रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील अनेक व्यवसायांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे विपरीत परिणाम झाले आहेत. कच्च्या मालाची पुरवठा साखळी खंडित झाल्याने कारखाना किंवा उद्योगांमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यामध्ये आता टॉयलेट पेपरचीही भर पडली आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे जगभरात टॉयलेट पेपरच्या किंमती गगनाला भीडत आहेत.
टॉयलेट पेपरची निर्मिती कशी होते?
टॉयलेट पेपरची निर्मिती करण्यासाठी ‘बर्च’ (Birch) नावाच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो. या झाडाच्या लाकडात लहान तंतू असतात. ज्याचा वापर सॅनिटरी उत्पादनं मऊ बनवण्यासाठी केला जातो. ‘बर्च’ झाडाची आयात प्रामुख्याने रशियातून केली जाते. पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंधं लादले आहेत. बर्चच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून जगभरात टॉयलेट पेपरच्या किमती वाढत चालल्या आहेत.
टॉयलेट पेपरची पुरवठा साखळी खंडित होणं, हे नवीन संकट आहे. याआधी करोना साथीच्या काळात अनेक प्रकारच्या वस्तुंची पुरवठा साखळी खंडित झाली होती. बंदरांमधून जहाजांची वाहतूक ठप्प झाल्याने टॉयलेट पेपर बनवणाऱ्या लाकडाच्या तंतूंचा जागतिक पुरवठाही विस्कळीत झाला होता.
बर्च लाकडाच्या निर्यातीवर बंदी
पण आता रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने अमेरिकेसह युरोपीय संघाने रशियावर विविध प्रकारची निर्बंधं लादली आहेत. यामध्ये बर्च लाकडाचाही समावेश आहे. मार्चपासून बर्च लाकडाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परिणामी, सुमारे ८ लक्ष ते १.२ दशलक्ष मेट्रिक टन कागदाचा पुरवठा अचानक खंडित झाला आहे. गेल्या वर्षभरात टॉयलेट पेपर तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत ४५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच टॉयलेट पेपर उत्पादक कंपन्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी तीव्र स्पर्धा करावी लागत आहे.
युरोपीय देशांमधील लगदा उत्पादन
हेलसिंकी येथील पीटीटी संशोधन संस्थेच्या संचालक पॉला हॉर्न यांच्या मते, टॉयलेट पेपर निर्मितीसाठी आवश्यक असणारे लाकूड आयात करण्यासाठी परदेशातून कोणतीही सवलत मिळत नाही. युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार, युरोपमध्ये टॉयलेट पेपर किंवा टिश्यूजसारख्या सॅनिटरी उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लगद्याचं स्वीडनमध्ये सर्वाधिक उत्पादन केलं जातं. स्वीडननंतर फिनलँडमध्ये याचं सर्वाधिक उत्पादन होतं. असं असलं तरी फिनलँडमधील लगदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे १० टक्के लाकूड रशियामधून आयात करावं लागत होतं.
हेही वाचा- विश्लेषण : तापमान वाढीमुळे कोणत्या पाच देशांचे भविष्य अंधःकारमय? उर्वरित जगासाठी कोणता इशारा?
आता रशियातील बर्च लाकडाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जागतिक स्तरावर लगद्याचा पुरवठा मर्यादित झाला आहे. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला फिनलँडमध्ये कामगारांनी संप पुकारला होता. दरम्यान, तीन महिन्यांहून अधिक काळ काम बंद राहिल्याने लगदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे दुष्काळजन्य स्थितीमुळे स्पेनमधील लगदा उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. या वर्षी सप्टेंबरपर्यंत जागतिक बाजारपेठेत १.४ दशलक्ष टनांहून अधिक लगद्याचं कमी उत्पादन झालं आहे.
२०२३ च्या उत्तरार्धापर्यंत लगद्याचा तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे. चिली आणि उरुग्वे येथे लगदा निर्मिती केंद्र उभारण्याचं काम सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत येथे उत्पादन घ्यायला सुरुवात होईल, यानंतरच जागतिक बाजापेठेत लगद्याच्या किमती आवाक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे युरोपमधील लगदा ग्राहक सध्या चिंतेत आहे.