म्हैसूर येथील एका बस स्थानकावरून सध्या कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापलं आहे. संबंधित बस स्थानकाची रचना मशिदीसारखी असल्याने स्थानिक भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या आक्षेपानंतर म्हैसूरमधील वादग्रस्त बस स्थानकाची रचना बदलण्यात आली आहे. या बस स्थानकाच्या छतावर तीन घुमट बसवण्यात आले होते, त्यामुळे हा बसस्टॉप मशिदीसारखा दिसतो, असा आक्षेप सिम्हा यांनी घेतला होता. यातील दोन लहान घुमट आता हटवण्यात आले आहेत.
वादाला ठिणगी कशी पडली?
म्हैसूर येथील बस स्थानकाची रचना मशिदीप्रमाणे असून त्यावर तीन घुमट बसवल्याने या बस स्थानकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर म्हैसूरचे भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी मशिदीवरील घुमट काढण्याची मागणी केली. ही मागणी मान्य न झाल्यास आपण बस स्थानकाचा पाडाव करू, अशी धमकी त्यांनी दिली. यानंतर २७ नोव्हेंबर रोजी संबंधित बस स्थानकांवरून दोन छोटे घुमट हटवण्यात आले आहेत.
आपली बाजू मांडताना खासदार सिम्हा यांनी ट्विटरवर म्हटलं की, “मध्यभागी एक मोठा घुमट आणि त्याच्या पुढील बाजूस समोरासमोर दोन छोटे घुमट असणं, ही मशिदीची रचना आहे.” घुमट हटवल्याबद्दल त्यांनी स्थानिक आमदार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
मशीद सदृश्य बस स्थानक कुणी बांधलं?
म्हैसूरमधील हे बस स्थानक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६६ वर होते. बस स्थानकावर मध्यभागी घुमटासारखी रचना होती, तिच्या दोन्ही बाजूला दोन लहान घुमट होत्या. म्हैसूर पॅलेसच्या रचनेपासून प्रेरणा घेऊन हे बस स्थानक उभारण्यात आलं होतं. स्थानिक भाजपा आमदार एस ए रामदास यांनी याला मंजुरी दिली होती.
सिम्हा यांच्या धमकीनंतर, रामदास यांनी बस स्थानकावरील बाजुचे दोन लहान घुमट हटवण्याचे आदेश दिले. आता या बस स्थानकावर एकच मोठा घुमट कायम ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्थानिक भाजपा आमदार रामदास म्हणाले, “मी म्हैसूर पॅलेसपासून प्रेरणा घेऊन म्हैसूरमध्ये १२ बस स्टॉप बांधले होते. पण त्याला जातीय रंग देण्यात आला. यामुळे माझं मन दुखावलं आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मी बस स्थानकावरील बाजुचे दोन छोटे घुमट काढून टाकले आहेत. पण मोठा घुमट कायम ठेवला आहे. विकासाच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला होता.”
या वादावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख सलीम अहमद म्हणाले, “प्रताप सिम्हा हे एक खासदार आहेत. ते काय बोलत आहेत? हे त्यांना माहीत असायला हवं. कारण म्हैसूरमध्ये घुमट असलेल्या अनेक सरकारी इमारती आहेत, मग त्या इमारतीही पाडणार का?” असा सवाल सलीम अहमद यांनी विचारला.
प्रत्येक मशिदीवर घुमट असतोच का?
भारतीय वास्तुकलेवर विविध खंड लिहिणारे इतिहासकार पर्सी ब्राउन यांच्या मते, मशिदीची वास्तुकला मदिना येथील मोहम्मद पैगंबर यांच्या घराच्या रचनेवरून घेण्यात आली आहे. पण कालांतराने, बांधकामाच्या जागेनुसार मशिदीच्या रचनेत विविध बदल करण्यात आले. भारतात स्थानिक कारागीर आणि पाथरवट (शिल्पकला अवगत असणारे) यांच्या कौशल्यावर आधारित मशिदींची वास्तुकला प्रादेशिक भिन्नतेसह विकसित झाली.
‘मिहराब’ हे कोणत्याही मशिदीचं एकमेव अनिवार्य वैशिष्ट्ये आहे. मशिदीच्या आतमध्ये भिंतीवर लहान अल्कोव्ह असतात, जे ‘किब्ला’ किंवा ‘मक्काची दिशा’ दर्शवतात. याच ‘मिहराब’कडे पाहून मुस्लीम उपासक नमाज पठण करतात. मिहराबच्या समोर उपासकांना नमाज पठण करण्यासाठी मोकळी जागा असते. याव्यतिरिक्त मशिदीचा आकार, स्वरुप किंवा रचना विविध प्रकारची असू शकते. मशिदीवरील घुमटाला फारसं धार्मिक महत्त्व नसलं तरी बहुतेक मशिदीमध्ये एक किंवा अधिक घुमट असतात. ‘स्वर्गातील घर’ म्हणून या घुमटाकडे पाहिलं जातं.
मशिदीवर तीन घुमट असावेत का?
घुमट हे मशिदीचं वैशिष्ट्ये मानलं जाऊ शकतं. पण एखाद्या मशिदीत किती घुमट असावेत, याबाबत कोणताही निश्चित आकडा ठरलेला नाही. उदाहरणार्थ, बांगलादेशातील बागेरहाट येथे १५ व्या शतकात बांधलेली मशीद आहे, या मशिदीवर ६० घुमट असल्याने या मशिदीला ‘६०-घुमट मशीद’ म्हटलं जातं. याशिवाय कोलकाताच्या धरमटोल्ला येथील टिपू सुलतान मशिदीमध्येही मोठ्या संख्येने घुमट आहेत. दुसरीकडे, खेड्यातील किंवा निमशहरी भागातील लहान मशिदींवर मध्यवर्ती केवळ एकच घुमट असतो किंवा बऱ्याच मशिदींवर घुमट नसतो.
तीन घुमट असलेली मशीद
मशिदीवर मध्यभागी एक मोठा घुमट आणि बाजुला समोरासमोर दोन लहान घुमट, अशी रचना असलेल्या असंख्य मशिदी भारतात आहेत. १७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानच्या काळात बांधलेली दिल्लीतील ‘जामा मशीद’ आणि भोपाळची ‘ताज-उल मशिदी’ला तीन प्रमुख घुमट आहेत. प्रताप सिम्हा यांनीही आपल्या ट्विटमध्ये अशाच मशिदीचं चित्र ट्वीट केलं आहे. पण कोणत्याही धर्माशी निगडीत नसणाऱ्या अनेक इमारतींना तीन घुमट असू शकतात.
म्हैसूर पॅलेसचे घुमट नेमके कसे आहेत?
१९१२ मध्ये, तत्कालीन सत्ताधारी वोडेयार राजघराण्याने ‘म्हैसूर पॅलेस’ बांधलं आहे. वोडेयार घराण्याने ब्रिटीश वास्तुविशारद हेन्री इर्विन यांच्याकडून हे पॅलेस बांधून घेतलं आहे. भारतीय आणि युरोपियन वास्तुकलेच्या शैलीनुसार याचं बांधकाम करण्यात आलं आहे. म्हैसूर पॅलेसवरील घुमट पर्शियन शैलीने बांधण्यात आला असून यावर गुलाबी संगमरवरी दगडाचा मुकुट सजवण्यात आला आहे. याच पॅलेसपासून प्रेरणा घेऊन म्हैसूर येथील बस स्थानक उभारलं आहे.