुन रिच लिस्ट २०२४’ मध्ये असेही दिसून आले की, भारतात दर पाच दिवसांनी एका नवीन अब्जाधीशाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : एकेकाळी हार्वर्ड विद्यापीठाने नाकारलं होतं, आज आहेत १२ लाख कोटींच्या संपत्तीचे मानकरी, कोण आहेत वॉरेन बफे?
‘हुरुन इंडिया’चे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले: “भारत ‘वेल्थ क्रिएशन ऑलिम्पिक’मध्ये सातत्याने यश मिळवत आहे. २०२४ च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमधील अब्जाधीशांच्या संख्येत २० क्षेत्रांमधील नवीन चेहर्यांचा समावेश आहे. ही प्रगती न थांबणारी आहे. कारण, भारतीय उद्योजक सर्वत्र विकासाला चालना देत आहेत.” या यादीत रिअल इस्टेट आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील अब्जाधीशांची संख्या सर्वाधिक आहे. या वर्षी यादीतील ६४ टक्के नवीन प्रवेशकर्ते यांनी स्वतःच्या बळावर आपला उद्योग उभा केला आहे; यात तरुणांची संख्या जास्त आहे.
‘हुरुन रिच लिस्ट’मध्ये कोणाकोणाचा समावेश?
‘हुरुन रिच लिस्ट २०२४’ मध्ये काही नियमित तसेच काही नवीन नावांचा समावेश आहे. यादीतील नवीन प्रवेशकर्त्यांमध्ये शाहरुख खान तसेच झेप्टोचे संस्थापक कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा यांचा समावेश आहे. २१ वर्षांचे वोहरा या यादीत सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. त्यांचे सह-संस्थापक, २२ वर्षांचे आहे. वोहरा आणि पालिचा हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी होते, त्यांनी शिक्षण सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या अत्यावश्यक वस्तूंची जलद मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने दोन्ही मित्रांनी २०२१ मध्ये कोविड महामारीच्या काळात ‘झेप्टो’ कंपनीची स्थापना केली.
वयाच्या ५८ व्या वर्षी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि चित्रपट निर्माती कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील त्याच्या भागीदारीद्वारे ७,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत प्रवेश केला. बॉलीवूड अभिनेत्री आणि कोलकाता नाईट रायडर्सची सह-मालक जुही चावलादेखील ४,६०० कोटींच्या संपत्तीसह या यादीत सामील झाली आहे. पेमेंट सोल्यूशन्स ॲप ‘रेझरपे’चे संस्थापक हर्षिल माथूर आणि शशांक कुमार यांनादेखील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले आहे. या दोघांची अंदाजे एकूण संपत्ती ८,७०० कोटी रुपये आहे.
आशियामध्ये राजधानी मुंबईत सर्वाधिक अब्जाधीश
आशियात आर्थिक राजधानी मुंबईत सर्वाधिक अब्जाधीश आहेत. मुंबईने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे टाकले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश आहेत, तर भारताची आर्थिक राजधानी मुंबईत ९२ अब्जाधीश आहेत. याशिवाय, मुंबईतील २६ नवीन चेहर्यांचा या यादीत समावेश झाला आहे, ज्यांची एकूण संपत्ती ४४५ अब्ज डॉलर्स आहे. तर दुसरीकडे, चीनच्या बीजिंगमधील १८ अब्जाधीश या यादीतून बाहेर पडले आहेत. मुंबईनंतर सर्वाधिक अब्जाधीशांसह दिल्ली दुसर्या क्रमांकावर आहे. यात हैदराबादने प्रथमच बेंगळुरूला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे. चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, पुणे, सुरत आणि गुरुग्राम ही टॉप १० शहरे आहेत, जिथे सर्वाधिक अब्जाधीश आहेत.
भारताच्या संपत्ती निर्मितीमध्ये योगदान देणारे घटक कोणते?
भारतातील खाजगी संपत्तीच्या लक्षणीय वाढीसाठी उद्योजकांच्या नवीन पिढीचे योगदान असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. तसेच भारतातील वाढते उद्योजक, स्पर्धात्मक वेतन आणि इंग्रजी भाषिक लोकसंख्या हेदेखील भारताच्या आर्थिक प्रगतीचे कारण आहे. देशातील श्रीमंत लोकांच्या संख्येत वाढ होण्याचे श्रेय देशांतर्गत आर्थिक सुधारणांनाही दिले जाते. ‘द गार्डियन’ने नोंदवल्याप्रमाणे, १९८० पासून हळूहळू या बदलांची सुरुवात झाली. १९९१ मध्ये आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘लायसन्स राज’ तयार करणारे नियम नष्ट केले. जुन्या राजवटीत ज्या कंपन्यांना शुल्क भरावे लागायचे त्यांना परदेशी गुंतवणूक आणि वाढलेली स्पर्धा यातून बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा : कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही विद्यार्थ्यांना मोठा धक्का, नवे निर्बंध लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?
एकामागोमाग एक क्षेत्रात भारतातील दिग्गजांच्या श्रेणीत वाढ होऊ लागली. २०२३ च्या अखेरीस भारतातील सर्वात श्रीमंत नागरिकांकडे देशाच्या संपत्तीच्या ४०.१ टक्के संपत्ती होती आणि त्यांचा एकूण उत्पन्नातील वाटा २२.६ टक्के होता. त्या शिवाय भारतातील अनेक श्रीमंत मोठ्या प्रमाणात देश सोडून जात आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा ही जगभरातील श्रीमंत लोकांची आवडती ठिकाणं ठरत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd