संजय जाधव
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली आहे. सोन्याचे भाव काही महिने स्थिर होते. मार्चपासून त्यात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली.
वायदेबाजारात सोन्याचे भाव किती?
सोने हा प्रामुख्याने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. त्यामुळे अस्थिर आर्थिक स्थितीत सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो. आखातातील भूराजकीय तणाव आणि व्याजदर कपातीची शक्यता या दोन प्रमुख बाबी सोन्याच्या भावातील तेजीसाठी कारणीभूत मानल्या जात आहेत. ‘एमसीक्स’ या वस्तू वायदा बाजार मंचावर सोन्याने प्रति १० ग्रॅम ७१ हजारांची पातळी ओलांडली असूनही चांदीनेही किलोला ८२ हजार रुपयांची पातळी गाठली आहे.
जगाच्या स्थितीचा परिणाम सोन्यावर?
सोन्याच्या भावातील वाढीचा संबंध हा आगामी काळात ‘फेडरल रिझव्र्ह’ (फेड) या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून कमी होणाऱ्या व्याजदरांशी जोडला जात आहे. मागील काही वर्षांपासून जास्त असलेले व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकी डॉलर भक्कम असूनही सोन्याचा भाव वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात फेडरल रिझव्र्हकडून व्याजदर कपातीचे मिळालेले संकेत हे सर्वात महत्त्वाचे कारण. आखाती देशांतील वाढता भूराजकीय तणाव, चीनमध्ये अचानक वाढलेली सोन्याची खरेदी, अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढलेली अनिश्चितता आणि घसरणारा भारतीय रुपया या गोष्टींनीही सोन्याच्या भावाला हातभार लावला आहे.
सोन्याची खरेदी कोण करत आहे?
सोन्याची खरेदी करणाऱ्यांमध्ये मध्यवर्ती बँकांचा समावेश प्रामुख्याने आहे. मोठय़ा गुंतवणूकदार संस्था आणि व्यापाऱ्यांचाही सोन्याच्या खरेदीकडे कल आहे. चीनमध्ये इतर गुंतवणूक पर्यायातील परतावा कमी होण्याची शक्यता आणि चलन अवमूल्यनाची भीती यामुळे नागरिक मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी करीत आहेत. याच वेळी भावातील तेजीमुळे खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि पर्यायाने आणखी भाव वाढत आहेत.
हेही वाचा >>>२५ ते ३० हजार जवान… तीन वाजेपर्यंतच मतदान… नक्षलग्रस्त नि दुर्गम गडचिरोलीत सुरळीत मतदानासाठी कोणते उपाय?
नेमकी कशाची खरेदी?
सोन्याची खरेदी करण्याचा सोपा पर्याय एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) असतो. मात्र, गुंतवणूकदारांनी ईटीएफकडे पाठ फिरवली आहे. याच वेळी ईटीएफमधून गुंतवणूक काढून घेतली जात आहे. त्यामुळे विश्लेषकांना हे चित्र गोंधळात पाडणारे वाटत आहे. सोन्याची मागणी वाढली असून, मध्यवर्ती बँकांसह नागरिकांकडून प्रत्यक्ष सोन्याची खरेदी सुरू आहे. असे असतानाही ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढण्याऐवजी ती काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली नफेखोरी कारणीभूत असल्याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.
खरेदीचे चित्र कसे?
वायदे बाजार आणि बाजारपेठांमध्ये सोन्याचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. मध्यवर्ती बँका, गुंतवणूक बँका, पेन्शन फंड यांच्याकडून ही खरेदी सुरू आहे. वायदे बाजारात उलाढाल वाढली असून, आगामी काळात सोन्याच्या भावात आणखी तेजी दिसून येण्याची चिन्हे आहेत. सोन्याच्या खरेदीचा जोर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी प्रामुख्याने दिसून येतो. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीचा थेट संबंध जागतिक पातळीवरील सोन्याच्या बाजारपेठेशी आहे. त्यामुळे आर्थिक आकडेवारीतील बदलांना बाजारपेठ अधिक संवेदनशील आहे. त्याचाही परिणाम बाजारावर होत आहे. गुंतवणूकदार डॉलरलाही पाठबळ देत असल्याने तो वधारत आहे. डॉलर वधारल्याने भारत आणि चीनसारख्या देशांतील ग्राहकांसाठी सोने महाग होत आहे.
आताच खरेदी का?
सोन्याच्या खरेदीत आताच अचानक वाढ का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण फेडरल रिझव्र्हकडून तातडीने व्याजदरात कपात शक्य नाही. त्यामुळे आतापासूनच सोने खरेदी वाढण्याचे नेमके कारण स्पष्ट होत नाही. अमेरिकी अर्थव्यवस्थेत घसरण होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून खरेदी करीत असल्याचेही एक कारण यामागे आहे. मात्र, मध्यवर्ती बँकांसह चलनवाढ आणि भूराजकीय तणाव यामुळेही खरेदी वाढत आहे.
भारतावर काय परिणाम?
सोन्याच्या भावातील तेजी भारतातील सणासुदीच्या काळातील खरेदीच्या हंगामाला मारक आहे. सोन्याच्या खरेदीचे प्रमाण कमी होणार असले तरी भाव वाढल्याने उलाढाल तेवढीच राहील, असा अंदाज पीएनजी सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कमॉडिटी तज्ज्ञ अमित मोडक यांनी वर्तविला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाल्यास देशांतर्गत बाजारपेठेत आणि सोन्याच्या आयात शुल्कावर त्याचे परिणाम होतात. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याने सोन्याचे आयात शुल्क वाढून देशांतर्गत बाजारपेठेत त्याचे भाव वाढतात. जागतिक पातळीवरील सोन्याच्या भावातील तेजी दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या भावात लवकरच घट होण्याची चिन्हे नाहीत, असेही मोडक यांनी स्पष्ट केले.
sanjay.jadhav@expressindia.com