नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे नागपूर – इगतपुरी प्रवास अतिजलद झाला. जलद प्रवासासाठी चारचाकी वाहनांना १०८० रुपये एकेरी पथकर (टोल) मोजावा लागत आहे. पण १ एप्रिलपासून या पथकरात मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली असून नवीन पथकर दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. ही पथकर वाढ नेमकी कशी आहे आणि त्यामुळे वाहनचालक – प्रवाशांच्या खिशाला कशी कात्री लागणार याचा हा आढावा…
समृद्धी महामार्ग नेमका कसा?
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी, तसेच प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई – नागपूर दरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून समृद्धी महामार्गाची बांधणी करण्यात येत आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला २०१९ पासून सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत ७०१ किमीपैकी ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता लवकरच, एप्रिलमध्ये ७६ किमी लांबीचा शेवटचा इगतपुरी – आमणे (ठाणे) टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर – आमणे, भिवंडी असा प्रवास केवळ आठ तासांत करणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाची भाग्यरेषा मानली जाते. या प्रकल्पामुळे राज्याचा आर्थिक, औद्योगिक विकास साधला जाईल, असा दावा करण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्हे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्यासाठी समृद्धी महामार्गाचा नांदेड – जालना, गडचिरोली – भंडारा, नागपूर – गोंदिया आणि नागपूर – चंद्रपूर असा विस्तार करण्यात येणार आहे. आता कोकणही समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे.
अतिजलद प्रवासासाठी टोल
एकूण ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी सुमारे ५५ हजार कोटी रुपय खर्च आला. खर्चासाठी लागणारा मोठा निधी कर्जरूपाने उभारण्यात आला आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी समृद्धी महामार्गावर पथकर (टोल) आकारण्यात येत आहे. प्रति किमीप्रमाणे पथकराचा दर निश्चित करण्यात आला असून जितका किमी प्रवास तितका पथकर या नियमानुसार तो निश्चित करण्यात आला आहे. चारचाकी – हलक्या वाहनांसाठी प्रति किमी १.७३ रुपये, मिनी बस-हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी प्रति किमी २.७९ रुपये, बस- ट्रकसाठी प्रति किमी ५.८५ रुपये, तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी प्रति किमी ६.३८ रुपये, अवजड वाहनांसाठी प्रति किमी ९.१८ रुपये आणि अति अवजड वाहनांसाठी प्रति किमी ११.१७ रुपये असा पथकर ११ डिसेंबर २०२२ पासून लागू झाला आहे. या पथकरानुसार आज नागपूर – इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना १०८० रुपये पथकर मोजावा लागतो. तर अतिअवजड वाहनांसाठी ६९७० रुपये पथकर भरावा लागत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीपर्यंत १ कोटी ७० लाखांहून अधिक वाहने धावली. या वाहनांकडून फेब्रुवारीपर्यंत १२०० कोटी रुपयांहून अधिक पथकर वसूल करण्यात आला. आता एमएसआरडीसीने पथकरात वाढ केली आहे. पथकरात तब्बल १९ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार आहे.
पथकरात १९ टक्क्यांची वाढ?
समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ पासून लागू असलेले पथकराचे दर ३१ मार्च २०२५ पर्यंतच होते. त्यानंतर पथकरात वाढ केली जाणार होती. त्यानुसार एमएसआरडीसीने २० मार्च रोजी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करून पथकराचे नवीन दर जाहीर केले. त्यानुसार पथकरात थेट १९ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नवीन पथकरानुसार आता चारचाकी- हलक्या वाहनांसाठी प्रति किमी १.७३ रुपयांऐवजी प्रति किमी २.०६ रुपये, मिनी बस-हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी प्रति किमी २.७९ रुपयांऐवजी प्रति किमी ३.३२ रुपये बस- ट्रकसाठी प्रति किमी ५.८५ रुपयांऐवजी प्रति किमी ६.९७ रुपये, तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी प्रति किमी ६.३८ रुपयांऐवजी प्रति किमी ७.६० रुपये , अवजड वाहनांसाठी प्रति किमी ९.१८ रुपयांऐवजी प्रति किमी १०.९३ रुपये आणि अति अवजड वाहनांसाठी प्रति किमी ११.१७ रुपयांऐवजी प्रति किमी १३.३० रुपये असे दर लागू करण्यात आले आहे. मोठी पथकर वाढ झाल्याने वाहनचालक-प्रवाशांमध्ये नक्कीच नाराजी असेल.
नवीन पथकर केव्हापासून लागू?
एमएसआरडीसीच्या पथकर दरवाढीच्या जाहीर निवेदनानुसार १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे समृद्धीवरील प्रवास महागणार आहेच. पण त्याचवेळी १ एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक असणार आहे. त्यामुळे फास्टॅग नसल्यास दुप्पट पथकर वसुली समृद्धीवर केली जाणार आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे १ एप्रिलपूर्वी फास्टॅग स्टिकर लावून घेणे आवश्यक असणार आहे. नवीन पथकर दर ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे १ एप्रिल २०२८ मध्ये पुन्हा पथकरात वाढ होणार हे नक्की.
टोल नक्की किती?
नागपूर – इगतपुरी दरम्यानचा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून नागपूर – इगतपुरी प्रवासासाठी नवीन पथकर लागू होणार आहे. त्यानुसार नागपूर – इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना १०८० रुपयांऐवजी १२९० रुपये, हलक्या व्यवासायिक, मिनी बससाठी १७४५ रुपयांऐवजी २०७५ रुपये पथकर मोजावा लागणार आहे. तर बस, दोन आसांच्या ट्रकसाठी ३६५५ रुपयांऐवजी ४३५५ रुपये आणि तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३९९० रुपयांऐवजी ४७५० रुपये पथकर लागेल. अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी ५७४० रुपयांऐवजी आता ६८३० रुपये, तर अतिअवजड वाहनांनासाठी ६९८० रुपयांऐवजी ८३१५ रुपये पथकर भरावा लागेल. त्याच वेळी इगतपुरी – आमणे टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. या टप्प्याचे लोकार्पण झाल्यास नागपूर – मुंबई अंतर केवळ आठ तासांत पार करता येणार आहे. मात्र या प्रवासासाठी वाहनचालक – प्रवाशांना १४४५ रुपये इतका (ऐकेरी प्रवास) पथकर मोजावा लागणार आहे. समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिजलद होत असला तरी तो महागडा ठरत आहे.
© The Indian Express (P) Ltd