मासिक पाळी ही दर महिन्याला महिलांमध्ये येणारी एक नैसर्गिक क्रिया आहे. मासिक पाळीचा कालावधी प्रत्येक महिलांमध्ये वेगवेगळा असतो. सामान्यतः मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. मात्र, हा कालावधी शरीरातील बदलांनुसार कमी किंवा जास्त होतो. हे चक्र २१ ते ४० दिवसांचे असू शकते. मासिक पाळीत महिलांना दोन ते सात दिवसांपर्यंत ओटीपोटात दुखणे, मूड स्विंग, चिडचिड, थकवा यांसारखी लक्षणे जाणवतात.

परंतु, एक महिला हा त्रास चक्क १००० दिवसांहून अधिक काळ सहन करत असल्याची धक्कादायक आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारी माहिती समोर आली आहे. एका टिकटॉक वापरकर्त्या महिलेने आपला वेदनादायी अनुभव या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. २०२२ मध्ये तिच्या या समस्येची सुरुवात झाली. नेमके हे प्रकरण काय आहे? या महिलेला उद्भवलेली ही स्थिती काय आहे? ही स्थिती महिलांमध्ये किती सामान्य आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

१००० दिवसांपेक्षा जास्त काळ मासिक पाळीचा त्रास

टिकटॉकर महिला पॉपी हिने सोशल मीडियावर आपला वेदनादायी अनुभव सांगितला, ज्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. या महिलेचे वय केवळ २३ वर्षे आहे. साधारणपणे २०२२ मध्ये तिला रक्तस्त्राव सुरू झाला. परंतु, मासिक पाळीचे दिवस निघून गेल्यावरही तिची मासिक पाळी संपली नाही. हा त्रास बंद होत नसल्याचे लक्षात आल्यावर तीन आठवड्यांनंतर तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि डॉक्टरांकडून रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तिला औषधे घेण्यास सांगण्यात आले. परंतु, गोळ्या घेऊनदेखील काहीही फरक पडला नाही, असे पॉपीने सांगितले. ती दोन आठवड्यांनंतर तिच्या डॉक्टरांकडे परत गेली. पॉपीने ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडसह अनेक चाचण्या केल्या, असे ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तात सांगण्यात आले.

टिकटॉकर महिला पॉपी हिने सोशल मीडियावर आपला वेदनादायी अनुभव सांगितला, ज्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

स्कॅनमध्ये तिच्या अंडाशयांवर लहान सिस्ट म्हणजेच गाठी आढळल्या, ज्यामुळे मासिक पाळीत अनियमित रक्तस्त्राव होऊ शकतो. “माझ्या शरीरातील आयरनची पातळी घसरली आहे, मला ओटीपोटात असहाय्य वेदना होतात, माझे सर्व स्नायू दुखतात, माझी हाडे दुखतात, मला सतत डोकेदुखी आणि मळमळ होते,” असे तिने सांगितले. अखेर तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) असल्याचे निदान झाले. परंतु, डॉक्टरांनी स्पष्ट केले की, तिच्या सतत होणाऱ्या रक्तस्त्रावाचे कारण तिच्या अंडाशयांवर असलेल्या गाठी नाहीत. जेव्हा डॉक्टरांनी ही माहिती मला दिली तेव्हा माझी पाळी सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला होता असे तिने सांगितले.

अनेक तपासण्या करून डॉक्टरही हैराण

डॉक्टरांनी पॉपीची हिस्टेरोस्कोपी केली, ही स्कॅन करणारी एक प्रक्रिया आहे, ज्यात कॅमेरा असलेली एक पातळ नळी योनी आणि गर्भाशयात टाकली जाते. या तपासणीत डॉक्टरांना पॉलीप्स आढळले. पॉलीप्स हे शरीरातील काही ऊतींच्या असामान्य वाढीमुळे तयार होणारे छोटे गाठीसारखे प्रकार आहेत. डॉक्टरांनी असा अंदाज वर्तवला की, हेदेखील रक्तस्त्राव होण्याचे कारण असू शकते. परंतु, आठ महिन्यांचा कालावधी होऊनदेखील पॉपीची मासिक पाळी अजूनही थांबली नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी पॉलीप्स या कारणामुळे रक्तस्त्राव होत असल्याचेदेखील नाकारले.

सध्या पॉपी ही व्हीलचेअरचा वापर करते, कारण तिचे शरीर अशक्त झाले आहे. डॉक्टरांना याचा छडा लागला नाही, त्यामुळे त्यांनी तिला दुसऱ्या एका तज्ज्ञाकडे पाठवले. त्यांनी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तिच्या गर्भाशयात इंट्रा-यूटरिन डिव्हाइस (आययूटी) टाकले. एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला, मात्र तिचा रक्तस्त्राव थांबला नव्हता. डॉक्टरही तिच्या या स्थितीमुळे गोंधळात पडले होते. एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला होता, मात्र मला रक्तस्त्राव का होत आहे हे कोणालाही माहिती नव्हते. मी सर्व चाचण्या, उपचार, प्रत्येक औषधोपचार केले, असे पॉपी म्हणाली. पॉपीने औषधे चालू ठेवली. कोणतीही औषधे काम करत नसल्याने त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला. पॉपीने सांगितले, या संपूर्ण परिस्थितीत माझ्या मानसिक आरोग्यावर माझ्या शारीरिक आरोग्याइतकाच मोठा परिणाम झाला आहे. मला अनेकदा मरणाचादेखील विचार आला आहे.

आजार कसा उलगडला? महिलांमध्ये उद्भवणारी ही स्थिती काय?

रक्तस्त्राव झाल्याच्या ९५० व्या दिवशी पॉपीला तिच्या या स्थितीचे कारण कळले. एका डॉक्टरांनी तिला सांगितले की, तिच्या न थांबणाऱ्या मासिक पाळीचे कारण तिचे बायकोर्न्युएट गर्भाशय असू शकते. त्याला हृदयाच्या आकाराचे गर्भाशय असेही म्हटले जाते. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार गर्भाशयाचा आकार सहसा उलट्या नाशपाती फळासारखा असतो. काही प्रमाणात हे गर्भाशय हृदयासारखे दिसते.

प्रसूती/स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. डिम्पना वेइल यांनी ‘डेलीमेल डॉट कॉम’शी बोलताना सांगितले की, “यामुळे महिलांना दीर्घकाळ रक्तस्त्राव होऊ शकतो, याचा अंडाशयाच्या कार्यावर परिणाम होत नाही. परंतु, बायकोर्न्युएट गर्भाशयात एंडोमेट्रिओसिस स्थिती उद्भवते. ही अशी स्थिती आहे, जिथे गर्भाशयाच्या आवरणावरील पेशी दरमहा वाढतात आणि बाहेर पडतात. या प्रक्रियेमुळे किंवा हार्मोनल बदलांमुळे तुम्हाला असामान्य रक्तस्त्रावाचा त्रास होऊ शकतो,” असे त्या म्हणाल्या.

बायकोर्न्युएट गर्भाशय म्हणजे काय?

बायकोर्न्युएट गर्भाशय अत्यंत दुर्मीळ आहे. ही स्थिती केवळ पाच टक्के महिलांमध्ये दिसून येते. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’ने दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिलांना गर्भधारणा होईपर्यंत किंवा अनेकांना गर्भपात होईपर्यंत या स्थितीविषयी कळत नाही. बायकोर्न्युएट गर्भाशय असलेल्या अनेकांना कोणतीही वेगळी लक्षणे दिसून येत नाही; तर काहींना मासिक पाळीत वेदना, शारीरिक संबंध प्रस्थापित करताना त्रास, योनीतून अनियमित रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना जाणवू शकतात.

“हृदयाच्या आकाराच्या या गर्भाशयामुळे खूप समस्या उद्भवू शकतात,” असे पॉपीने सांगितले. तिने सांगितले की, तिच्या पहिल्या अल्ट्रासाऊंडमध्ये तिची स्थिती आढळून आली होती. परंतु, कोणीही तिला याविषयी सांगितले नाही. “मी ९५० दिवस अत्यंत वेदनांमध्ये घालवले आहेत, माझे आयुष्यभराचे पैसे मासिक पाळीच्या पॅड आणि मासिक पाळीच्या उत्पादनांवर खर्च झाले आहेत.” पॉपीला अखेर या समस्येचे कारण कळले असून, ती शस्त्रक्रिया करण्याचा विचार करत आहे.