टेडी बेअर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय आहे. लहान मुलांना आनंदी करण्यासाठी आणि आपले प्रेम व्यक्त करण्यासाठीही टेडी बेअर भेट म्हणून दिला जातो. परंतु, या टेडी बेअरच्या जन्मामागेही इतिहास आहे. आजच्याच दिवशी १९०३ साली एका लहान खेळण्यांच्या दुकानाचा मालक मॉरिस मिक्टॉम याने पहिल्यांदा त्याच्या ब्रुकलिन येथील दुकानाच्या खिडकीत कापसाचे दोन अस्वल विक्रीसाठी ठेवले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्या कथेपासून प्रेरित होऊन, त्याला ‘टेडी बेअर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. काय आहे टेडी बेअरमागचा इतिहास? जगाला कसा मिळाला पहिला टेडी बेअर? त्यामागची कहाणी काय? त्याविषयी जाणून घेऊ.

पहिल्या टेडी बेअरची विक्री

आजपासून बरोबर १२२ वर्षांपूर्वी, मॉरिस मिचटॉमने पहिला ‘टेडी बेअर’ त्याच्या ब्रुकलिन येथील खेळण्यांच्या दुकानाच्या खिडकीत ठेवला होता आणि त्याचे नाव राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्या टोपणनावावरून देण्यात आले. राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना टेडी नावाने ओळखले जायचे. १६ नोव्हेंबर १९०२ रोजी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेले राजकीय व्यंगचित्र पाहून मिक्टॉम यांना या नावाची कल्पना सुचली. पुलित्झर-विजेता कलाकार क्लिफर्ड बेरीमन यांनी रेखाटलेले हे व्यंगचित्र मिसिसिपी येथील रुझवेल्ट यांच्या शिकार प्रवासातील एका प्रसंगावर आधारित होते.

प्रवासादरम्यान रुझवेल्ट यांना त्यांच्या मार्गावर विलोच्या झाडाला बांधलेल्या जुन्या, जखमी काळ्या अस्वलाचा सामना करावा लागला. एक अनुभवी शिकारी असूनही त्यांनी अस्वलाला ठार मारण्यास नकार दिला. नॅशनल पार्क सर्व्हिस वेबसाइटनुसार, रुझवेल्ट म्हणाले, “मी संपूर्ण अमेरिकेत शिकार केली आहे आणि मला शिकारी असल्याचा अभिमान आहे; पण झाडाला बांधलेल्या वृद्ध, थकलेल्या, जखमी अस्वलाला मी गोळ्या घातल्या, तर मला स्वतःचा अभिमान वाटणार नाही.” रुझवेल्ट यांच्या दयाळूपणाची बातमी त्वरित देशभर पसरली आणि लोकांच्या मानसिकतेवर याचा परिणाम झाला. राजकीय व्यंगचित्रकारांनी या प्रसंगाचे व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली आणि रुझवेल्ट यांचा दयाळू चेहरा जगासमोर आणला.

आजच्याच दिवशी १९०३ साली एका लहान खेळण्यांच्या दुकानाचा मालक मॉरिस मिक्टॉम याने पहिल्यांदा त्याच्या ब्रुकलिन येथील दुकानाच्या खिडकीत कापसाचे दोन अस्वल विक्रीसाठी ठेवले होते. (छायाचित्र-एपी)

कथेपासून प्रेरित होऊन, मिक्टॉम आणि त्यांची पत्नी रोझ यांनी बटणाचे डोळे असलेले कापसाचे लहान अस्वल तयार केले आणि हे अस्वल त्यांच्या दुकानाच्या खिडकीत टेडी बेअर या नावाने प्रदर्शित केले. ‘कार्नेगी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’नुसार, राष्ट्राध्यक्षांनी नंतर मिक्टॉम यांना त्याच्या नवीन उत्पादनांसाठी त्यांचे टोपणनाव वापरण्याची परवानगी दिली, जी चर्चेची बातमी ठरली. ‘टेडी बेअर’च्या यशामुळे मिक्टॉमच्या करिअरमध्ये बदल झाला आणि त्यांनी १९०७ मध्ये आयडियल नॉव्हेल्टी आणि टॉय कंपनीची स्थापना केली.

१५ फेब्रुवारीला इतिहासात आणखी दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. १९६५ रोजी दुपारच्या वेळी कॅनडाचा प्रतिष्ठित लाल व पांढरा मॅपल लीफ ध्वज पहिल्यांदा संसद हिलवर उभारण्यात आला. हे देशाच्या इतिहासातील एका निर्णायक क्षणाचे प्रतीक आहे. दरम्यान, १८८९ मध्ये याच दिवशी क्युबाच्या हवाना हार्बरमध्ये यूएसएस मेनचा प्रचंड स्फोट होऊन २६० हून अधिक अमेरिकन क्रू मेंबर्स मारले गेले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धाला सुरुवात झाली.

कॅनडाच्या राष्ट्रीय ध्वजाचा जन्म

१९६५ मध्ये या दिवशी कॅनडाने अधिकृतपणे आपला प्रतिष्ठित लाल-पांढरा मॅपल लीफ ध्वज स्वीकारला, जो राष्ट्राच्या ओळखीचे प्रतीक आहे. याआधी कॅनडाने १८७० ते १९२४ या काळात एका कोपऱ्यात युनियन जॅक असलेला ध्वज आणि प्रांतीय कोट असलेली ढाल असलेला लाल ध्वज वापरला होता. परंतु, कॅनडा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून विकसित होत असताना, विशिष्ट ध्वजाची आवश्यकता समोर आली. १९६० च्या दशकात नवीन राष्ट्रीय ध्वजाच्या मागणीला वेग आला.

डिसेंबर १९६४ मध्ये व्यापक चर्चेनंतर संसदेने अंतिम डिझाइनला मंजुरी दिली. पाचवे किंग जॉर्ज यांनी १९२१ मध्ये या ध्वजातील लाल-पांढऱ्या रंगसंगतीला कॅनडाचा अधिकृत रंग घोषित केला होता, तर ध्वजाची रचना ओंटारियो येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमधील प्राध्यापक जॉर्ज स्टॅन्ले यांनी प्रस्तावित केली होती. १५ फेब्रुवारी १९६५ रोजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नवीन ध्वज अधिकृतपणे स्वीकारण्याची घोषणा केली आणि तो पहिल्यांदाच पार्लमेंट हिलवर उभारला गेला.

अमेरिकेच्या पहिल्या युद्धनौकेचा स्फोट

१८९८ मध्ये याच दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारीला क्युबाच्या हवाना हार्बरमध्ये अमेरिकेच्या पहिल्या युद्धनौकांपैकी एक असणाऱ्या यूएसएस मेनचा विनाशकारी स्फोट झाला. या स्फोटात २६० हून अधिक अमेरिकन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आणि हा अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला. जानेवारीमध्ये हवाना येथे स्पॅनिश राजवटीविरुद्ध बंडखोरी झाल्यानंतर अमेरिकन हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी यूएसएस मेनला मैत्रीपूर्ण भेटीसाठी क्युबाला पाठवण्यात आले होते. मार्चमध्ये अधिकृत यूएस नेव्हल कोर्ट ऑफ इन्क्वायरीने असे ठरवले की, जहाज एका खाणीमुळे नष्ट झाले होते; मात्र त्यांनी स्पष्टपणे स्पेनला दोष दिला नाही.

परंतु, बहुतेक अमेरिकन जनतेला खात्री स्पॅनिश सहभागाबद्दल खात्री होती; ज्यामुळे युद्धाची मागणी वाढू लागली. तीन महिन्यांत अमेरिकन सैन्याने जमीन आणि समुद्रावरही स्पेनचा निर्णायकपणे पराभव केला. ऑगस्टपर्यंत युद्धविराम झाला आणि १२ डिसेंबर १८९८ रोजी पॅरिसच्या करारावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर अधिकृतपणे स्पॅनिश-अमेरिकन युद्ध संपुष्टात आले. या करारामुळे स्पेनने पोर्तो रिको, ग्वाम व फिलिपिन्सला अमेरिकेकडे सोपवले. अनेक दशकांनंतर १९७६ मध्ये अमेरिकन नौदल अन्वेषकांनी असा निष्कर्ष काढला की, हा स्फोट बहुधा जहाजावरील दारूगोळ्याच्या साठ्याला आग लागल्याने झाला होता.

Story img Loader