अटलांटिक समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजाची पाहणी करायला गेलेली टायटन ही पाणबुडी दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या पाणबुडीत पाकिस्तानमधील अब्जाधीश पिता-पुत्र आणि ब्रिटनमधील एक उद्योजक यांच्यासह एकूण पाच जण होते. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ९६ तास पुरेल एवढाच प्राणवायू या पाणबुडीत आहे. याच पार्श्वभूमीवर पाणबुडीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र या शोधमोहिमेदरम्यान अनेक निसर्गनिर्मित अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी नेमक्या काय आहेत? समुद्रात शोधमोहीम राबवणे का अवघड असते? टायटन पाणबुडीचा संपर्क नेमका कधी तुटला? या सर्व बाबी जाणून घेऊ या…
अटलांटिक समुद्रात नेमके काय घडले?
अटलांटिक समुद्रात बुडालेले टायटॅनिक जहाज हे कायम जगभरातील लोकांच्या तसेच शास्त्रांच्या कुतूहलाचा विषय राहिलेले आहे. हे जहाज नेमके का बुडाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत अनेक संशोधकांनी केला आहे. त्यासाठी आतापर्यंत अनेक शोधमोहिमा राबवण्यात आलेल्या आहेत. याच टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी ओशनगेट या कंपनीकडून शोधमोहिमा राबवल्या जातात. तसेच भरमसाट पैसे देऊन टायटॅनिक जहाज पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनाही या शोधमोहिमेत स्थान दिले जाते. अशाच एका मोहिमेला रविवारी सकाळी ६ वाजता सुरुवात करण्यात आली. त्यासाठी टायटन या पाणबुडीत पाणबुडीचे पायलट, ब्रिटिश नागरिक हॅमिश हार्डिंग, पाकिस्तानमधील अब्जाधीश शहजादा दाऊद, त्यांचे पुत्र सुलेमान असे एकूण पाच जणांनी प्रवास सुरू केला . मात्र या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या एक तास ४५ मिनिटांत या पाणबुडीशी संपर्क तुटला. तेव्हापासून ही पाणबुडी बेपत्ता आहे.
पाणबुडीचा शोध घेण्यात अनेक अडचणी
टायटन या पाणबुडीत असलेल्या पाच जणांचा शोध घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. समुद्रात शोधमोहीम राबवायची असल्यास समुद्राचे पाणी, हवामानाची स्थिती या बाबी अनुकूल असणे गरजेचे असते. यासह समुद्राच्या तळाशी प्रकाश नसतो, त्यामुळे शोधमोहीम राबवण्यास अडचणी येतात. पाण्यातून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांवर एक विशेष उपकरण लावलेले असते. या उपकरणाला ‘पिंजर’ असे म्हटले जाते. कोणतीही दुर्घटना झाल्यास हे उपकरण एक विशेष आवाज करते. या आवाजाच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त जहाज तसेच अन्य कोणत्याही वाहनाचा शोध घेतला जातो. मात्र ‘टायटन’ या पाणबुडीमध्ये हे उपकरण लावलेले होते, की नाही याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. ‘टायटन’ पाणबुडीत पिंजर हे उपकरण नसल्यास शोधकर्त्यांना शोधमोहीम राबवणे जिकिरीचे होऊ शकते.
पाणबुडीशी संपर्क का तुटला? कारण काय?
टायटन पाणबुडीशी संपर्क नेमका का तुटला? याचे नेमके कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र त्याची अनेक कारणे असू शकतात. टायटन पाणबुडीतील संपर्क यंत्रणेत बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पाण्यात झेप घेण्यास तसेच पाण्याच्या बाहेर येण्यास मदत करणाऱ्या पाणबुडीतील यंत्रणेतही बिघाड झालेला असू शकतो. पाणबुडीत बिघाड झाल्यामुळे तिची पाण्यातील अन्य घटकांशी टक्कर झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
समुद्राच्या तळाला फक्त अंधार!
ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी सापडल्यास तिच्यातील माणसांना रेस्क्यू करणे फार जिकिरीचे होणार आहे. समुद्रात बचावकार्य करायचे असल्यास शोधकर्त्यांना विशेष उपकरण पुरवण्यात येते. समुद्रात खोलवर गेल्यानंतर श्वास घेण्यासाठी यात हेलियम या वायूचे मिश्रण असलेला प्राणवायू असतो. असे असले तरी माणूस समुद्राच्या फार खोल जाऊ शकत नाही. समुद्राच्या खोलवर सूर्याची किरणे पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे समुद्राच्या खोलवर फक्त अंधार असतो. याच कारणामुळे माणसाला समुद्राच्या खूप खोल जाऊन बचावकार्य करता येत नाही. टायटॅनिक जहाजाचे अवशेष हे अटलांटिक समुद्राच्या तळाशी साधारण १४ हजार फूट खोल आहेत. त्यामुळे माणसांना येथे फक्त पाणबुडीच्या मदतीनेच जाता येते.
मानवरहित वाहनांच्या मदतीने घेतला जाऊ शकतो शोध
‘टायटन’ ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी असेल असल्यास तिचा शोध फक्त मानवरहित वाहनाच्या मदतीनेच घेतला जाऊ शकतो. अमेरिकन नौदलाकडे अशा प्रकारची मानवविरहित पाणबुडी आहे. मात्र ही पाणबुडी समुद्रात फक्त दोन हजार फूट खोल जाऊ शकते. समुद्राच्या तळाशी असलेल्या गोष्टींचा तसेच अवशेषांचा शोध घेण्यासाठी अमेरिकन नौदल रिमोटच्या मदतीने चालणाऱ्या वाहनांची मदत घेते. २०२२ साली एफ-३५ हे लढाऊ विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळले होते. या विमानाचे अवशेष समुद्रात साधारण १२ हजार ४०० फूट खोल होते. तेव्हा अमेरिकन नौदलाने अशाच एका CURV-२१ या रिमोटच्या मदतीने चालवता येणाऱ्या वाहनाचा वापर केला होता. हे वाहन पाण्यात २० हजार फूट खोल जाऊ शकते. त्यामुळे ‘टायटन’ या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी अशा यंत्रणांची आणि वाहनांची मदत घेतली जाऊ शकते.
मानवरहित वाहन घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडचणी
CURV-२१ सारख्या वाहनाच्या मदतीने समुद्रातील तळाशी असलेल्या अवशेषांचा शोध घेता येतो. मात्र अशी वाहने घटनास्थळी घेऊन जाण्यास विलंब लागतो. अशी वाहने घटनास्थळी घेऊन जाण्यासाठी विशिष्ट जहाजाची मदत लागते. अशा विशेष जहाजाचा शोध घेण्यापासून तर संबंधित यंत्र घटनास्थळापर्यंत घेऊन जाईपर्यंत बराच वेळा जातो. टायटॅनिक जहाजाचे अवशेष न्यूफाउंडलॅण्डच्या दक्षिणेच्या साधारण ३७० मैल अंतरावर आहेत. त्यामुळे या भागात CURV-२१ सारखे वाहन घेऊन जाण्यास वेळ लागणार आहे. हे वाहन घेऊन जाणारे जहाज २० किलोमीटर प्रति तास वेगाने चालते.
पाणबुडीत फक्त ९५ तासांसाठी प्राणवायू
ओशनगेट या संकेतस्थळावरील माहितीनुसार ‘टायटन’ या पाणबुडीत ९६ तास पुरेल एवढाच प्राणवायू (ऑक्सिजन) आहे. अनेक पाणबुड्यांत हवेचा पुनर्वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये पाणबुडीत उपलब्ध असलेल्या हवेतून कार्बन डायऑक्साइड काढून टाकला जातो. मात्र कालांतराने पाणबुडीतील यंत्रणेची हवेवर प्रक्रिया करण्याची क्षमता कमी होते. परिणामी पाणबुडीत ऑक्सिजनची कमतरता भासायला लागते आणि पाणबुडीतील व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो.
…तर त्या पाच जणांचा मृत्यू?
पाण्यात असल्यामुळे ‘टायटन’ पाणबुडीतील बॅटरीज खराब होऊ शकतात. परिणामी खोल पाण्यात पाणबुडीतील प्रवाशांना ऊब देणारी यंत्रणा खराब होऊ शकते. याच कारणामुळे पाणबुडीतील प्रवासी जिवंत राहणे अवघड होऊ शकते. त्यामुळे पाणबुडीतील ऑक्सिजन कमी होण्याआधी तसेच पाणबुडीतील यंत्रणा निकामी होण्याआधी त्यांचा शोध घेण्यात यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.