ऑस्ट्रेलिया हा कोळसा आणि द्रवरुप नैसर्गिक वायूची निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. असं असूनही ऑस्ट्रेलियामध्ये सध्या विजेचं संकट घोंघावत आहे. गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे ऊर्जा मंत्री ख्रिस बोवेन यांनी न्यू साऊथ वेल्समधील नागरिकांना विजेचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं. नागरिकांनी इतर पर्यायी संसाधनाचा वापर केल्यास विजेचं संकट सहज टळू शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, देशात विजेचं संकट असताना ऑस्ट्रेलियन एनर्जी मार्केट ऑपरेटरने (AEMO) अभूतपूर्व हालचाली केल्या आहेत. एईएमओने ऑस्ट्रेलियाच्या सहा राज्यांपैकी पाच राज्यांचा समावेश असणाऱ्या ईस्ट कोस्टसाठी केली जाणारी घाऊक वीज विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वीज ग्राहकांना आणि व्यवसायांना वीज पुरवठा करणं पॉवर मार्केटला अशक्य होतं असल्याचं एईएमओनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यावरून ऑस्ट्रेलियात वीज संकट किती गंभीर बनत चाललं आहे, याचं चित्र स्पष्ट होते.

ऑस्ट्रेलियाची विद्युत व्यवस्था कशी कार्य करते?
ऑस्ट्रेलियन एनर्जी मार्केट ऑपरेटर (AEMO) च्या अखत्यारित दोन इलेक्ट्रिसीटी स्पॉट मार्केट आहेत. ज्याद्वारे देशभरात वीज पुरवठा केला जातो. देशात ६५ टक्के विजेची निर्मिती कोळशावर केली जाते. तर ७ टक्के वीज निर्मिती नैसर्गिक वायूद्वारे केली जाते. उर्वरित वीज पवनचक्की, सौर ऊर्जा, जलविद्युत आणि इतर अक्षय स्रोतांतून तयार केली जाते. नॅशनल इलेक्ट्रिसिटी मार्केट अर्थातच NEM देशभरात मोठ्या प्रमाणात पॉवर ग्रिड आणि हजारो किलोमीटरच्या ट्रान्समिशन लाइन्स आणि केबल्सचं कामकाज पाहते.

कोळशावर चालणाऱ्या वीज निर्मिती केंद्राची स्थिती
ऑस्ट्रेलियात अजूनही दोन तृतीयांश वीज निर्मिती कोळशावर चालणाऱ्या केंद्रातून केली जाते. पण देशातील कोळशावर चालणारी वीज निर्मिती केंद्रे अत्यंत जीर्ण बनत चालली आहेत. यातील अनेक केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. रॉयटर्सच्या मते, पूर्वेकडील राज्यांना २५ टक्के वीज पुरवठा करणारे २३ गिगावॅट क्षमतेचं वीज पुरवठा केंद्र गेल्या महिन्याभरात बंद पडलं आहे. त्यामुळे जवळपास ३० टक्के वीज पुरवठा अनुपलब्ध झाला आहे.

कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमती
मे महिन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठं संकट निर्माण झालं. १ जूनला व्हिक्टोरियामध्ये गॅसच्या किमती सामान्य सरासरीच्या ५० पट अधिक वाढल्या. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या जागतिक पुरवठा साखळीला फटका बसला आहे. कोळसा आणि गॅस सारख्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचाही विजेच्या किमतींवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे AEMO ने वीजेचा दर ३०० ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत (A$300/MWh ) वाढवला आहे.

हेही वाचा- विश्लेषण : रेव्हलॉनवर दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ का आली?

तसेच चालू वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात आलेल्या पुराचा देशांतर्गत असणाऱ्या कोळशाच्या खाणींना फटका बसला आहे. यामुळे न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड येथील कोळसा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय, तांत्रिक समस्यांमुळे न्यू साऊथ वेल्समधील एरारिंग पॉवर स्टेशनला कोळसा पुरवठा करणार्‍या दोन खाणींतील उत्पादन रोखण्यात आलं आहे. एरारिंग पॉवर स्टेशन हे NEM चे कोळशावर चालणारे सर्वात मोठं वीज निर्मिती केंद्र आहे.

हेही वाचा- विश्लेषण : आर्थिक अडचणीमुळे ‘एलआयसी पॉलिसी’ बंद करायचीय? काय करायचं? किती पैसे मिळणार?

याशिवाय ऑस्ट्रेलियात हिवाळ्याचं लवकर आगमन झाल्याने घरांना गरम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गॅसची मागणी वाढली आहे. तर कोळशाच्या तुटवड्यामुळे गॅसवर चालणाऱ्या वीज केंद्रात गॅसची मागणी वाढत आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून ऑस्ट्रेलियात नैसर्गिक वायूच्या किमती गगनाला भीडत आहेत. परिणामी ऑस्ट्रेलियात विजेचं महासंकट निर्माण झालं आहे.

Story img Loader