मुंबई तसेच आसपासच्या परिसरात सहा आलिशान शोरुम उघडून लोकांना भुरळ पाडणारे ‘टोरेस’ हे कथित ज्वेलरी हाऊस म्हणजे फसवणुकीचा नवा अवतार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत सव्वा लाख गुंतवणूकदारांना हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या परदेशी प्रवर्तकांविरुद्ध ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे. परंतु या कथित कंपनीला गुंतवणूकदार बळी का पडले, कसे पडले, याचा हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टोरेस’ काय आहे?

‘टोरेस’ हे ज्वेलरी ब्रॅंडचे नाव आहे. प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीमार्फत तो चालविला जात होता. कंपनीचे अद्ययावत संकेतस्थळ उपलब्ध होते. याशिवाय शिवाजी पार्क (दादर), ग्रॅंट रोड, बोरिवली, मीरा रोड, वाशी, कल्याण आदी ठिकाणी आलिशान शोरुम्स उघडण्यात आली होती. ॲानलाइनही ज्वेलरी खरेदी करता येत होती. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲाफर्स आणि त्याही कमी किमतीत देऊन या ज्वेलरी हाऊसने भुरळ पाडली होती. याशिवाय आलिशान शोरुम असल्यामुळे शंकेसही वाव नव्हता. ही मूळची रशियन-युक्रेनिअन कंपनी असल्याचे सांगितले जात होते. परदेशी तरुणी सेल्स काऊंटरवर होत्या. हळूहळू ग्राहकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जाऊ लागले. ग्राहकही चांगलेच भुलल्याचे दिसून येते.

हे ही वाचा… इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. व्ही. नारायणन कोण आहेत?

कशी केली फसवणूक?

कंपनीने चार योजना आणल्या होत्या. सोन्यामध्ये गुंतवणूक करा आणि आठवड्याला दोन टक्के व्याज घ्या, चांदीत गुंतवणूक केल्यास तीन टक्के, मोझानाईट खड्यात गुंतवणूक केल्यास चार टक्के, पण केवळ मोझानाईट खड्यात गुंतवणूक केली तर पाच ते सहा टक्के व्याज अशा त्या योजना होत्या. रोख रकमेद्वारे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा (११ ते १४ टक्के) देण्याचे आमीष दाखविले जात होते. जर गुंतवणूकदारांनी आणखी गुंतवणूक आणल्यास त्यांना सरसकट २० टक्के व्याजाचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी कंपनीमार्फत परिसंवादाचेही आयोजन केले जात होते. आम्हाला सोने एकदम स्वस्तात मिळते. त्यावर ३०० टक्के नफा मिळतो. त्यामुळेच आम्ही इतके व्याज देऊ शकतो, असेही सांगितले जात होते.

गुंतवणूकदार का फसले?

सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना मोझानाईट खडा हा खरा हिरा म्हणून देण्यात आला. हिऱ्याची वर्षानुवर्षे पारख असलेल्या जवाहिऱ्यालाही तो खरा की खोटा हे ओळखता येत नाही. त्यासाठी यंत्राचीच गरज लागते. आपल्या पैशात हिरा मिळाल्यामुळे खुश झालेल्या ग्राहकांना दर आठवड्याला सहा टक्के दराने गुंतवणुकीवर व्याज देऊ करण्यात आले. इतकेच नव्हे तर बंपर ड्रॅाच्या नावाखाली कार, महागडे फोन भेट म्हणून देण्यात आले. त्यामुळे अर्थात ग्राहकांचा विश्वास बसला. फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या योजनेवर दहा टक्के व्याजाचे आमीष दाखविण्यात आले. ख्रिसमस आणि नवीन वर्षाची भेट म्हणून १३ टक्के व्याज देण्याचे आमीष दाखविण्यात आले. ग्राहक भुलले आणि आतापर्यंत सव्वा लाख गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविल्याची प्राथमिक माहिती बाहेर आली आहे. सुमारे एक हजार कोटींना या गुंतवणूकदारांना गंडा घालण्यात आला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खरे तर गुंतवणूकदारांना व्याज मिळणे बंद झाले तेव्हा तांत्रिक अडचण असल्याचे कारण पुढे करण्यात आले. त्यामुळे गुंतवणूक फक्त रोख स्वरूपात स्वीकारली जाईल, असे सांगण्यात आले. आकर्षक व्याजापोटी गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपये दिले. १ जानेवारी २०२५ पासून कंपनीने सर्व शोरुम्स बंद केली आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तौफीक रियाझ (बोगस नाव) ऊर्फ जॅान कार्टर आणि अभिषेक गुप्ता (सीए) यांनी संपूर्ण शोरुम लुटून ते फरार झाल्याचे संकेतस्थळावर घोषित केले आहे. आता हा फसवणुकीचा नवा अवतार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा… मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?

कंपनीची बाजारातील स्थिती…

प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या नावे ७ एप्रिल २०२३ रोजी कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झालेली एक वर्षे ९ महिन्यांची कंपनी आहे. सर्वेश सुर्वे हा उमरखाडीतील आधार केंद्रात काम करणारा या कंपनीचा संचालक आहे. त्यानंतर व्हिक्टोरिया कोवॅलेन्को हा युक्रेनिअन नागरिक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी संचालक बनला. कंपनीचे भांडवल एक कोटी आहे. गिरगाव ॲापरा हाऊस येथील पॅाप्युलर आर्केडमधील ३६ व्या मजल्यावर कंपनीचे मुख्यालय आहे. भारतीय व्यक्ती म्हणून सर्वेश सुर्वेची डिजिटल सही सर्वत्र वापरण्यात आली आहे. यावरुन अगदी पद्धतशीररीत्या फसवणूक करण्याच्या हेतूनेच कंपनीची स्थापना करण्यात आली, हे स्पष्ट होते.

तपास कुठपर्यंत?

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी या कंपनीच्या महाव्यवस्थापक असलेल्या उझबेकीस्तानच्या नागरिक तानिया शासाटोव्हा उर्फ टझागुल करनशानोवना शासाटोव्हा (५२) यांच्यासह संचालक असलेला सर्वेश सुर्वे (३०) आणि स्टोअर इन्चार्ज व्हलेंशिया गणेश कुमार (४४) या तिघांना अटक केली आहे. याशिवाय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तौफीक रियाझ (बोगस नाव) ऊर्फ जॅान कार्टर आणि संचालक व्हिक्टोरिया कोवॅलेन्को यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटिस जारी केली आहे. व्हॅलेंशिया हिने भारतीय नागरिकाशी विवाह केला आहे. गुंतवणूकदारांना भुरळ घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आता फसवणूक झालेल्यांची रांग लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी एक अर्ज तयार केला असून त्यात तपशील भरण्यास सांगितला आहे. दहा कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक असल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी हा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला आहे. महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आता नवी मुंबई, मीरा-भाईंदर-वसई-विरार तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातही गुन्हे दाखल होतील. हा आता २०२४ मधील मोठा आर्थिक घोटाळा ठरणार आहे.

हे ही वाचा… ‘HMPV’मुळे लहान मुलांना होऊ शकतो गंभीर आजार? तज्ज्ञ काय सांगतात? भारतातील स्थिती काय?

पुढे काय?

एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टोरेस या नावाखाली रशिया, युक्रेनमध्येही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. भारतानंतर श्रीलंकेत शोरुम उघडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सर्वेश सुर्वे याला मोठमोठी आमीषे दाखविण्यात आली. मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात व्याज मिळणे शक्य नाही, याची कल्पना असतानाही ग्राहक फसले. रोखीच्या स्वरूपात मोठी गुंतवणूक घेण्यात आली. भाजी विक्रेत्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. कंपनीने रीतसर पावत्या दिल्यामुळे किमान पुराव तरी आहेत. परंतु मुळात कंपनीची सर्व शोरुम्स, मुख्य कार्यालय भाड्याने घेतलेली आहेत. कुठल्याही मालमत्तेत गुंतवणूक केलेली नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल कशी होणार हा प्रश्नच आहे.

nishant.sarvankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres jewelry house scam a new pattern of fraud by a foreign company print exp asj