सध्या जागतिक स्तरावर इस्रायल-हमास युद्ध हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेमध्ये संघर्ष होत असून विविध धर्मीयांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे. धार्मिक आणि सामाजिक मुद्दे या हल्ल्यांच्या पाठीमागे असल्याचे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर युद्धाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या इस्रायलची निर्मिती कशी झाली आणि ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतर का केले होते, हे जाऊन घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्रायलच्या निर्मितीची अधिकृत घोषणा १९४८ मध्ये झाली. परंतु, इस्रायलची निर्मिती होण्याआधीच ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमधून इस्रायलमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. स्थलांतरित होणारे ज्यू अल्पसंख्याक होते, तरीही त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. ज्यू लोकांच्या स्थलांतराची कारणे काय होती आणि या स्थलांतरास ब्रिटिश आणि अरब लोक कारणीभूत होते का, हे समजून घेणे उचित ठरेल.

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये होणाऱ्या संघर्षात जागेच्या मालकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मते, इस्रायची स्थापना त्यांच्या मातृभूमीवर बळजबरीने करण्यात आली. तर इस्रायचं मत आहे की, ही त्यांची जमीन असून बायबलमध्ये त्याचे संदर्भ आढळतात.

हेही वाचा : काजूवर लागणार आता जीआय टॅग; जाणून घ्या काजू कसा ठरला गोव्यासाठी वरदान !

झिओनिझम चळवळीचा उदय

हिब्रू लोकांच्या बायबलनुसार, ‘इस्राएल’ हे नाव देवाने अब्राहमचा नातू जेकब याला दिलेले आहे. जेकब हा यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन ‘अब्राहमिक’ धर्मांचा मुख्य अधिपती होता. या अब्राहमचे वंशज कनानमध्ये स्थायिक झाले. हा कनान म्हणजे आजचा इस्रायलचा प्रदेश आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ही जमीन अनेक साम्राज्यांच्या अधिपत्याखाली होती. ग्रीक, रोमन, पर्शियन, क्रुसेडर, इस्लामवादी लोकांनी या भूमीवर राज्य केलं. ज्यू लोक ही विविध राज्यांमध्ये, देशांमध्ये राहत होते. अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांच्यामध्ये एकजूट नव्हती. युरोपमध्ये ज्यू लोकांचा मोठ्याप्रमाणावर छळ करण्यात आला. रशियामध्येही १८८० च्या दशकात ज्यू लोकांना लक्ष्य करण्यात आले. १८९४ मध्ये झालेल्या ड्रेफस प्रकरणामुळे ज्यू लोकांचा आत्यंतिक छळ करण्यात आला. या प्रकरणात एका ज्यू सैनिकाने जर्मनीला गोपनीय माहिती पुरवल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. याचे परिणाम संपूर्ण ज्यू समुदायाला भोगावे लागले. या सर्व घटनांमुळे ज्यू लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, जी आपले स्वतंत्र राष्ट्र असावे या कल्पनेत परावर्तित झाली. ज्यू लोकांनी स्वतःची मातृभूमी मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली तिला झिओनिझम म्हणून ओळखले जाते.
या चळवळीचा जनक थिओडोर हर्झलला मानले जाते. याने १८९६ मध्ये ज्यू लोकांच्या नवीन राष्ट्राचे वर्णन करणारे, त्यांच्या हक्कांची जाणीव करणारे ‘डेर जुडेनस्टाट’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक मोठ्या प्रमाणात लोकप्रियही झाले. सुरुवातीच्या काळात युगांडा आणि अर्जेंटिना हे देश ज्यू लोकांच्या राष्ट्रासाठी निवडण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांची अनेक पवित्रस्थळे असल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतर केले.

पॅलेस्टाईनमधील वास्तव्याच्या कथा…

१८८१ ते १९०३ या काळात ज्यू लोक मोठ्या प्रमाणात पॅलेस्टाईनमध्ये आले. तिथे त्यांनी जमिनी विकत घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात ही स्थलांतराची प्रक्रिया सोपी नव्हती. कारण, पॅलेस्टाईनमधील मूळ रहिवाशांना हे स्थलांतर मान्य नव्हते. त्यामुळे स्थलांतरित आणि मूळ रहिवासी यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
पॅलेस्टाईन हा ओटोमान राजाच्या वर्चस्वाखाली असणारा संपन्न प्रदेश होता. अरब, मुस्लीम असे विविध समूह तिथे राहत होते. तेथील मूळ रहिवासी हे गरीब, फारसे साक्षर नसणारे होते. पारंपरिकरित्या शेती करून उदरनिर्वाह करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. परंतु, ज्यू हे उद्यमी होते. त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली. तेथील गरीब-होतकरू अरब लोकांना आपल्या शेतात कामासाठी ठेवले. अधिक पैसे देऊन जमिनी विकत घेतल्या आणि अरब लोकांनाच तेथे भाड्याने ठेवले. थोडक्यात पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होऊन ज्यू लोकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यामुळे स्थानिकांचा रोष अधिकच वाढला. ओटोमान राजाने ज्यू लोकांना जमिनी विकायच्या नाहीत, असे फर्मान काढले. परंतु, त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. १९०८ मध्ये यंग तुर्क क्रांतीमुळे ओटोमान राजाचा पराभव झाला, याचा फायदा स्थलांतरित ज्यू लोकांना झाला. ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन करण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळवण्यास सुरुवात केली.

बाल्फोरची घोषणा

पश्‍चिम आशियाचा चेहरा कायमचा बदलून टाकण्याची ताकद १९१७ च्या बाल्फोर घोषणेमध्ये होती. ब्रिटिश अधिकाऱ्याने एका ज्यू अधिकाऱ्याला पत्र लिहून पहिल्या महायुद्धात ज्यू लोकांचा पाठिंबा मागितला होता. या पाठिंब्याच्या बदल्यात ब्रिटिश सरकार ज्यू लोकांना सुरक्षा देणार होते. ज्यूंना त्यांचे स्वतःचे राष्ट्र स्थापन करायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक मार्गांचा अवलंब केला. त्यातील महत्त्वाची पायरी म्हणजे तेल अवीवची स्थापना होय. इस्रायलमधील अनेक कंपन्यांना रॉथस्चाइल्ड सारख्या श्रीमंत ज्यू लोकांकडून निधी पुरवण्यात येऊ लागला.
परराष्ट्र सचिव आर्थर जेम्स बालफोर यांनी या पत्राद्वारे ज्यूंच्या झिओनिस्ट चळवळीचे समर्थनही केले.
ब्रिटिश जरी ज्यू लोकांना सुरक्षा पुरवणार असले तरी पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रवाद मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला होता. ज्यू लोकांच्या विरोधात अनेक स्थानिक गट, संघटना उभ्या राहिल्या होत्या. या संघर्षामुळे ज्यू आणि मूळ रहिवासी यांच्यामधील संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली.

दुसऱ्या महायुद्धाचा ज्यू लोकांवर झालेला परिणाम

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी ओटोमान राजाचा पराभव करून पॅलेस्टाईन चा प्रदेश हस्तगत केला. पॅलेस्टाईनचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. स्थानिक रहिवासी, राज्यकर्ते आणि स्थलांतरित यांच्यामध्ये झालेला हा वाद होता. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.तीन दशके ब्रिटिशांनी समित्या स्थापन केल्या, आयोग स्थापन केले, परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे हा प्रश्न युनायटेड नेशन्सकडे गेला.
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना ज्यूंनी सहकार्य केले खरे, परंतु, अरब लोकांवर अन्याय होण्यास ब्रिटिशांच्या ऐवजी ज्यूच कारणीभूत आहेत, असा समज अरब लोकांनी करून घेतला होता. परिणामी ज्यू वस्त्यांवर, नागरिकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला पॅलेस्टाईन ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आल्यामुळे मूळ प्रश्न असणाऱ्या झिओनिस्ट समस्येचे निराकरण होणार नव्हते. आपले स्वतंत्र राज्य असण्यासाठी ब्रिटिशांपासून वेगळे होण्याची गरज निर्माण झाली.

ज्यू आणि अरब यांच्यामध्ये चर्चेचे निष्फळ प्रयत्नही झाले. १९१९ मध्ये करारही करण्यात आला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. ब्रिटिश, ज्यू आणि अरब यांच्यामध्येच अंर्तगत हल्ले होत होते. १९३६ ते १९३८ या काळात पॅलेस्टिनी लोकांनी ज्यू आणि ब्रिटिशांवर हल्ले केले. याचा विपरीत परिणाम होऊन ब्रिटिशांनी ज्यू आणि अरब दोघांनाही शिक्षा केल्या. पॅलेस्टिनी लोक या कालावधीला ‘अल-थवरा अल-कुबरा’ किंवा महान बंड म्हणतात. याच सुमारास ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या पील कमिशनने या समस्येवर एकमेव उपाय म्हणून विभाजनाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, त्यात ज्यूंच्या बाजूने झुकते माप दिल्यामुळे पॅलेस्टिनी स्थानिकांनी बहिष्कार टाकला.मे १९३९ मध्ये मूळ पॅलेस्टिनी लोकांना अनुकूल श्वेतपत्रिका काढली. परंतु, तिचेही उपयोजन झाले नाही. अविश्वास, मोठ्या प्रमाणात वाढलेले हिंसाचार यामुळे ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि यूएनद्वारे या समस्येचे निराकरण केले जाईल, असे सांगितले. ज्यूंनी त्याच्या गुप्तचर संघटना प्रशिक्षित केल्या.

इस्रायलची निर्मिती

असंघटित ज्यूंचा संघटित होण्यापर्यंत प्रवास झाला होता. त्यांचा लढण्याचा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा निश्चय पक्का होता. जेव्हा जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा तेव्हा त्यांनीच वर्चस्व प्रस्थापित केले.ब्रिटीश पत्रकार इयान ब्लॅक यांनी आपल्या ‘Enemies and Neighbours’ या पुस्तकात झिओनिस्ट लष्करी गटाचे हागानाहचे वाक्य उद्धृत केले आहे, जिथे ज्यू लोकांचे रक्त सांडले आहेत, त्या प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण केल्याशिवाय ज्यू शांत बसणार नाहीत.

२९ नोव्हेंबर, १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने पॅलेस्टाईनमधील स्थलांतरित ज्यू आणि अरब राष्ट्रांमध्ये विभाजन करण्यासाठी मतदान केले. ब्लॅक या पत्रकाराने सांगितल्यानुसार, या प्रस्तावित राष्ट्रामध्ये नेगेव वाळवंटासह देशातील ५५ टक्के भागाचा समावेश करण्यात आला होता. येथे ५ लाख ज्यू (५00,000) तर चार लाख(४००,०००) अरब लोक असतील. म्हणजेच अरबांकडे ४४ टक्के जमीन शिल्लक होती, ज्यामध्ये वेस्ट बँक आणि गाझा यांचा समावेश होता. संतप्त पॅलेस्टिनी लोकांनी हा ठराव फेटाळला.
दुसरीकडे, इस्रायलला १४ मे, १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य मिळवतानाच्या काळात इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. इस्रायलमध्ये असणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांना लष्कराने हुसकावून लावले. इस्रायलच्या निर्मितीला पॅलेस्टिनी लोक नकबा म्हणतात. त्यांच्या मतानुसार, आम्ही आमची मातृभूमी या युद्धात गमावली आहे. त्यामुळे इस्रायलचा स्वातंत्र्य दिवस पॅलेस्टिनी मातृभूमी गमावल्याचा दिवस म्हणून साजरा करतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही इजिप्त, जॉर्डन, इराक, सीरिया आणि लेबनॉनने इस्रायलवर आक्रमण केले होते. परंतु, अमेरिकेने पुरवलेल्या लष्करी सामर्थ्यामुळे इस्रायलने यशस्वी लढा दिला. परंतु, पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये सतत युद्धे होतच राहिली.
संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी १३९ पॅलेस्टाईनला मान्यता देतात, तर १६५ इस्रायलला मान्यता देतात, तसेच आज गाझा आणि वेस्ट बँक हा भाग इस्त्रायली सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of the birth of israel why did the jews come to the land of palestine vvk
Show comments