सुमारे पाच शतकांपूर्वी, मुघल सम्राट अकबराने गोव्याच्या पोर्तुगीज एन्क्लेव्हमध्ये नेमलेल्या जेसुइट धर्मगुरूंना ख्रिस्ती धर्माबद्दल शिकवण देण्याची विनंती केली होती. अकबराला ख्रिस्ती धर्माबद्दल जाणून का घ्यायचे होते हा प्रश्न कोड्यात टाकणारा आहे. या मागे अकबराचा वैयक्तिक स्वार्थ होता का की, त्याचा ‘दीन-ए-इलाही’ या नवीन धर्मासाठी त्याला योग्य साहित्य निवडायचे होते, हे आज सांगणे कठीण आहे. असे असले तरी, यातून सांस्कृतिक देवाणघेवाणीची एक विस्तृत प्रक्रिया सुरू झाली, पर्शियन आणि युरोपियन या संस्कृतींचे कलेच्या स्वरूपात समीकरण आकारास येण्यास सुरुवात झाली होती. या दोन कला संस्कृती आकृतिबंधांच्या मिश्रणाने गौरवशाली कलात्मक परंपरेच्या संग्रहात भर पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकबराचे निमंत्रण

“जलाल-उद्दीन मोहम्मद अकबर राजा देवाने नियुक्त केला आहे अशी धारणा आहे, सेंट पॉलच्या ऑर्डरच्या मुख्य पाद्रीला माहीत आहे की, मी त्यांचा चांगला मित्र आहे. मी तिकडे अब्दुल्ला नावाचा माझा राजदूत आणि डॉमिनिक पायर्स यांना पाठवत आहे, तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही मला दोन विद्वान पुजारी पाठवावेत, त्यांनी त्यांच्यासोबत कायद्याची आणि गॉस्पेलची मुख्य पुस्तके आणावीत जेणेकरून मी कायदा शिकू शकेन आणि त्यात सर्वात परिपूर्ण होऊ शकेन” असे आमंत्रण अकबराने गोव्याच्या जेसुइट्ससाठी पाठवले होते.

आणखी वाचा : भारतीय संस्कृतीत रजस्वला देवीची उपासना सर्वश्रेष्ठ का मानली जाते? आणि कुठे?

गोव्याच्या जेसुइट्सची भूमिका

अकबराचे हे निमंत्रण गोव्याच्या जेसुइट्सला आश्चर्यचकित करणारे होते. तरीही त्यांनी या निमंत्रणात उत्तरेकडील मुस्लिम राज्यकर्त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण आणि कायदे शिकवण्याची संधी पाहिली आणि ते भविष्यात धर्मांतर करतील या अपेक्षेने त्यांनी ताबडतोब बायबलच्या अनुवादित खंडांच्या प्रती आणि ख्रिश्चन (देवतांच्या) प्रतिमा प्रतिबिंबित करणाऱ्या युरोपमधील अनेक कलाकृती पाठविण्याची व्यवस्था केली.

मुघल दरबाराची प्रतिक्रिया

गोव्याच्या जेसुइट्सकडून मुघल दरबारात पोहोचलेली पहिली चित्रे ही मदर मेरीची मोठी तैलचित्रे होती, मुस्लिम जगाला तिची कुराणातील उपस्थिती माहीत होती. जेसुइट्सने नंतर ‘रॉयल पॉलीग्लॉट बायबल’ अकबराला सादर केले, ज्यामध्ये फ्लेमिश चित्रकाराने साकारलेली बायबलसंबंधीची चित्रे आहेत. ऐतिहासिक संदर्भानुसार, बायबलमधील प्रतिमा पाहून अकबर इतका प्रभावित झाला की, त्याने ख्रिस्त आणि मेरीच्या चित्रासमोर गुडघे टेकले आणि ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू पद्धतीने तीनदा पूजा केली. मुघल सम्राट युरोपियन कलाकृतींमधील धार्मिक भावनांनी प्रभावित झाला होता, परंतु ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता.

या उलट, मुघल साम्राज्याचे वर्चस्व आणि राज्य करण्याचा त्यांचा सार्वभौम अधिकार दर्शविण्यासाठी त्याला गैर-मुघल आकृतिबंधांचा- कलाकृतीचा वापर पूर्णपणे योग्य वाटला. मानवतावादी मूल्यांवर आणि वास्तववादावर भर देणारी (Renaissance art ) पुनरुज्जीवनवादी कला १६ व्या शतकात युरोपमध्ये शिखरावर होती आणि ती त्या काळातील बायबलसंबंधी प्रतिमांमध्येही दिसून येते. या चित्रांच्या विषयांकडे जगाला आवाहन करण्याचे सामर्थ्य होते, मुघल शासकांनी बहु-धार्मिक विषयांसह परकीय भूमीत त्यांचे राज्य सार्थ ठरवण्यासाठी आदर्श म्हणून या चित्रांच्या विषयाकडे पाहिले.

आणखी वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार धोक्यात? काय आहे नेमके प्रकरण?

युरोपियन कलेचा मुघल कलाशैलीवर परिणाम होतो

केसू दास, मनोहर, बसवान आणि केसू खुर्द यांसारखे अकबराच्या दरबारातील चित्रकार युरोपियन कलाकृतींनी/ आकृतिबंधांनी सर्वात जास्त प्रेरित झाले होते आणि त्यांनी ख्रिश्चन थीम/ विषय आणि पात्रांसह चित्रे साकारली. नंतरच्या काळात, जहांगीर आणि त्याहीनंतरच्या मुघल शासकांनीही ख्रिश्चन कलाकृतींमधील अनेक बाबींच्या वापराची परंपरा तशीच सुरु ठेवली. मुघल आकृतिबंध आणि त्यातील स्थानिक देखावे यांच्या वापरावरून चित्रांचे भारतीय मूळ स्पष्ट होते. त्यांपैकी अनेकांनी भारतीय देवींच्या परिचित प्रतिमांवर युरोपियन पात्रे तयार केली. अशा अनेक कलाकृती होत्या ज्यात भित्तिचित्रांमध्ये मुघल शासकांसोबत बायबलमधील पात्रे दर्शविण्यात आली होती, यामागील मुख्य उद्देश मुघल राजवटीत धार्मिक सदभावना दर्शवणे हा होता. १७ व्या शतकातील जहांगीरचे चित्र हे राजकुमार खुर्रमला पगडीच्या दागिन्यांसह दर्शवते. हे मुघल राजवटीतील ख्रिश्चन धर्मातून घेतलेल्या प्रतिमेसह कलेचे उत्तम उदाहरण मानले जाते. या प्रकरणात, कलाकृतीचे मूळ पॉलीग्लॉट बायबलमध्ये शोधले जाऊ शकतात. बारकाईने पाहिल्यास बायबलमधील पात्रांनी व्यापलेली शीर्ष भित्तिचित्रांमध्ये दिसून येतात.

मुघल भित्तिचित्रांवरील परिणाम

मुघल राजवाड्यांमध्ये ख्रिश्चन मूर्तींचा वापर करून भित्तिचित्रे तयार करण्यासाठी शाही कमिशन नेमले होते, हे आश्चर्यकारक आहे. जहांगीरच्या सार्वजनिक संतांची भित्तिचित्रे प्रथम आग्रा किल्ल्यात सम्राटाच्या सिंहासनाभोवती दिसली. नंतर लाहोर आणि मांडूच्या कोर्टात अशीच भित्तिचित्रे तयार करण्यात आली. भिंती किंवा छताच्या वरच्या भागामध्ये संतांच्या प्रतिमा नेहमी एका ओळीमध्ये लावल्या जात. विशेष म्हणजे, सामान्य लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून ख्रिश्चन प्रतिमा इमारतींच्या बाहेरील भागावर कधीही नव्हत्या. ख्रिश्चन धर्म भारतात येण्यापूर्वी इतर अनेक देशांमध्ये स्वीकारला गेला होता आणि स्वीकारला जात होता, परंतु मुघल शासकांच्या हितसंबंधांना सामावून घेण्याच्या दृष्टीने येथे केलेले धर्माचे स्वागत अद्वितीय होते. परंतु असे करताना, मुघलांनी मूळ भारतीयांना, ख्रिश्चन मूल्ये आणि परंपरांची ओळख करून दिली, हे विशेष!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This mughal emperor was curious about christianity what was its impact on the indian art tradition in period of akbar and development of mughal art in indian history svs
Show comments