World’s first 3-D printed hotel: जागतिक पर्यटन आणि हॉस्पिटीलिटीच्या क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. त्यातीलच एक होऊ घातलेला प्रकल्प म्हणजे ‘थ्रीडी प्रिंटेड हॉटेल’. या हॉटेलच्या निर्मितीमुळे ‘हॉस्पिटीलिटी’ उद्योगाचा चेहरा लवकरच बदलणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा घेतलेला हा आढावा.

जगातील पहिलं थ्री-डी हॉटेल कुठे बांधलं जात आहे?

जगातील पहिलं थ्री-डी प्रिंटेड हॉटेल मार्फा, टेक्सासमध्ये बांधण्यात येत आहे. हे अभिनव हॉटेल एल कॉस्मिको प्रकल्पाचा भाग आहे आणि ICON या थ्री-डी प्रिंटेड संरचना तयार करण्यात विशेष प्राविण्य असलेल्या कंपनीद्वारे बांधले जात आहे. या हॉटेलमध्ये वळणदार-गोलाकार भिंती आणि घुमट यांसारखी अनोखी वास्तुशिल्पीय वैशिष्ट्ये पाहायला मिळणार आहेत. अशा प्रकारची रचना केवळ थ्री-डी प्रिंटिंग पद्धतीतून मिळणाऱ्या लवचिकतेमुळे शक्य झाली आहे असे तज्ज्ञ सांगतात. हा प्रकल्प हॉस्पिटीलिटी उद्योगातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि डिझाइनक्षेत्रामध्ये असलेले थ्री-डी प्रिंटिंगच्या क्षमतेचे महत्त्व लक्षात येते.

अधिक वाचा: R. D. Banerjee-Mohenjo-Daro Man: मोहेंजोदारो मॅनचं पुढं झालं काय? १०० वर्षांनंतरही गूढ कायम

अमेरिकेतील टेक्सासमधील थ्री-डी प्रिंटर हॉटेल का ठरत आहे वेगळं?

अमेरिकेत थ्री-डी प्रिंटरच्या मदतीने हॉटेलची रचना तयार केली जात आहे. एल कॉस्मिको मार्फा हॉटेल आणि त्याच्या कॅम्पग्राउंडचा विस्तार केला जात आहे. मार्फा शहराच्या बाहेर असलेल्या या हॉटेलचा विस्तार करत असताना त्यात ४३ हॉटेल युनिट्सची वाढ केली जात आहे, तर १८ अतिरिक्त निवास स्थानं थ्री-डी प्रिंटरचा वापर करून बांधण्यात येणार आहे. एल कॉस्मिकोचे मालक लिझ लॅम्बर्ट, टेक्सासस्थित थ्री-डी प्रिंटिंग कंपनी ICON आणि आर्किटेक्चरल फर्म Bjarke Ingels Group (BIG) यांनी या विशेष हॉटेल युनिट्सची मूळ संकल्पना मांडली होती. रॉब रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, येथील योजनांमध्ये १,५८७ स्क्वेअर फूट ते २,६०१ स्क्वेअर फूट आकाराच्या दोन, तीन आणि चार बेडरूमचा समावेश आहे. या हॉटेलच्या रचनेत वक्ररेषा, घुमट, आणि परवलय आहेत जे थ्रीडी प्रिंटिंग पद्धतीमुळेच शक्य झाले आहे असे लॅम्बर्ट म्हणाले.

वेळ आणि खर्चात बचत

या हॉटेलचं बांधकाम आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलं जात आहे. या प्रक्रियेत, डिजिटल फाईलच्या आधारे बांधकाम सामग्रीचा थर एकावर एक ठेवून हॉटेलचे संपूर्ण बांधकाम केले जाते. या तंत्रामुळे जटिल आकारांची रचना करणे सोपे होते, जे पारंपारिक पद्धतींनी करणे कठीण आहे. टेक्सासमधील हे हॉटेल एक नवा आदर्श निर्माण करत आहे, ज्यामुळे पारंपारिक बांधकामाच्या तुलनेत वेळ आणि खर्चात बचत होते.

मार्फा हे शहर डेव्हिस पर्वतरांगा आणि बिग बेंड नॅशनल पार्क यांच्या दरम्यान वसलेले आहे. हे स्थळ लोन स्टार स्टेटमधील नेहमीच्या इतर पर्यटन स्थळांसारखे मुळीच नाही. येथे इन्फिनिटी पूल, ‘रिसेट’ रूम आणि आणखी बरेच काही आहे. लॅम्बर्ट यांनी असे नमूद केले की पारंपरिक बांधकामात महाग ठरू शकते अशा रचना स्वस्तात या हॉटेलमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या दोन युनिट्सच्या बांधकामातील एकमजली, १२ फूट (३.७ मीटर) उंच भिंतींमध्ये तीन बेडरूम असलेले निवासी क्षेत्र आणि एक सिंगल-रूम हॉटेल युनिट आहे. या हॉटेलच्या वळणदार, बेज रंगाच्या या भिंती ICON च्या Vulcan या ४६.५ फूट (१४.२ मीटर) रुंद, १५.५ फूट (४.७ मीटर) उंच आणि ४.७५ टन वजनाच्या ३-डी प्रिंटरद्वारे तयार केल्या जात आहेत. या ३-डी प्रिंटरमधील ‘शाई’ खास सिमेंट असलेला पदार्थ आहे. याला लावाक्रीट म्हणतात.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

रॉब्ब रिपोर्टने नमूद केले की, या मालमत्तेत खुल्या आकाशाखालील एक स्नानगृह असेल. जे येथील विशेष सुविधांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावर ही भर दिला जाईल. या स्नानगृहात हमाम (स्टीम रूम), सौना, कोल्ड प्लंज, हॉट टब्स, उपचारांसाठी युर्ट्स, आणि “रिसेट” रूम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्रांती आणि आराम करण्यासाठीच्या जागेपासून सर्व काही उपलब्ध असेल. ग्राहक नवीन बार आणि रेस्टॉरंट, सामुदायिक स्वयंपाकघर, आणि वर्तुळाकार इन्फिनिटी पूलचा आनंद देखील घेऊ शकतील. एल कॉस्मिकोचा विस्तार २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे निश्चित झाले आहे. हॉटेल युनिट्सच भाडं प्रतिरात्र २०० डॉलर्स ते ४५० डॉलर्स या दरम्यान असेल.

कामगारांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो

या नवीन बांधकाम पद्धतीमुळे कामगारांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो असे ऑस्ट्रेलियातील चार्ल्स डार्विन विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे व्याख्याते मिलाड बाझली यांनी सांगितले. “माझ्या मते, सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्थानिक नोकऱ्यांच्या दृष्टीने, विशेषत: दुर्गम भागांमध्ये, हे एक आव्हान असेल ज्याचा विचार आपल्याला थ्री-डी प्रिंटिंग पद्धत अवलंबताना करावा लागेल,” असे बाझली म्हणाले.