या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरएमएस टायटॅनिक हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सिनेमाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या या जहाजाचा करुण अंत हा १५ एप्रिल १९१२ रोजी झाला. या अंताची काहणी ही १० एप्रिल १९१२ रोजी सुरू झाली होती. टायटॅनिक हे त्याकाळचे जगातील सर्वात मोठे व समृद्ध जहाज होते. व्हाईट स्टार लाइन या शिपिंग कंपनीने तयार केलेल्या तीन भगिनी जहाजांपैकी ते एक वाफेवर चालणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. व्हाईट स्टार लाइन यांनी तयार केलेल्या तत्कालीन तीन मोठ्या जहाजांमध्ये टायटॅनिक, ऑलिम्पिक आणि ब्रिटानिकचा समावेश होत होता. टायटॅनिकला उत्तर अटलांटिक सागरातील सर्वात विलासी जहाजाचा दर्जा देण्यात आला होता. हे जहाज ५२,३१० टन वजनाचे होते. टायटॅनिक २६० मीटर लांब व ५० मीटर उंच जहाज असे होते. या जहाजाच्या बांधणीत ७.५ मिलियन डॉलरचा खर्च त्यावेळी आला होता. त्यावेळचे ७.५ मिलियन डॉलर म्हणजे आत्ताचे ४०० मिलियन डॉलर्स होय. या जहाजाचा दिमाख पंचतारांकित हॉटेल सारखा होता. प्रवाशांना जिम, प्लंज पूल, टर्किश बाथ, बार्बर शॉप, इलेक्ट्रिक लिफ्ट्स, लायब्ररी, रेस्टॉरंट आणि कॅफे यासह इतर सुविधांचा आनंद घेण्याची सोय या जहाजात करण्यात आली होती.

आणखी वाचा: Happy Birthday Barbie: बार्बी म्हणते, अवघे ६३ वयोमान; अमेरिकन बार्बी होती ‘मेड इन जपान’!

आरएमएस टायटॅनिकने १० एप्रिल १९१२ रोजी साउथहॅम्प्टन, इंग्लंड येथून न्यूयॉर्क शहरापर्यंतच्या पहिल्या प्रवासास सुरुवात केली होती. जहाज कंपनीने जाहिरात केल्याप्रमाणे आकारमानामुळे हे जहाज कधीही बुडणार नव्हते. परंतु प्रवासाला सुरुवात केल्यानंतर चारच दिवसात या जहाजाला जलसमाधी मिळाली. बडे राजकारणी आणि कलाकारांपासून ते सामान्य प्रवाशांपर्यंत अनेकजण या जहाजाने प्रवास करत होते. ६२ वर्षीय एडव्हर्ड जॉन स्मिथ यांनी या जहाजाची धुरा सांभाळली होती. विशेष म्हणजे जहाजाला वाचवता न आल्याने त्यांनीही या जहाजासोबत जलसमाधी स्वीकारल्याचे सांगितले जाते. काहींच्या मते त्यांनी जहाज बुडत असताना गोळी घालून आत्महत्या केली. १४ एप्रिल १९१२ रोजी रात्री ११.४० वाजता हे जहाज एका हिमखंडावर आदळले, तीन तासांपेक्षा कमी कालावधीतच १५ एप्रिल रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी जहाज बुडाले आणि जहाजाच्या २२२३ प्रवाशांपैकी १५१७ जणांचा मृत्यू झाला.

जहाज नक्की का बुडले ?

१२ एप्रिल १९१२ रोजी प्रवास सुरू केल्यापासून दोन दिवसातच या जहाजाला पहिली आईस वॉर्निंग (हिमनगाच्या समुद्रातील अस्तित्त्वाचा इशारा ) मिळाली होती. ज्या अटलांटिक सागरातून हे जहाज जात होते, त्या सागरात बर्फाचे मोठ डोंगर अस्तित्त्वात होते, त्यांना हिमनग वा ‘आईसबर्ग’ असे म्हटले जाते. या बर्फाच्या डोंगरांचा अडथळा पार करण्यासाठी समुद्रातून जाणारी जहाजे नेहमीच आपल्या आजूबाजूच्या जहाजांना रेडिओच्या मध्यमातून संपर्क साधत असत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यास मदत होईल. अशाच प्रकारचा सावधतेचा इशारा अटलांटिक सागरातून त्यावेळी जाणाऱ्या काही जहाजांनी आरएमएस टायटॅनिकला दिला होता.

हे वॉर्निंग सिग्नलस मिळताच टायटॅनिकने दोनदा आपली दिशा बदलली होती. परंतु वेग मात्र कमी केला नव्हता. १४ एप्रिल २०१२ मध्ये या जहाजाला सात वेळा वॉर्निंग सिग्नल्स मिळाले. परंतु टायटॅनिक कधी बुडूच शकत नाही अशी खात्री असलेल्या जहाजाचे कॅप्टन एडव्हर्ड जॉन स्मिथ यांनी जहाजाचा वेग कमी केला नाही. १४ एप्रिलच्या रात्री आकाशात गडद काळोख होता. चंद्रदर्शनही झाले नव्हते, त्यामुळे रात्री गडद अंधारात ४० किमी वेगाने निघालेल्या जहाजाला लांब परंतु दृश्यमान असलेल्या हिमनगाचा अंदाज आला नाही. तो हिमनग जवळ येताच जहाजाच्या क्रोज नेट येथे बसलेल्या फेडरीक फ्लिट याने मोठ्या बर्फाच्या पर्वताची सूचना दिली. ही सूचना १४ तारखेला ११ वाजून ३९ मिनिटांनी देण्यात आली होती. यावेळी जहाज वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु उशीर झाल्याने ११ वाजून ४० मिनिटांनी म्हणजे अवघ्या एका मिनिटाच्या फरकाने जहाज हिमनगावर आदळले. त्यामुळे जहाजाला अनेक ठिकाणी हादरे बसले. ही घटनेनंतर जहाजाच्या कॅप्टन व आर्किटेक्ट यांनी पाहणी केली असता जहाज बुडणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जहाज व लोकांचे प्राण वाचविण्याकरता शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

आणखी वाचा : विश्लेषण : ॲरिस्टॉटल ते २१ वे शतक : कांद्याचा रोचक प्रवास

जवळून जाणाऱ्या इतर जहाजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आर एम एस कारपिथीय हे टायटॅनिकपासून १०७ किमी लांब अंतरावर होते. या जहाजाशी संपर्क करण्यात यश आले. परंतु हे जहाज घटनास्थळी पोहाचायला सुमारे ३ तास लागणार होते. त्यामुळे मदतीची शेवटची आस संपल्यात जमा होती. त्यावेळी लाईफ बोटींच्या माध्यमातून प्रवाशांना वाचविण्यास सुरुवात करण्यात आली. परंतु दुर्दैवाने अनेकांच्या अंधविश्वासामुळे पहिल्या लाईफ बोटीची क्षमता ६५ जणांची असूनही फक्त २८ प्रवासीच या बोटीत बसले ते सर्वच्या सर्व सुखरूप राहिले. शेवटची लाईफ बोट २ वाजून ५ मिनिटांनी उतरविण्यात आली, यावेळी जहाजावर १५०० प्रवासी होते. त्या सर्वांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Titanic tragedy what exactly happened on april 15 1912 svs
Show comments