भांडवलाची चणचण असलेल्या दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने वर्षाच्या सुरुवातीला, समभाग विक्री आणि रोखे विक्रीतून ४५,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळाने ११ एप्रिलला झालेल्या बैठकीत १८,००० कोटी रुपयांच्या सार्वजनिक समभाग विक्री प्रस्तावाला (एफपीओ) मंजुरी दिली. मात्र या निधी उभारणीतून कंपनी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या तगड्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यास आणि तिची बाजारपेठेतील स्थिती सुधारण्यास आवश्यक बळ मिळेल का, शिवाय हा एफपीओ गुंतवणूकदारांसाठी कसा आहे, हे जाणून घेऊया.

व्होडाफोन-आयडिया एफपीओ कधीपासून?

व्होडाफोन-आयडिया लिमिटेडने फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून १८,००० कोटी रुपये उभारण्याची घोषणा केली असून यासाठी प्रति समभाग १० ते ११ रुपये किमतीपट्टा निश्चित केला आहे. ही समभाग विक्री १८ एप्रिलपासून सुरू होत असून, २२ एप्रिलपर्यंत सुरू राहील. शुक्रवारी कंपनीच्या एफपीओच्या घोषणेच्या परिणामी व्होडाफोन-आयडियाचा समभाग १२.९५ रुपयांवर दिवसअखेर स्थिरावला होता. त्या तुलनेत प्रत्येकी १० रुपये ते ११ रुपये निश्चित करण्यात आलेली विक्री किंमत ही गुंतवणूकदारांना १५ टक्के सूट देणारी आहे.

portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
stock market investment tips for Indians
बाजार रंग : बाजारासाठी अडथळ्यांची शर्यत

हेही वाचा – जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 

निधी उभारणीची गरज का?

खूप विलंबाने ५जी सेवांचे दालन खुले करणाऱ्या व्होडाफोन-आयडियाची ग्राहकसंख्या महिनागणिक घटत चालली आहे. कंपनीवर एकंदर २.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज आणि दर तिमाहीगणिक वाढत असलेल्या तोट्याने ग्रासले आहे. जानेवारी २०२४ मध्ये १५.२ लाख ग्राहक गमावत, कंपनीची एकूण ग्राहक संख्या २२.१५ कोटीपर्यंत घटली आहे. याउलट प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ग्राहक संख्येत तिमाहीगणिक वाढ होते आहे. सरलेल्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने ६,९८६ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता.

निधीचे प्रयोजन काय?

फॉलो-ऑन पब्लिक ऑफरमधून उभारलेले १८,००० कोटी रुपयांचे भांडवल नवीन ५जी नेटवर्क उभारण्यासाठी आणि त्यांच्या ४जी नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी केला जाणार आहे. तसेच ध्वनिलहरी खरेदीचा हप्ता चुकता करण्याची योजना आहे, असे कंपनीने भांडवली बाजार नियामक सेबीकडे दिलेल्या त्यांच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अर्थात मसुदा प्रस्तावात म्हटले आहे. मसुदा प्रस्तावानुसार,  विद्यमान ४जी क्षमतेचा विस्तार करून काही ठिकाणी नव्याने प्रवेश केला जाणार आहे. शिवाय नवीन ५जी नेटवर्क उभारून  पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी १२,७५० कोटी रुपये वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. ५जी नेटवर्क विस्तारासाठी राखून ठेवलेल्या १२,७५० कोटी रुपयांपैकी ५,७२० कोटी रुपये खर्च करेल. तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २,६०० कोटी रुपये खर्च करून १०,००० नवीन ठिकाणी ५जी नेटवर्क उभारण्याची योजना आहे. तसेच ३,१२० कोटी रुपयांच्या निधीतून आणखी १२,००० ठिकाणी ५जी नेटवर्कचा विस्तार होईल. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दाव्यानुसार, पुढील दोन वर्षात महिन्यांत ५जी सेवांच्या माध्यमातून एकूण महसुलापैकी ४० टक्के त्यातून मिळवण्याचा प्रयत्न असेल. निधी उभारणीनंतर ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीत निवडक ठिकाणी ५जी सेवा सुरू करणार आहे. विश्लेषकांच्या मते, १८,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीमुळे व्होडाफोन-आयडियाची प्रतिस्पर्धी दूरसंचार कंपन्यांसह स्पर्धात्मकता काही प्रमाणात सुधारेल आणि बँक कर्जामध्ये देखील घट होईल, ज्यामुळे बँकांकडून आणखी निधी मिळण्याची आशा आहे. तरीही, कंपनीला अल्पावधीत प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून मोठा बाजार हिस्सा मिळवण्याची शक्यता कमीच आहे.

सुकाणू गुंतवणूकदारांकडून प्रतिसाद कसा?

व्होडाफोन-आयडियाने ७४ सुकाणू गुंतवणूकदारांकडून (अँकर इन्व्हेस्टर) ५,४०० कोटी रुपयांची उभारणी केली आहे. या गुंतवणूकदारांमध्ये जीक्यूजी पार्टनर्स, द मास्टर ट्रस्ट बँक ऑफ जपान, यूबीएस, मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स, ऑस्ट्रेलियन सुपर, फिडेलिटी, क्वांट आणि मोतीलाल ओसवाल यांचा समावेश आहे. व्होडा-आयडियाने ११ रुपये प्रति शेअर या दराने सुकाणू गुंतवणूकदारांना ४९१ कोटी शेअरचे वाटप केले. शेअरची सर्वाधिक संख्या म्हणजेच सुकाणू गुंतवणूकदारांना वाटप केलेल्या एकूण शेअरपैकी २६ टक्के अमेरिकेतील जीक्यूजी पार्टनर्सला दिले आहेत. या शेअरची किंमत १,३४५ कोटी रुपये आहे. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटने या फॉलो अप पब्लिक ऑफरमध्ये (एफपीओ) सुमारे ७७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर ट्रू कॅपिटल आणि ऑस्ट्रेलियन सुपर देखील अनुक्रमे ३३१ कोटी आणि १३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सुकाणू गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागापैकी ८७४ कोटी रुपये मूल्याचे म्हणजेच सुमारे १६.२ समभाग पाच देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी खरेदी केले आहेत. ज्यामध्ये मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाने ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा – गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?

एफपीओसाठी अर्ज करावा का?

निधी उभारणीमुळे व्होडाफोन-आयडियाला नेटवर्कसंबंधित पायाभूत सुविधा मजबूत करण्यास मदत मिळणार आहे. मात्र, कंपनीला आर्थिक आघाडीवर अनेक आव्हाने आहेत. स्पर्धकांच्या तुलनेत व्होडाफोन-आयडियाने त्यांच्या ग्राहकसंख्येत सातत्याने घट अनुभवली आहे. वर्ष २०२६ मध्ये संभाव्य आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. कारण त्यावेळी, व्होडाफोन-आयडियाला सुमारे ४ अब्ज डॉलरची ध्वनिलहरी आणि समायोजित सकल महसूल (एजीआर) देय असेल. परिणामी व्होडाफोन-आयडियाचा नजीकच्या काळात पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग अनिश्चित दिसतो आहे, असे स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टच्या मालमत्ता व्यवस्थापन प्रमुख शिवानी न्याती म्हणाल्या. सीएनआय रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक किशोर ओस्तवाल म्हणाले, व्होडाफोन-आयडियाच्या शेअरमधून गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या भरीव परताव्याबाबत साशंक आहेत. कंपनीकडे ५जी नेटवर्कच्या विस्तारासाठी आणि भविष्यात येऊ पाहणाऱ्या ६जी तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी निधीची कमतरता आहे. तांत्रिकदृष्ट्या शेअर अतिशय अस्थिर असल्याने २० ते ३० टक्के परताव्यासाठी उच्च जोखीम घेऊ इच्छिणारे समभाग खरेदीसाठी करू शकतात. मात्र मूलभूत दृष्ट्या (फंडामेंटल) अभ्यास केल्यास, अधिक चांगलला परतावा मिळू शकणारे अनेक चांगले पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एफपीओमध्ये गुंतवणूक टाळावी. कंपनीमध्ये सरकारची  ३२.१९ टक्के हिस्सेदारी आहे. ती विकण्यासाठी देखील सरकारला मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. कंपनीच्या संचालक मंडळाने देखील कंपनीकडे पैसे नसल्याचे म्हटले होते. तोट्यात चालवण्यापेक्षा कंपनीचे कामकाज गुंडाळले बरे असे वक्तव्य केले होते. कंपनीची अशी वक्तव्ये भागधारकांच्या हिताच्या अगदी विरुद्ध आहेत.

कंपनीची पडती बाजू काय?

व्होडाफोन-आयडियाने मागील एका वर्षात १.७ कोटी वायरलेस ग्राहक गमावले आहेत, त्यापैकी १० लाख ग्राहक फक्त जानेवारी २०२४ मध्ये गमावले आहेत. तुलनेने, रिलायन्स जिओने जानेवारी २०२४ मध्ये सुमारे ४२ लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडले, तर भारती एअरटेलने ७.५ लाख ग्राहक जोडले, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात व्होडाफोन-आयडियाकडून लक्षणीय बाजारहिस्सा मिळवण्याच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. सरकारची हिस्सेदारी देखील ८० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये व्होडा-आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये २४.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर याच कालावधीत एअरटेलचा शेअर २०.९० टक्क्यांनी वधारला आहे. सीएलएसएमधील विश्लेषकांच्या मते, ग्राहकांच्या संख्येतील गळती सुरू राहिल्यास, व्होडाफोन-आयडियाचे शेअर सध्याच्या बाजारभावापासून आणखी ६१ टक्क्यांनी घसरून ५ रुपयांवर येऊ शकतात. नोमुराने देखील शेअरची किंमत ६.५ रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त करत मानांकन कमी केले आहे.

gaurav.muthe@expressindia.com

Story img Loader