इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात झाली. अनेक खेळाडू आपल्या कामगिरीने लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील असतील. पण, काही खेळाडूंवर या लीगमध्ये विशेष लक्ष राहील. गेल्या वर्षभरात भारताने दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यासह लय कायम राखण्यास उत्सुक असतील. जाणून घेऊया या खेळाडूंविषयी.
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु)
भारताचा तारांकित क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली ओळखला जातो. ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपद मिळवल्यानंतर विराटने या प्रारूपातून निवृत्ती घेतली होती. तर, नुकत्याच झालेल्या ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने भारतासाठी चांगली फलंदाजी केली. यावेळी संघाला जेतेपद मिळवून द्यायचे झाल्यास विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा संघाला असणार आहे. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात विराट हा चांगल्या लयीत होता. १५ सामन्यांतून त्याने ६१.७५च्या सरासरीने ७४१ धावा केल्या होत्या. यामध्ये पाच अर्धशतके व एका शतकाचा समावेश होता. विराटने आतापर्यंत खेळलेल्या २५२ ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये त्याने ८००४ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटचा लीगमधील हा अनुभव संघाला या हंगामात किती उपयोगी पडतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकात भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणारा शुभमन गिल ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. गेल्या हंगामात गुजरातला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदा गिलवर धावा करण्यासह संघाला ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचवण्याची मोठी जबाबदारी असेल. गेल्या हंगामात गिलने १२ सामन्यांतून ४२६ धावा केल्या होत्या. यामध्ये एका शतकाचा समावेश होता. त्याने २०१८मध्ये लीग खेळण्यास सुरुवात केल्यानंतर १०३ सामन्यांत ३२१६ धावा केल्या आहेत. यादरम्याने त्याने चार शतके झळकावली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही तो चांगल्या लयीत दिसला.
हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स)
गेल्या हंगामात मुंबईच्या संघाला तळाच्या स्थानावर राहावे लागले. यानंतर मुंबईची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्याला टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजयात त्याने आपले योगदान दिले. तसेच, नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडकातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यामुळे ‘आयसीसी’ जेतेपदासह पंड्या यावेळी हंगामात सहभागी होत आहे. त्यातच जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघात नसल्याने पंड्याची जबाबदारी आणखी वाढणार आहे. गेल्या हंगामात पंड्याने ११ बळी मिळवण्यासह २१६ धावा केल्या. त्यामुळे यंदा त्याला कामगिरी उंचवावी लागेल.
ऋषभ पंत (लखनऊ सुपर जायंट्स)
दिल्ली कॅपिटल्स संघाने करारमुक्त केल्यानंतर ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्स संघाने २७ कोटी रुपयांना संघात स्थान दिले. यानंतर त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची धुराही सोपविण्यात आली. गेल्या हंगामात पंतने १३ सामन्यांत ४०.५५च्या सरासरीने ४४६ धावा केल्या. यावेळी लखनऊला बाद फेरीत पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत तो संघात असला, तरीही अंतिम अकरामध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. त्यामुळे हा ’आयपीएल’ हंगाम त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.
वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाइट रायडर्स)
सध्या भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याच्या नावाची चर्चा सर्वत्र आहे. आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने भारताला निर्णायक विजय मिळवून दिले आहेत. वरुणने चॅम्पियन्स करंडकात खेळलेल्या तीन सामन्यांत नऊ बळी मिळवले. तर, त्याआधी इंग्लंडविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतही वरुणने ५ सामन्यांत तब्बल १४ गडी बाद केले. त्यामुळे वरुण हा चांगल्या लयीत असून कोलकाताच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. तसचे, गेल्या हंगामात कोलकाताच्या जेतेपदात वरुणचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्याने १५ सामन्यांत २१ बळी मिळवले होते. यंदाही त्याची भूमिका ही संघासाठी निर्णायक असेल.
ट्रॅव्हिस हेड (सनरायजर्स हैदराबाद)
आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या हंगामात आपल्या आक्रमक खेळीने त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या अडचणी वाढवल्या होत्या. यावेळीही तीच लय कायम राखण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. त्याने १५ सामन्यांत ५६७ धावा करीत संघाला गेल्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात निर्णायक भूमिका पार पाडली होती. त्यामुळे संघाला पुन्हा ‘प्लेऑफ’ पर्यंत मजल मारायची झाल्यास हेडची खेळी निर्णायक ठरेल.
कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या चांगल्या लयीत आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत कुलदीपने सात बळी मिळवले. तसेच, ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामातील ११ सामन्यांत १६ गडी बाद केले. त्यामुळे यावेळीही संघासाठी योगदान देण्यास तो प्रयत्नशील असेल. भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या पाहता कुलदीप त्याच्या संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडू शकतो. त्यातच आपल्या वेगळ्या गोलंदाजी शैलीमुळे तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यास सक्षम आहे.