जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) ११ मार्च २०२० रोजी अधिकृतपणे कोविड १९ या विषाणूला करोना महामारी म्हणून घोषित केले होते. आज या घटनेला बरोबर तीन वर्षे होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी आजच्याच दिवशी करोना महामारी जगभर पसरल्याचे जाहीर केले होते. अनेक देशांत किंवा खंडात एखाद्या साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यास त्याला महामारी म्हणून घोषित केले जाते. साथीच्या रोगापेक्षा महामारीचे रोग हे अधिक लोकांना प्रभावित करतात, तसेच यामध्ये मृत्यूचा आकडाही अधिक असतो. कोविड १९ च्या महामारीने भारतीय नागरिकांच्या जीवनात अनेक मूलभूत बदल घडवून आणले. लाखो लोक या महामारीने प्रभावित झाले तर असंख्य लोकांना आर्थिक फटका बसला. यानिमित्ताने आधुनिक भारतात आलेली पहिली आणि मोठी महामारी कोणती होती? त्याचा भारतावर काय परिणाम झाला, याबाबत घेतलेला हा आढावा.

कोविड १९ ही भारतातील पहिली महामारी नव्हती

जगभरात पसरलेली ‘प्लेगची तिसरी साथ’ (Third Plague Pandemic) ही भारतात आलेली पहिली मोठी महामारी. १८५५ साली चीनच्या युनान प्रांतातून याची सुरुवात झाली. (आताची करोना महामारीदेखील चीनच्या वूहान प्रांतातून आली, असे मानले जाते. हे विशेष) WHO च्या अभ्यासानुसार १८५५ ते १९५९ असा दीर्घकाळ या महामारीने जगाला छळले. १९५९ सालापर्यंत प्लेगचा मृत्यूदर वर्षाला २०० च्या खाली आल्यानंतर ही साथ संपत आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मात्र या शंभर वर्षांत जगभरातील १२ ते २५ दशलक्ष लोकांचा या साथीने बळी घेतला. त्यापैकी ७५ टक्के मृत्यू (१८९६ नंतर) हे ब्रिटिश अमलाखाली असलेल्या भारतीय उपखंडात झाले. जगभरात पसरलेली पहिली महामारी म्हणून प्लेगचा उल्लेख होतो. हाँगकाँग, त्यावेळचे बॉम्बे (प्रांत), सॅन फ्रान्सिस्को, ग्लासगो आणि पोर्तो सारख्या शहारांमध्ये प्लेगचा प्रसार झाला होता.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ

प्लेग म्हणजे काय?

भारतात त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीला ‘बुबोनिक प्लेग’ (Bubonic plague) असे म्हणत. यर्सिनिया पेस्टिस या जिवाणूमुळे हा रोग पसरत असे. संक्रमित उंदरांपासून मानवांपर्यंत या जिवाणूचे संक्रमण झाल्यावर प्लेगची साथ पसरायची. प्लेगबाधित पिसूचा मानवी शरीराला दंश झाल्यानंतर दंशाच्या जागी दूषित रक्त सोडले जायचे. यातून प्लेगचा जिवाणू शरीरात प्रवेश करत असे. लसिका वाहिनीवाटे हे जिवाणू लसिका ग्रंथीपर्यंत पोहोचून दाह निर्माण करायचे. फ्लूसारखी ताप-थंडी आणि डोकेदुखी अशी साधारण लक्षणे सुरुवातील दिसत असत. त्यानंतर काखेतील आणि जांघेतील लसिका ग्रंथींना सूज यायची. त्याठिकाणी गाठ तयार होऊन ती फुटल्यानंतर काळसर पूमिश्रित स्राव बाहेर पडायचा आणि काही दिवसांतच रुग्णाचा मृत्यू व्हायचा.

१८९६ च्या नंतर या रोगावर आधुनिक संशोधन व्हायला सुरुवात झाली. तोपर्यंत प्लेगच्या साथीने भारतात हाहाकार माजला होता. जानेवारी १८९७ मध्ये शास्त्रज्ञांनी हा रोग उंदरापासून पसरत असल्याचे शोधून काढले आणि लोकांना याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला. १८९८ मध्ये ही साथ पसरण्यामध्ये जिवाणूंची भूमिकादेखील स्पष्ट झाली.

हे वाचा >> प्रेरणादायी गोष्ट; जगभर थैमान घालणारा ‘प्लेग’ कोल्हापुरात टिकू शकला नाही

प्लेग भारतात कसा आला?

तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, १९ शतकाच्या सुरुवातील भारतातील काही भागांत अतिशय कमी प्रमाणात प्लेगची साथ पसरली. त्या त्या भागातील लोकसंख्येची घनता आणि जिवाणूची स्थिरता यामुळे कमीअधिक प्रमाणात या साथीचा उद्रेक पाहायला मिळाला. १९ व्या शतकात प्लेगपेक्षाही कॉलराची साथ ही भारतीयांसाठी मोठी चिंतेची बाब होती.

प्लेगची तिसरी साथ ही चीनमधून सुरू झाली आणि हाँगकाँगमधून समुद्रामार्गे भारतात पसरली. हाँगकाँगमध्ये प्लेगचा प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर ब्रिटिशांनी तिथून येणाऱ्या जहाजांचे काही दिवस विलगीकरण करण्यास सुरुवात केली. कालांतराने हाँगकाँगमध्ये प्लेगचा उद्रेक कमी झाल्यानंतर तिथून येणाऱ्या जहाजांचे विलगीकरण बंद करण्यात आले, त्यानंतर भारतात १८९६ च्या आसपास प्लेगचा प्रवेश झाला. ब्रिटिश वसाहतीत कलकत्ता, बॉम्बे, कराची या मोठ्या बंदरांमध्ये प्लेगची साथ झपाट्याने पसरली. पुण्यातही प्लेगचा मोठा उद्रेक झाला.

प्लेगची साथ किती भयानक होती?

भारतात पसरलेली ही महामारी शब्दशः भयानक स्वरूपाची होती. ब्रिटिशांना व्यापार आणि जगभरातील स्वतःच्या प्रतिमेची जास्त काळजी होती. त्यामुळे प्लेगच्या साथीची तीव्रता कमी करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. तोपर्यंत संपूर्ण जगालाच प्लेगने विळखा घातला होता. बॉम्बे प्रांताला तर ‘प्लेगचे शहर’ (The City of the Plague) अशी ओळख मिळाली. प्लेगचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत, फेब्रुवारी १८९७ पर्यंत शहरातील साडे आठ लाख लोकसंख्येपैकी ३ लाख ८० हजार एवढी लोक पुन्हा आपल्या मूळ गावी निघून गेले होते. आताच्या करोन महामारीप्रमाणेच त्याकाळातही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले.

प्लेगची साथ पसरण्यास धान्य व्यापारदेखील काही अंशी कारणीभूत ठरला. बाजारातील धान्य कोठारांमध्ये उंदरांची संख्या अधिक असायची. या उंदरांद्वारे जिवाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. १८९७ च्या अखेरपर्यंत प्लेगचा प्रसार उत्तरेकडील राज्यातही मोठ्या प्रमाणात झाला. पंजाब सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात मृत्यू पाहायला मिळाले.

आणखी वाचा >> प्लेगची साथ आणि मध्यमवर्ग

भारतात प्लेग फिजिशियन म्हणून काम पाहणारे चार्लस क्रेयटन (Charles Creighton) यांनी नोंद केल्यानुसार, प्लेगमुळे १९०६ पर्यंत काही दशलक्ष लोकांचे मृत्यू झाले होते. त्यापैकी अर्धे मृत्यू एकट्या पंजाबमध्ये झाले होते. इतिहासकार मायरॉन इचेनबर्ग यांनी आपल्या पुस्तकात (Plague Ports: The Global Urban Impact Of Bubonic Plague, 1894-1901) लिहिले की, भारतात १८९६ आणि १९२१ दरम्यान प्लेग साथीचे आगमन झाल्यानंतर १२ दशलक्ष भारतीयांनी प्राण गमावले. तर भारताबाहेरील देशांमध्ये जवळपास तीन दशलक्ष मृत्यू झाले, असे निरीक्षण इचेनबर्ग यांनी नोंदविले.

ब्रिटिशांनी प्लेगला कसे तोंड दिले?

प्लेग रोगाबद्दल असलेली अपुरी माहिती, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा स्वतःचा युरोपियन श्रेष्ठत्वाचा दृष्टिकोन याचे प्रतिबिंब प्लेग निवारण योजनांवर दिसून येत होते. ब्रिटिश यंत्रणेने बॉम्बे प्रांतात व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनेक गरिबांची घरे उध्वस्त करावी लागली. आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी लोकांना सक्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रेल्वे स्थानके आणि बंदरांवर वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आली होती. याचा परिणाम काही ठिकाणी हिंसाचारातदेखील झाला. पुण्यात चाफेकर बंधूंनी वॉल्टर चार्ल्स रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती.

हे वाचा >> १८९६ मध्ये या इंग्रज अधिकाऱ्यानेही आणले होते सोशल डिस्टन्सिंग!

तरीही प्लेगची साथ आटोक्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताशी व्यापार बंदीचा दबाव वाढल्यामुळे ब्रिटिशांनी “साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७” तयार केला. या कायद्यामुळे अधिकाऱ्यांना प्लेगचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अभूतपूर्व अधिकार प्राप्त झाले. हा तोच कायदा आहे जो करोना महामारीतही लागू करण्यात आला होता. (तोपर्यंत या कायद्यात बरीच सुधारणा करण्यात आली)

या कायद्यामुळे अधिकाऱ्यांना इमारतींची तपासणी आणि निर्जंतुकीकरण करण्याचे अधिकार मिळाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण शहरात रुग्णांची तपासणी आणि लक्षणे असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मिळाली. ज्याठिकाणी प्रतिकार झाला, त्याठिकाणी बळाचा वापर करून तो मोडून काढला. इतिहासकार अनिल कुमार यांनी ‘मेडिसन अँड द राज’ या पुस्तकात पुण्यातील परिस्थितीबाबत लिहिले की, ब्रिटिश सैन्यांकडून लैंगिक छळ, लोकांचा अपमान आणि गैरवर्तन केल्याबाबतची माहिती शहरभर पसरली. याचा परिणाम असा झाला की, रोगग्रस्त कुटुंबातील सदस्यांना लपवून ठेवण्याचा प्रकार वाढला. जेणकरून ब्रिटिश अधिकारी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करू शकणार नाहीत. याकाळात देशभरात अनेक दंगली उसळण्याचेही प्रकार घडले.

जात, हे रुग्णालयात दाखल न होण्याचे सर्वात मोठे कारण होते. रेबेका एल बुरोज यांनी लिहिले की, रुग्णालयात सगळ्या जातींना एकत्र ठेवून उपचार दिले जातात आणि त्यामुळे आपण अशुद्ध होतो ही अफवा जोरात पसरल्यामुळे अनेक लोक आजारी असतानाही रुग्णालयात दाखल होण्यास विरोध करत होते. रेबेका बुरोज यांनी “The Third Plague Pandemic and British India: A Transformation of Science, Policy, and Indian Society” या संशोधन अहवालात प्लेगची तिसरी महामारी भारतात पसरल्यानंतर त्याला कसे तोंड देण्यात आले. त्यावेळची परिस्थिती काय होती? याबाबतची विस्तृत आणि सखोल माहिती एकत्र केली आहे.

१९०० पर्यंत म्हणजे प्लेगचा प्रादुर्भाव सुरू होऊन चार वर्ष झाल्यानंतर ब्रिटिशांनी बळजबरीने संक्रमण रोखण्याचे प्रयत्न बदलले. त्याऐवजी त्यांनी रोगप्रतिबंधक लस टोचण्यावर लक्ष केंद्रित केले. परंतु लसीकरण करणे त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती. या लसीबाबत देखील भारतीयांमध्ये एक अफवा पसरली होती. लस टोचल्यास लैंगिक शक्ती नष्ट होती अशा अफवेमुळे लोक लसीकरणाकडे पाठ फिरवत होते.

प्लेगची साथ कधी संपली?

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेली प्लेगची महामारी २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातून नष्ट झाली नव्हती. भारतासाठी हा वाईट काळ होता. मुंबईत असलेले रशियन-फ्रेंच विषाणुतज्ज्ञ वॉल्डेमार हाफकिन यांनी प्लेगवरील लस प्रथम शोधून काढली. या लसीमुळे ८० टक्के मृत्यू रोखले गेले. पण कोविड १९ लसीप्रमाणेच या लसीमुळे प्लेग रोग होण्यापासून रोखता येत नव्हता. ज्यावेळी मोठ्या प्रमाणात उंदीर मारण्याची मोहीम हाती घेतली तेव्हा कुठे महामारीचा प्रभाव हळूहळू कमी झाला.

२० व्या शतकातदेखील कमीअधिक प्रमाणात प्लेगचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी दिसून आला. १९९४ मध्ये सूरतमध्ये प्लेगची साथ पसरली होती. यावेळी काही मृत्यूंची देखील नोंद करण्यात आली. प्रशासनाने वेळीच योग्य धोरणे राबविल्यामुळे साथ नियंत्रणात आली. मात्र यावेळी सुमारे तीन लाख लोक तेव्हा स्थलांतरित झाले होते. फाळणीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर पाहायला मिळाले.

Story img Loader