अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे बुधवारी (२० जानेवारी २०२१ अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. तर कमला हॅरिस या अमेरिकेच्या ४९ व्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे १२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) कॅपिटलच्या वेस्ट फ्रण्टवर बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील. ७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरणार आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्येच स्पष्ट होतात. मात्र असं असतानाही पुढील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना दीड ते दोन महिन्यांनंतर का शपथ दिली जाते? २० जानेवारीलाच नवीन राष्ट्राध्यक्षांना का शपथ दिली जाते? खरं तर ही तारीख निवडण्यामागे काही खास कारण आहे. केवळ कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे नाही तर अमेरिकन लोकशाहीमधील ८५ वर्षांपूर्वीची एक ऐतिहासिक घटना आणि अमेरिकन संविधानामध्ये या शपथविधीसंदर्भात एक खास गोष्ट नमूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २० जानेवारी रोजीच शपथ घेतात. १९३७ साली जेव्हा फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करण्यासाठी २० जानेवारीची निवड केली तेव्हापासून अमेरिकेचे सर्व राष्ट्राध्यक्ष याच दिवशी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतात. त्यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चार मार्च रोजी पदाची शपथ घ्यायचे. मात्र रुझवेल्ट यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात दीड महिने आधीच करत ही परंपरा बदलली.

का आणि कशासाठी बदलण्यात आली तारीख?

१९३७ च्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चार मार्च रोजी शपथ घ्यायचे. आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना टप्प्याटप्प्यात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या हाती कारभार सोपवत कायदेशीर प्रतिक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ मिळावा या दृष्टीने ही तारीख ठरवण्यात आली होती. त्यावेळी वेगवेगळी कागपत्र आणि इतर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागायचा. मात्र रुझवेल्ट हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांना १९३७ साली दुसऱ्यांदा शपथ घेताना या साऱ्या गोष्टी कराव्या लागल्या नाहीत.

…आणि संविधानात बदल करण्यात आला

रुझवेल्ट यांच्या पहिल्या कार्यकाळामध्येच अमेरिकेच्या राजकारणामध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी आधीच्या राष्ट्राध्यक्षांना कारभार हकावा लागायचा. मात्र या काळात त्यांची अवस्था एखाद्या लंगड्या बदकाप्रमाणे असायची अशी टीका केली जायची. या कालावधीमध्ये राष्ट्राध्यक्षांकडे फारसे अधिकार आणि वेळ नसायचा. त्यामुळे ते ठोस आणि धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नव्हते.

सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांहून अधिक कालावधी देणं काळानुरुप योग्य वाटत नव्हतं. सत्तांतर करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेमधील कालावधी कमी करण्यासाठी अमेरिकेच्या घटनेमध्ये बदल करण्यात आला. हा अमेरिकन संविधानातील २० वा बदल ठरला.

नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर, गाड्या, विमान अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल

या बदलामुळे काय झालं?

अमेरिकेच्या संविधानामध्ये हा २० वा बदल २३ जानेवारी १९३३ रोजी मंजूर करण्यात आला. यानुसार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी २० जानेवारी रोजी शपथ घ्यावी असं निश्चित करण्यात आलं. म्हणजेच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर सत्ता नवीन राष्ट्राध्यक्षांच्या हातात येण्याचा कालावधी हा दोन महिन्यांनी कमी करण्यात आला. केवळ शपथविधीची नाही तर याच बदलामध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी अमेरिकन काँग्रेस म्हणजेच संसदेचे सत्र तीन जानेवारी रोजी भरवण्यात यावे असंही निश्चित करण्यात आलं. नवीन बदलांनुसार मावळते राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष हे २० जानेवारीचा दिवस सुरु होण्याआधी म्हणजेच १९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटं ५९ सेकंदांपर्यंत सत्तेत असतात. यानंतर नवीन प्रशासनाकडे संपूर्ण कारभार सोपवला जातो.

इतर रंजक गोष्टी

अमेरिकेमधील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना देशाचे सरन्यायाधीश राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतात. मात्र संविधानानुसार यासाठी सरन्यायाधीशांनीच शपथ द्यावी असं बंधनकारक करण्यात आलेलं नाही. इतकचं नाही तर २० जानेवारी रविवारी असेल तर एका खासगी कार्यक्रमात शपथविधीचा कार्यक्रम घेतला जातो. त्यानंतर पुढील दिवशी म्हणजेच २१ जानेवारी रोजी सोमवारी मोठ्या सोहळ्याचे आयोजन केलं जातं.

ओबामांनी शपथ घेतली तेव्हा

आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा बराक ओबामा यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली होती तेव्हा २१ तारीख होती. ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना दोन्ही कार्यकाळात बायडेन हे उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे आता बायडेन या समारंभामध्ये तिसऱ्यांदा सहभागी होणार आहेत.