कालिदासाच्या शकुंतरा या अजरामर कलाकृतीवर अलीकडेच एक चित्रपट येऊन गेला. मात्र चित्रबाजाराने त्याची फारशी दखल घेतली नाही, अर्थात त्याने कालिदासाचे महत्त्व काही कमी होत नाही. पण या निमित्ताने या कलाकृतीचा जगभरातील कलाकारांवर झालेला परिणाम समजून घेणे रोचक व संयुक्तिक ठरावे. कालिदासाची शकुंतला ही भारतीय असली तरी या कविकुलगुरूच्या अप्रतिम कलाकृतीने अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. जगाच्या कुठल्याना ना कुठल्या कोपऱ्यात कालिदासाची शकुंतला वेगवेगळ्या रूपात आजही जिवंत आहे असे म्हटले तर वावगे वाटायला नको. हीच कालिदासाची शकुंतला १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात एका कलाकृतीच्या रूपात पुन्हा एकदा या पृथ्वीतलावर सकुंतला (क्लॉडेल) या नावाने अवतरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण होती ही शकुंतला क्लॉडेल?

शकुंतला क्लॉडेल हे एक शिल्प आहे. जगाच्या इतिहासात फ्रान्स अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे, त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे फ्रेन्च कलाकृती. ऑगस्ट रोदाँ हे आधुनिक शिल्पकलेचे जनक मानले जातात. तेही मूळ फ्रेन्चच. मातीपासून तयार केलेल्या शिल्पांमध्ये प्राण फुंकण्यात तरबेज कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. प्रेम, परमानंद, वेदना किंवा दुःख या मानवी भावभावनांचा अचूक वेध त्यांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून घेतला. म्हणूनच त्यांची शिल्पे ही सामान्य माणसाच्या ठायी आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली होती. पारंपरिक शैक्षणिक व शास्त्रीय आदर्शवादाचे नियम मोडून ऑगस्ट रोदाँ यांनी अत्यंत अभिव्यक्त शिल्पकलेचा एक नवीन प्रकार विकसित केला. ज्या शिल्पप्रकाराने येणाऱ्या अनेक कलाकारांच्या अनेक पिढ्यांवर आपला प्रभाव कायम राखला. याच शिल्पकाराच्या प्रभावातून जी अद्वितीय कलाकृती जन्माला आली ती म्हणजे ‘सकुंतला’ (शकुंतला). जरी प्रभाव हा या प्रसिद्ध शिल्पकाराचा असला तरी हे शिल्प घडविण्याचे श्रेय एका स्त्री कलाकाराचे आहे, जिने कालिदासाच्या शकुंतलेतून प्रेरणा घेवून सकुंतला ( क्लॉडेल) हे जगप्रसिद्ध युगुल शिल्प तयार गेले. या स्त्री कलाकाराचे नाव ‘कॅमिल क्लॉडेल’ असे होते. कॅमिल क्लॉडेल यांनी घडवलेल्या या शिल्पाने त्यांना जगात स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवून दिली. कॅमिल क्लॉडेल या आधुनिक शिल्पकलेच्या जनक मानल्या गेलेल्या ऑगस्ट रोदाँ यांच्या शिष्या होत्या.

कॅमिली क्लॉडेल या त्यांच्या कांस्य आणि संगमरवरी कलाकृतींसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या हयातीत त्यांच्या कामाला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांच्या (१९४३) नंतर त्यांच्या कामाची मौलिकता आणि गुणवत्ता जगाने मान्य केली. त्यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे आणि चित्रपट तयार करण्यात आले. शकुंतलेसह ‘क्लॉडेल द वॉल्ट्झ’ आणि ‘द मॅच्युअर एज’या शिल्पांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. Nogent-sur-Seine येथे २०१७ मध्ये राष्ट्रीय कॅमिली क्लॉडेल संग्रहालय सुरू करण्यात आले होते. पॅरिस, लंडन, अमेरिकेसारख्या अनेक देशोदेशींच्या संग्रहालयांमध्ये कॅमिली क्लॉडेल यांची शिल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत.

आणखी वाचा: विश्लेषण: टायटॅनिकची शोकांतिका : १५ एप्रिल १९१२ रोजी नेमके काय घडले?

शकुंतला क्लॉडेल हे नक्की शिल्प कोणाचे आहे?

हे शिल्प सकुंतला, संकोनतला, व Çacountala म्हणूनही ओळखले जाते. फ्रेंच कलाकार कॅमिली क्लॉडेल यांनी, १८८६ साला पासून वेगवेगळ्या माध्यमांच्या वापरातून हे शिल्प तयार करण्यास सुरुवात केली. त्यांचे प्रसिद्ध संगमरवरी दगडात कोरलेले शिल्प हे १९०५ साली पूर्ण झाले होते. कालांतराने याच शिल्पाच्या कांस्य प्रतिमा करण्यात आल्या होत्या. सकुंतला या शिल्पात एका तरुण जोडप्याचे चित्रण आहे, ज्यामध्ये गुडघे टेकून एक पुरुष त्याच्याकडे झुकलेल्या स्त्रीला कवेत घेत आहे. या शिल्पकृतीचे शीर्षक चौथ्या-पाचव्या शतकात होवून गेलेल्या भारतीय कवी कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाच्या नावावरून ठेवण्यात आले होते. केवळ नाटकच नाही तर ही कला शकुंतलेच्या म्हणजेच स्त्री भूमिकेशी संवाद साधणारी आहे. शकुंतलेची भेट दीर्घकाळानंतर आपल्या पतीशी म्हणजे दुष्यंताशी झाल्यावर निर्माण झालेल्या उत्कट भावभावनांचा आविष्कार या शिल्पकृतीतून दर्शविण्यात आला आहे.

जीवतोड मेहनत

शकुंतला या संगमरवरी शिल्पावर काम करत असताना कॅमिल क्लॉडेल यांनी आपल्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात त्या या शिल्पावर रोज बारा तास काम करतात असे म्हटले आहे. यावरूनच त्यांनी या शिल्पावर घेतलेल्या जीवतोड मेहनतीची कल्पना येते. हे शिल्प क्लॉड यांच्या पहिल्या प्रमुख स्वतंत्र कामांपैकी एक आहे. त्यांनी १८८८ साली शिल्पकलेची पूर्ण प्लास्टरमध्ये साकारलेली आवृत्ती पूर्ण केली, त्या आवृत्तीने त्यांना शिल्पकार म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून दिली. परंतु असे असले तरी त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला त्यांना मिळाला नाही. १८९५ साली ऑगस्ट रोदाँ यांनी सरकारकडून शकुंतला या संगमरवरी शिल्पासाठी मोबदला/ मदत मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यात अपयश आले. नंतरच्या काळात या शिल्पाच्या अनेक प्रतिकृति तयार करण्यात आल्या.

आणखी वाचा: विश्लेषण: NCRT textbook revision: इतिहास का शिकायचा? पुनर्लेखनाचे परिणाम काय?

या शिल्पासाठी कालिदासाची शकुंतलाच का?

कॅमिली क्लॉडेल या ऑगस्ट रोदाँ यांच्या शिष्या तर होत्याच परंतु त्यांच्यात प्रियकर व प्रेयसी असे ही नाते होते. ऑगस्टे रोदाँ यांनी लग्नाला नकार दिल्यानंतर कॅमिली क्लॉडेल यांनी त्यांच्या सोबत करत असलेले काम सोडले व स्वतःचा स्वतंत्र असा आर्ट स्टुडिओ स्थापन केला. कॅमिली क्लॉडेल यांनी १८८३ सालामध्ये रोदाँच्या कार्यशाळेत काम करण्यास सुरुवात केली होती आणि त्या रोदाँ यांच्यासाठी प्रेरणास्थान ठरल्या होत्या. त्यांनी रोदाँ यांच्यासाठी मॉडेल आणि त्यांच्या विश्वासू सहकारी म्हणून काम केले. परंतु रोदाँ यांच्या या नात्याविषयी असलेल्या निष्काळजीपणामुळे कॅमिली क्लॉडेल यांनी स्वतंत्र भूमिका निवडली. त्यांच्या ठायी या प्रेम संबंधातून आलेला विरह, गर्भपात हा त्यांना कालिदासाच्या शकुंतलेशी स्वतःचे साम्य दर्शविणारा ठरला. शकुंतलेच्या कथेत विरहा नंतरच्या भेटीचा योग होता. तो कॅमिली क्लॉडेल यांच्या नशिबात नव्हता. तोच क्षण त्यांनी अचूक शकुंतलेच्या माध्यमातून आपल्या कलाकृतीत उतरवला असल्याचे कलाअभ्यासक मानतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The true story of a french shakuntala camille rosalie claudel svs