अरे, नर नारीच्या मिलनातून जन्म लाभतो बाळाला,
पण स्त्री-पुरुषाविन जन्म मुलाचा कसा- कुठे ते सांग मला,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग, जाता जाता जबाब देतो, सवाल असला पुसू नको,
अपुली अक्कल गहाण ठेवून उसण्यावरती बसू नको,
अग, द्रोणामधुनी द्रोणाचार्य, अन अंगठ्यामधूनी प्रजापती,
गोरख आला राखेमधूनी, अंगच्या मळातून गणपती…

ही दोन कडवी बालकराम, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील आणि वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली तसेच जगदीश खेबुडकर यांच्या लेखणीतून अवतरलेली ‘सवाल माझा ऐका!’ या चित्रपटातील लावणीतील आहे. ही लावणी आजही लोकप्रिय आहे. लावणीच्या परंपरेतील जुगलबंदी हा प्रकार तसा ऐतिहासिक आहे. असो, परंतु सध्या या लेखाचा विषय लावणी नाही. प्रश्न पडला असेल जर लावणी नाही तर इथे लावणीचा संदर्भ देण्याचा संबंध तो काय? …तर याचे उत्तर सरळ आहे. या लावणीत नर्तकीने शाहिराला विचारलेला प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर. प्रश्न वैज्ञानिक असला तरी त्याचे उत्तर हे पौराणिक आहे. सजीव सृष्टीत स्त्री पुरुषाच्या मिलनातून जीव जन्माला येतो, मग असा चमत्कार कुठे झाला, ज्यात स्त्री-पुरुषाच्या मिलनाशिवाय जन्म झाला. काही दशकांपूर्वी हे प्रत्यक्षात शक्यच नव्हते. त्यामुळे शाहिरही या प्रश्नाचे उत्तर देताना पौराणिक देवी-देवतांचे संदर्भ देतो. त्यामुळे असं काही अजब पौराणिक कथांमध्येच घडतं होतं. परंतु हाच पौराणिक चमत्कार शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात आणला, तो डॉलीच्या रूपाने. डॉली ही जगातील पहिली मादी आहे, जिला आई आहे पण पिता नाही. या डॉलीचा जन्म ५ जुलै रोजी झाला होता. कोण होती ही डॉली आणि का ठरली ती महत्त्वाची याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.

अधिक वाचा: ‘१२ बजे के बाद सिख’; थट्टेचा विषय की अभिमानाची कहाणी?

कोण होती डॉली?

डॉली हे नाव कुठे ना कुठे आपण ऐकलेलंच असतं. परंतु आपण इथे ज्या डॉली विषयी चर्चा करत आहोत. ही जगातील पहिली क्लोन आहे, जी एखाद्या जुळ्या व्यक्तींप्रमाणे दिसते. फक्त फरक इतकाच आहे की, या क्लोनची निर्मिती लॅब मध्ये झाली आहे. त्यामुळेच डॉली ही विज्ञानाचा चमत्कार मानली जाते. ती तिच्या आईची क्लोन होती. ती हुबेहूब तिच्या आई सारखी दिसत होती.

एक देवकी, एक यशोदा..

एखाद्या सजीवाचा क्लोन कसा करता येईल यासाठी अनेक वर्षे शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते. परंतु त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी मेंढीवर हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. डॉलीची निर्मिती करणे हे सोपे काम नव्हते. डॉलीचा जन्म हा ‘न्यूक्लियर ट्रान्सफर’ या प्रक्रियेद्वारे झाला आहे. या प्रक्रियेत काळ्या आणि सफेद अशा दोन मेंढ्यांच्या ‘पेशीं’चा वापर करण्यात आला. फिन डॉरसेट सफेद मेंढीच्या पेशीमधून केंद्रक काढून स्कॉटिश काळ्या मेंढीच्या शरीरात टाकण्यात आले. म्हणजेच काळ्या मेंढीच्या गर्भाशयातील अंड्यात सफेद मेंढीचे केंद्रक टाकण्यात आले. काळी मेंढी जन्माला येणाऱ्या बाळाची सरोगेट आई आहे, तर फिन डॉरसेट सफेद मेंढी ही ‘बायोलॉजिकल मदर’ आहे. हा प्रयोग २२८ वेळा करण्यात आला, त्यातील २२७ वेळा शास्त्रज्ञांच्या पदरी निराशाच पडली. परंतु ५ जुलै १९९६ रोजी चमत्कार झाला, आणि डॉली जन्माला आली. डॉली आपल्या आईची हुबेहूब कार्बन कॉपी होती. तिचा जन्म रोज़लिन इन्स्टिट्यूट मध्ये झाला होता. तिला वडील नसले तरी शास्त्रज्ञ केथ कैंपबैल आणि इआन विलमट हे तिचे जन्मदाते ठरले.

पित्याचा सहभाग नाही..

डॉ बाळ फोंडके यांनी डॉलीचा नेमका जन्म कसा झाला याचे वर्णन ‘कोण?’ या त्यांच्या पुस्तकात सोप्या भाषेत केले आहे. ‘डॉलीचा जन्म तसा नैसर्गिकरित्या झालेला नव्हता. त्यासाठी डॉलीच्या आईच्या बीजपेशीतून तिच्या केंद्रकांची हकालपट्टी करण्यात आली होती. म्हणजेच त्या पेशीतील गुणसूत्र, अर्थातच जनुकांची साथ काढून टाकण्यात आली होती. त्या रिकाम्या झालेल्या पेशींमध्ये नंतर त्याच आईच्या आचळांच्या पेशींमधलं केंद्रक प्रत्यारोपित करण्यात आलं. म्हणजेच आता त्या नव्यानं तयार केलेल्या पिंडपेशीतल्या सर्वच जोड्या केवळ आईकडून मिळालेल्या होत्या. जनुकांचा अशी संपूर्ण साथ मिळाल्यामुळे ती पेशी फलित पेशीसारखीच वागू लागली. तिची वाढ झाली आणि नंतर आईच्या गर्भाशयात तिचा विकासही झाला. योग्य वेळी आई प्रसूत होऊन डॉलीचा जन्म झाला. डॉलीच्या अंगच्या आनुवंशिक गुणधर्माचा वारसा तिला केवळ आईकडूनच मिळालेला होता. एका अर्थी ती आपल्या आईची जणू झेरॉक्स प्रतच होती. या संपूर्ण प्रक्रियेत प्रक्रियेत कोणत्याही नराचा म्हणजे पित्याचा सहभाग नव्हता.’

डॉली का महत्त्वाची? काय विशेष होते डॉलीमध्ये?

डॉलीचा जन्म हा काळ्या मेंढीपासून झालेला असला तरी, तिचे रंग रूप फिन डॉरसेट मेंढीसारखेच होते. DNA केंद्रकामध्येच असते. शास्त्रज्ञांनी बराच काळ डॉलीचा जन्म जगापासून लपवून ठेवला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षी डॉलीने तिच्या पहिल्या कोकराला जन्म दिला, त्याचे नाव बोनी ठेवले गेले. डॉलीला एकूण सहा कोकरे झाली. पहिल्या कोकरानंतर तिने जुळ्या आणि तिळ्या कोकरांना जन्म दिला. २००१ पर्यंत डॉली आजारी पडू लागली. ती चार वर्षांची असताना तिला संधिवात (सांध्यांचा आजार) झाला. ती लंगडू लागली. लवकरच तिला इतर रोगांनीही ग्रासले. पुढे डॉलीपासून चार क्लोन तयार करण्यात आले. जे २०१६ पर्यंत पूर्णपणे निरोगी होते.

अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

अखेरचा श्वास

१४ फेब्रुवारी २००३ रोजी डॉलीचे (युथनेशियाने) आयुष्य संपवण्यात आले. तिला औषधांचा ओव्हरडोज देण्यात आला. कारण तिच्या फुप्फुसांनी काम करणे बंद केले होते. वयाच्या सहाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टममध्ये तिला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. मेंढ्यांना हा आजार अनेकदा होतो. अशा मेंढरांची विशेष काळजी घेतली जाते. त्यांना मोकळ्या जागेत ठेवले जाते. डॉलीवर संशोधन सुरू असल्याने तिला फक्त चार भिंतींच्या आत ठेवण्यात आले होते. डॉलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संग्रहालयाला दान करण्यात आला.

डॉलीमुळे नव्या प्रयोगांची नांदी..

डॉलीनंतर इतर प्राण्यांचे क्लोनिंग करण्याचा मार्ग मोकळा झाला. नंतर डुक्कर, घोडे, हरीण आणि बैल यांचे क्लोनही तयार करण्यात आले. हा प्रयोग माणसांवरही करण्याचा विचार होता. पण मानवाची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यामुळेच ते यशस्वी होऊ शकले नाही. धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठीही शास्त्रज्ञांनी या तंत्राचा वापर केला. जंगली शेळीच्या नामशेष होणाऱ्या प्रजाती वाचवण्यासाठी एकदा तिचे क्लोनिंग करण्यात आले. पण त्या क्लोनचाही फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू झाला. क्लोनिंगमध्ये आजही नवनवे प्रयोग सुरू आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of dolly who was dolly who was born without a father the worlds first cloned sheep svs
Show comments