सीरियामध्ये गुरुवारपासून पुन्हा उफाळलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत तेराशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुसंख्य सामान्य अलाविट पंथीय नागरिकांचा समावेश आहे. हे अलाविट पंथीय मुख्यतः पदच्युत अध्यक्ष बशर असद यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तेथील बंडखोरांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारच्या सुरक्षा दलाने जवळून गोळ्या घालून या पंथाच्या नागरिकांना ठार केल्याचा आरोप होत आहे.
हिंसाचाराला सुरुवात कशी झाली?
असद समर्थक आणि सरकार समर्थकांदरम्यानचा मोठ्या प्रमाणात संघर्ष गुरुवारी ६ मार्चपासून सुरू झाला. त्यापूर्वी, २६ फेब्रुवारीला लटाकिया या सीरियातील सर्वात मोठ्या बंदराच्या शहरामध्ये सुरक्षा दलांनी चार जणांची गोळ्या घालून हत्या केली. त्यामध्ये बशर असद सरकारच्या काळात लष्करात सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्याचा समावेश होता. माजी लष्करी अधिकारी असल्यामुळे त्याला विद्यमान सरकारकडून अभय असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सरकारी सुरक्षा दलांनीच त्याची हत्या केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, पदच्युत अध्यक्ष बशर अल-असद यांचे मूळ गाव असलेल्या कर्दाहा येथे स्थानिकांनी पोलीस ठाण्याला आग लावली. त्याच संध्याकाळी असद समर्थक अलिवाट पंथीयांचा गट आणि विद्यमान राजवटीचे सुरक्षा दले यांच्यादरम्यान तीन शहरांमध्ये चकमकी घडल्या. त्यातून सुरू झालेल्या हिंसाचाराने व्यापक स्वरूप धारण केले. गुरुवारी हा हिंसाचार असद समर्थक आणि विद्यमान राजवटीचे सैनिक यांच्यादरम्यान होता, त्याने दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांनी अलिवाट पंथीयांविरोधात केलेली सूडाची कारवाई असे वळण घेतले.
हिंसाचाराचे स्वरूप
ब्रिटनस्थित ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स’ या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात चार दिवसांमध्ये तेराशेपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. त्याची सर्वाधिक झळ सामान्य नागरिकांना बसली. उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण ८३० नागरिक मारले गेले असून मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. त्यापैकी बहुसंख्य लोकांवर जवळून गोळ्या झाडल्या आहेत. त्याशिवाय २३१ सरकारी सुरक्षा दलाचे सदस्य आणि असद समर्थक २५० सशस्त्र बंडखोरही मारले गेले. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात घरांची लुटालूटही झाली.
हिंसाचाराची सर्वाधिक झळ बसलेला अलाविट पंथ
अलाविट पंथ हा शिया पंथाचाच एक भाग आहे. गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांची सुन्नीबहुल सीरियावर सत्ता होती. हाफिज अल-असद यांच्या रूपाने १९७०पासून सुरू झालेली ही राजवट गेल्या वर्षाच्या अखेरीस संपुष्टात आली आणि बशर अल-असद यांना देश सोडून निघून जावे लागले. त्यांतर तेथील सत्ता सुन्नी पंथीयांकडे गेली. तेव्हापासून अलाविट पंथीयांचे भवितव्य अधांतरी असल्याचे मानले जाते. असद यांची सत्ता असताना अलाविट गटाचे लष्कर आणि सुरक्षा दलांमध्ये प्राबल्य होते. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झालेला हिंसाचार हा प्रामुख्याने अलाविट पंथीयांना लक्ष्य करून सुरू झाल्याचे दिसते. हा समूह असद यांच्याबरोबरच रशिया आणि इराणचे समर्थक असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.
सीरियातील राजवट
सीरियामध्ये गेल्या डिसेंबरमध्ये तत्कालीन अध्यक्ष बशर अल-असद यांची राजवट उलथवून टाकत ‘हयात तहरीर अस-शम’ (एचटीएस) या अतिरेकी गटाने देशाची सत्ता हस्तगत केली. असद यांच्या क्रूर राजवटीच्या विरोधात बंड पुकारलेल्या ‘एचटीएस’ची कामगिरीही फार वाखाणण्याजोगी नाही. हंगामी अध्यक्ष अहमद शरारा यांच्याकडे सध्या देशाची सूत्रे आहेत. त्यांनी रविवारी देशवासियांना शांततेसाठी आवाहन केले, पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना प्रशासनावर आवश्यक पकड मिळवता आलेली नाही.
अध्यक्षांपुढे विश्वासार्हतेचे आव्हान
सीरियामध्ये निष्पक्ष निवडणुका घेऊन तेथील विविध धार्मिक आणि वांशिक गटांना बरोबर घेतले जाईल जाईल असे आश्वासन अध्यक्ष शरारा यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात तसे घडेल का याबद्दल साशंकता आहे. ते स्वतःला सुधारणावादी जिहादी म्हणवून घेत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या सरकारमध्ये सर्व पदे शरारा यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या सुन्नी पुरुषांच्या हाती आहेत आणि त्यातील बहुसंख्य प्रशासक शरारा यांचा बालेकिल्ला असलेल्या इडलिब प्रांतामधील आहेत. आपल्या कडव्या समर्थकांना खुश ठेवायचे की सीरियामधील अनेक अल्पसंख्यांक गटांना सर्वसमावेशकतेचा दिलासा द्यायचा हा त्यांच्यापुढील निरुत्तरित प्रश्न आहे.
सरकारचा प्रतिसाद
सुरक्षा दलांनी हिंसाचारग्रस्त भागामधील परिस्थिती नियंत्रणाखाली आणली असल्याचा दावा संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल हसन आब्देल-घानी यांनी रविवारी केला. प्रत्यक्षात रविवारनंतरही तिथे हिंसाचार सुरूच होता. दमास्कसमधील एका मशिदीतून बोलताना शरारा यांनी राष्ट्रीय ऐक्य आणि नागरी शांततेचे आवाहन केले. ईश्वरकृपेने, या देशात आपण सर्व मिळून एकत्र राहू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. वास्तव मात्र या आशावादापेक्षा बरेच वेगळे आहे. गेल्या १४ वर्षांमधील क्रूर राजवटीदरम्यान हिंसाचार आणि ती राजवट संपुष्टात आणल्यानंतरही हिंसाचारच अशी सीरियाची अवस्था आहे.
nima.patil@expressindia.com